दीपक देशमुख
* अनधिकृत बाजाराकडे मनपाच्या उदासिनतेमुळे स्थानिक नागरिकांत संतापाचे वातावरण * ऐरोलीतील नाट्यगृहाच्या भुखंडाजवळच भरतो हा अनधिकृत बाजार * आमदार संदीप नाईक व पालिका आयुक्त तरी दखल घेणार काय?
नवी मुंबई : नवी मुंबई महापालिका कार्यक्षेत्रातील आठवडी व दैनिक अनधिकृत बाजारावर कारवाईची नवी मुंबईकरंाकडून सतत मागणी होत असतानाच ऐरोली सेक्टर चार येथील मोकळ्या भूखंडावर रोजच एक अनधिकृत बाजार भरत असल्याचे भयावह वास्तव आहे. विशेष म्हणजे या बाजाराला स्थानिक नागरिकांचा विरोध असतानाही मनपाच्या अतिक्रमण विभागाचा दुर्लक्ष असल्याने बाजार माफियांचे फावले असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे या अनधिकृत बाजारावर कारवाई करावी अशी मागणी स्थानिक नागरिक करत आहेत.
ऐरोली सेक्टर चार येथील एका भूखंडावर नाट्यगृहाचे ज्या ठिकाणी काम चालू होते. त्याच भूखंडच्या जवळ असणार्या मोकळ्या भूखंडावर गेल्या अनेक महिन्या पासून सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास हा बाजार भरतो. या ठिकाणी रोज पाचशेच्या आसपास व्यावसायिक आपला व्यवसाय करत आहेत.परंतु याकडे पोलीस व ऐरोली विभाग कार्यालयाचे प्रशासन का दुर्लक्ष करत आहेत असा संतप्त सवाल सवाल स्थानिक नागरिक विचारत आहेत.
या बाजारात नागरिकांची गर्दी होत असल्याने येथे नेहमीच भांडणासारखे प्रकार घडत असल्याचे नागरिक सांगतात. तसेच या परिसरातून जाणार्या महिला व तरुणींना काही तरुण धक्के मारण्याचे वाईट प्रकार होत असल्याने भविष्यात एखादा वाईट प्रसंग घडण्याची शक्यता नाकारता येत नसल्याची भीती स्थानिक नागरिकांकडून व्यक्त करण्यात येत आहे. येथे पॉकेटमारीचे प्रकार नियमित घडत असल्याने यावर पोलीस व मनपाने कारवाई करावी अशी मागणी अनेक नागरिक करत आहेत.
याबाबत सहाययक आयुक्त तुषार बाबर याना विचारले असता,कारवाई करतो असे सांगितले. खुलेआमपणे अनधिकृत बाजार सुरू असताना महापालिका प्रशासनाच्या उदासिनतेकडे स्थानिक आमदार संदीप नाईक व महापालिका आयुक्तांनी लक्ष द्यावे अशी मागणी स्थानिक रहीवाशांकडून करण्यात येत आहे.