दीपक देशमुख
नवी मुंबई : दुबई येथील आहिल क्लब या आलिशान स्टेडियममध्ये झालेल्या आंतरराष्ट्रीय कराटे स्पर्धेत भारतातर्फे उतरलेल्या नवी मुंबईतील खेळाडूंनी सुवर्ण पदकांची लूट केली.या स्पर्धेत १७ सुवर्ण व ६ रजत पदके प्राप्त केली. विशेष म्हणजे या स्पर्धेचा प्रारंभ भरतनाट्यम या स्वागत नृत्याने करण्यात आले.
या स्पर्धेत जगभरातून भारत, सौदी, अफगाणिस्तान, श्रीलंका, भूतान, ओमान, क तार, कुवेत, पाकिस्तान, ऑस्ट्रेलिया आदी देशातून ८८६ कराटे खेळाडू काता व कुमिते या कराटे मधील प्रकारात स्पर्धेसाठी दाखल झाले होते. नवी मुंबईतील साई स्पोर्ट अकॅडमी संलग्न इंटरनॅशनल इंडो रिओ कराटे इ फेडरेशन या संस्थेकडून २८ खेळाडूंनी भाग घेतला होता. तर भारतातील एकूण २४२ खेळाडूंचा सहभाग होता.
या स्पर्धेत नवी मुंबईतील साई स्पोर्ट अकॅडमीच्या रुपेश वाडेकर, मरीएम शेख, अरीज जुवाले, कार्तिक कोलकर, युवराज पवार, राजस साठे, काव्यांजली वाडेकर, अवंतीका श्रीनिवासन, विशाखा धुमाळ, अमोली भोसले, खुशबू सय्यद, कोमल सतरो, क्यूना शहा, रितिका भोसले, आराध्य नकवा, प्रथमेश शिरोडकर, पुनांक झेंडा, रिषभ म्हात्रे, सोहम कोलटे, स्वप्नील झाकोडे, तनिष्क,पवाडे आदींसह प्रशिक्षिका मनीषा पाटणे व प्रशिक्षक अमर पाटणे यांनी स्पर्धयेत भाग घेऊन पदक पटकाविले.
विजेत्या सर्व खेळाडूंना प्रशिक्षिका मनीषा पाटणे व प्रशिक्षक अमर पाटणे तसेच संघाचे व्यवस्थापक फराज शेख यांनी प्रशिक्षण दिले होते. त्यांच्या या कार्याला यश आले म्हणून त्यांचे नवी मुंबईत अभिनंदन होत आहे. दरम्यान, स्पर्धेपूर्वी भारताच्या नटराज डान्स अकॅडमीतर्फे सुहानी तांडेल, मीनल पवार यांनी भरतनाट्यम या स्वागत नृत्यानी सर्व पाहुणे व खेळाडूंचे स्वागत करण्यात आले.