दीपक देशमुख
नवी मुंबई : ऐरोली सेक्टर चार मधील मुख्य रस्त्या लगत असणार्या रो हाऊसच्या मालकांनी पार्किंग साठी राखीव ठेवण्यात आलेल्या जागेवर व्यवसाय सुरू केला आहे.याचाच परिणाम वाहतुकीचा प्रश्न निर्माण होत असून त्यावर मनपाने कारवाई करावी अशी मागणी शिव भीम सामाजिक संस्थेचे अध्यक्ष राजेश तळेकर यांनी केली आहे.
ऐरोली सेक्टर चार येथील गांधी रुग्णालय ते मनपाच्या ग्रंथालया पर्यंत दोन्ही बाजूला रो हाऊस आहेत. येथूनच सेक्टर सोला व सतरा कडे मुख्य रस्ता जातो.परंतु या रस्त्याच्या दुतर्फा असणार्या रो हाऊसच्या मालकांनी पैश्याच्या अमिशपायी तळ मजल्यावर कोणतीही परवानगी न घेता व्यावसायिक गाळे निर्माण केले असून याचा वापर व्यवसायासाठी करत असल्याचे राजेश तळेकर यांनी सांगितले.
रो हाऊसच्या मालकांनी पार्किंगच्या जागेवर व्यावसायिक गाळे तयार केल्यामुळे त्यांची वाहने व ग्राहकांची वाहने सध्या रस्त्याच्या दुतर्फा उभी राहत आहेत.त्यामुळे साहजिकच येथे वाहनांची गर्दी होत असून वाहतुकीचा प्रश्न निर्माण होत आहे.त्याच बरोबर येथे नियमित अपघाताच्या घटना घडत असल्याचे राजेश तळेकर यांचे म्हणणे आहे.
मनपाची कोणतीही परवानगी न घेता खुलेआम अनधिकृतपणे व्यवसाय करणार्यांवर मनपाने आतापर्यत कारवाई होणे अपेक्षित होते.परंतु मनपाच्या अतिक्रमण विभागाचे याकडे दुर्लक्ष का असाही सवाल राजेश तळेकर यांनी विचारला आहे. याबाबत ऐरोली विभागाचे सहाय्यक आयुक्त तुषार बाबर याना विचारले असता कारवाई करतो असे मोघम सांगितले.