४ हजार रूपये लाचेचे प्रकरण आले डॉक्टरच्या अंगलट
नवी मुंबईः अपघातास कारणीभूत ठरलेला चालक गाडी चालवताना मद्याचे सेवन केलेला नसल्याबाबतचे बनावट प्रमाणपत्र देण्यासाठी तक्रारदाराकडे ४ हजार रुपयांची लाच मागणार्या नवी मुंबई महापालिकेच्या वाशी हॉस्पीटलमधील अपघात वैद्यकीय अधिकारी सचिन वाघमारे याच्या विरोधात नवी मुंबई लाचलुचपत प्रतिबंध विभागाच्या अधिकार्यांनी तपासाअंती वाशी पोलीस स्टेशनमध्ये १४ मे रोजी गुन्हा दाखल केला आहे.
यासंदर्भात चालकाच्या भावाने नवी मुंबई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कार्यालयात गत १५ मार्च रोजी तक्रार दाखल केली होती. अपघातास कारणीभूत ठरलेल्या आपल्या भावाने मद्याचे सेवन केले नसल्याबाबत प्रमाणपत्र देण्याची मागणी वाशी येथील महापालिका हॉस्पीटलचे अपघात वैद्यकीय अधिकारी सचिन वाघमारे यांच्याकडे केली होती. या कामाकरिता सचिन वाघमारे यांनी ४ हजार रुपयांची लाच मागितली होती. सदर तक्रारीची दखल घेत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधीक्षक रमेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक कुसूरकर आणि त्यांच्या पथकाने तपास करुन सचिन वाघमारे याच्या विरोधात १४ मे रोजी वाशी पोलीस स्टेशनमध्ये लाचेची मागणी केल्यासंदर्भात गुन्हा दाखल केला आहे.