स्वयंम न्युज ब्युरो : ८३६९९२४६४६
नवी मुंबई: वैद्यकीय सेवेचे आर्थिकीकरण करण्यात हातखंडा असणाऱ्या मोठ् मोठ्या कॉर्पोरेट उद्योगसमुहाने स्पेशालिटी हॉस्पिटलच्या नावाने रुग्णांची लूटमार चालवली आहे . नवी मुंबई शहरात अशा बड्या हॉस्पिटलांचे पेव फुटले आहे. महानगरपालिका अधिकारी देखील या सर्व हॉस्पिटल्सना पाठीशी घालत आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे शहर अध्यक्ष सविनय म्हात्रे यांनी यासंदर्भात आयुक्तांकडे तक्रार केली होती या तक्रारीची दखल घेत वैधकिय क्षेत्रात मोठे नाव असणारे बेलापूर येथील अपोलो हॉस्पिटल या रूग्णालयास महानगरपालिकेच्या मालमत्ता कर विभागाने दणका दिला आहे .. मागील वर्ष भरापासून निवासी मालमत्ता कर भरत असणाऱ्या अपोलो हॉस्पिटलला मालमत्ता कर विभागाने व्यावसायिक (अनिवासी) मालमत्ता कर आकारला आहे.
मागील वर्षी जून महिन्यात या हॉस्पिटलला ना हरकत प्रमाण पत्र प्राप्त झाल्यानंतरही अपोलो हॉस्पिटलला अनिवासी मालमत्ता कर आकारण्यात मालमत्ता कर विभाग टाळाटाळ करत होते .. महानगरपालिकेचा महसूल बुडविण्यात या विभागाच्या अधिकाऱ्यांचे काय गौडबंगाल आहे ?असा प्रश्न शहर अध्यक्ष सविनय म्हात्रे यांनी विचारला आहे.
नवी मुंबईतील बड्या हॉस्पिटल्सना निवासी एवजी व्यावसायिक(वाणिज्य)मालमत्ता कर आकारण्याची मागणी मनविसेचे शहर अध्यक्ष सविनय म्हात्रे यांनी आयुक्तांकडे केली होती. व्यावसायिक मालमत्ता कर न भरणाऱ्या हॉस्पिटल्सची यादी आयुक्तांकडे देण्यात आली होती. त्यातील अपोलो हॉस्पिटलला व्यावसायिक मालमत्ता कर आकारण्यात आला असला तरी धर्मादाय संस्था असल्यामुळे इतर हॉस्पिटल्सना मालमत्ता करात सूट म्हणून निवासी मालमत्ता कर आकारण्यात आल्याचा खूलासा मालमत्ता कर विभागातर्फे सविनय म्हात्रे यांना देलेल्या पत्रात करण्यात आलेला आहे. हे प्रकरण अत्यंत गंभीर असून धर्मदाय संस्था म्हणून नोंदणी करून मालमत्ता करात सवलत घेऊन रुग्णांकडून लाखोची बिले वसूल करणाऱ्या धर्मादाय संस्थाच्यां हॉस्पिटल विरोधात धर्मादाय आयुक्तांकडे तक्रार करणार असल्याचे सविनय म्हात्रे यांनी म्हटले आहे.