जागा बदलण्यास नागरिकांचा विरोध, आंदोलनाची तयारी
स्वयंम न्युज ब्युरो : ८३६९९२४६४६
नवी मुंबई :- ट्रान्स हार्बर मार्गावर निर्माणाधीन असलेल्या दिघा रेल्वे स्थानकाची जागा न बदलता एमआरव्हीसीच्या(मुंबई रेल्वे विकास प्राधिकरण) सर्व्हेक्षणानुसार दिघा बाबा मंदिर दिघा गाव या ठिकाणीच हे स्थानक बांधावे, अशी मागणी माजी खासदार डॉ.संजीव गणेश नाईक यांनी रेल्वेमंत्री पियुष गोयल आणि रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष अश्विन लोहाणी यांच्याकडे बुधवारी लेखी पत्र देवून केली आहे.
डॉ.नाईक यांनी बुधवारी रेल्वेमंत्री गोयल आणि रेल्वेबोर्डाचे अध्यक्ष लोहाणी यांची भेट घेवून दिघा रेल्वे स्थानकाची जागा बदलल्यास दिघा रहिवासी भागातील आणि दिघा परिसरातील औद्योगिक वसाहतींमधील हजारो प्रवाशांना हे कमालीचे असुविधाजनक होणार असल्याकडे त्यांचे लक्ष वेधले. दिघा गावापासून दूर कळवा आणि ठाणे रेल्वे स्थानकांनजीक मुकुंद कंपनीजवळ हे स्थानक हलविण्याच्या हालचाली सुरु असून या विरोधात स्थानिक नागरिकांमध्ये प्रचंड असंतोष असून याविरोधात भविष्यात नागरिक आंदोलन करण्याच्या तयारीत असल्याची बाब डॉ.नाईक यांनी रेल्वेमंत्री गोयल आणि रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष लोहाणी यांच्या निदर्शनास आणून दिली आहे. जनभावना पाहता दिघा रेल्वे स्थानक पूर्वीच्या नियोजित जागेतच बांधावे, अशी मागणी स्थानिक आमदार संदीप नाईक, दिघा भागातील स्थानिक नगरसेवक नविन गवते, नगरसेविका अपर्णा गवते, नगरसेविका दिपा गवते यांनी देखील केली आहे.
आपल्या खासदारकीच्या कार्यकाळात डॉ.नाईक यांनी रेल्वे प्रवाशांना अनेक सुविधा मिळवून दिल्या. त्यांच्या पाठपुराव्यामुळे ट्रान्स हार्बर मार्गावर दिघा आणि बोनकोडे ही दोन नविन रेल्वे स्थानके मंजूर झाली. त्यापैकी दिघा स्थानकाचे काम सुरु झाले आहे. दिघा रेल्वे स्थानकाच्या निर्मितीसाठी योग्य जागा निश्चित करण्यासाठी एमआरव्हीसीने २०१३साली सर्व्हेक्षण केले होते. या सर्व्हेक्षणाच्या अहवालानुसार दिघा बाबा मंदिर, दिघा गाव (रेल्वे पोल क्रमांक एड-३६/२० ढज ३६/३२ ) हि जागा या स्थानकासाठी निश्चित करण्यात आली होती. हे ठिकाण सर्व प्रवाशांसाठी योग्य आणि सुविधाजनक होते. परंतु आता या ठिकाणाऐवजी कळवा मुकुंद कंपनी नजिक दिघा स्थानक बांधण्यात येत असल्याचे निदर्शनास येते आहे. या संदर्भात १७ एप्रिल २०१८ रोजी डॉ.नाईक यांनी रेल्वेमंत्री आणि रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष या दोघांना पत्र पाठवून त्याची दखल घेण्याची मागणी केली होती. मात्र त्यावर कार्यवाही झाली नाही. त्यामुळे बुधवार १६ मे रोजी डॉ.नाईक यांनी पुन्हा एकदा या दोघांची भेट घेवून त्यांना दिघा स्थानकाची जागा न बदलता एमआरव्हीसीच्या सर्व्हेक्षणाप्रमाणे दिघा बाबा मंदिर येथेच हे स्थानक बांधण्यासाठी आवश्यक तातडीची कार्यवाही करावी. तसेच या स्थानकाचे मुकुंद कंपनी जवळील सुरु असलेले काम थांबविण्याची मागणी केली आहे.
डॉ.नाईक यांनी केलेल्या मागणीनुसार एमआरव्हीसीच्या अधिकार्यांबरोबर बोलून या विषयी कार्यवाही करण्यात येईल, असे आश्वासन रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष लोहाणी यांनी डॉ.नाईक यांना दिले आहे.