आमदार संदीप नाईक यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
नवी मुंबई :- मुंब्रा बाहयवळण रस्ता दुरुस्तीसाठी बंद ठेवण्यात आल्याने ठाणे-बेलापूर मार्गावर कमालीची वाहतुकोंडी दररोज निर्माण होते आहे. ही वाहतुककोंडी दूर करण्यासाठी या मार्गावर नव्याने बांधण्यात आलेले उडडाणपूल आणि भुयारी मार्ग वाहतुकीसाठी तातडीने खुले करावेत, अशी मागणी आमदार संदीप नाईक यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे लेखी पत्रान्वये केली आहे.
ठाणे-बेलापूर मार्गावरील वाढती वाहनांची संख्या, भविष्यात होवू घातलेले आंतरराष्ट्रीय विमानतळ, ठाणे, मुंबई पूणे, गोवा याकडे जाणार्या मार्गांशी असलेली या मार्गाची संलग्नता पाहता आमदार संदीप नाईक यांनी एमएमआरडीएकडे पाठपुरावा करुन घनसोली-तळवली तसेच तुर्भे सविता केमिकल कंपनी येथे दोन उडडाणपूल तसेच महापे येथे भुयारी मार्ग असे पायाभूत सुविधांचे प्रकल्प ंमंजूर करुन घेतले होते. हे प्रकल्प वेळेत पूर्ण व्हावेत यासाठी वेळोवेळी पाहणीदौरे केले. एमएमआरडीएच्या अधिकार्यांच्या भेटी घेतल्या. आमदार संदीप नाईक यांनी या प्रकल्पांची अलिकडेच पाहणी केली असता या तिन्ही प्रकल्पाचे काम पूर्ण झाल्याचे दिसून आले आहे.
मुंब्रा बाहयवळण रस्ता दुरुस्तीसाठी बंद झाल्याने मुंबई, गोवा, पूणे, बंगळुरकडे जाणारी सर्व प्रकारची जड वाहने मुलुंड-ऐरोली खाडीपुलामार्गे ठाणे-बेलापूर मार्गावर वळविण्यात आली आहेत. त्यामुळे या मार्गावर दररोज अभुतपूर्व अशी वाहतुककोडी होते आहे. या मार्गावरुन साधारणपणे १ लाख ८० हजार वाहने दररोज ये-जा करीत असतात मात्र मुंब्रा बाहयवळण रस्ता बंद झाल्याने वाहनांची संख्या वाढून ती ३ लाखांवर गेली आहे. परिणामी ऐरोली,रबाळे, तळवली, घणसोली, महापे,दिघा या भागात प्रचंड वाहतुककोंडी होते आहे. या भागातील नागरिकांना या वाहतुककोंडीचा खूपच त्रास होतो आहे. या शिवाय स्कूलबस, रुग्णवाहिका, सार्वजनिक प्रवासी वाहने या वाहतुककोंडीत दररोज अडकतात. त्याचा प्रचंड मनस्ताप प्रवाशांना होतो आहे. पुढील दोन महिने ही दररोजची वाहतुककोंडी झेलणे नागरिकांना असहय झाले आहे. त्यामुळे ठाणे-बेलापूर मार्गावरील नव्याने बांधण्यात आलेले उडडाणपूल आणि भुयारी मार्ग तातडीने वाहतुकीसाठी खुले केल्यास या मार्गावरुनही वाहने धावू लागतील आणि ठाणे-बेलापूर मार्गावरील वाहतुक कोंडी फुटेल. नागरिकांचा वेळ वाचेल त्याचबरोबर त्यांना वाहतुकोंडीमुळे होणारा त्रास, मनस्ताप नाहीसा होईल, असे आमदार संदीप नाईक यांनी सांगितले. मुख्यमंत्री फडणवीस यांनी संबंधीत यंत्रणांना हे उडडाणपूल तसेच भुयारी मार्ग तात्काळ वाहतुकीस ख्ाुले करण्याच्या सुचना द्याव्यात, अशी मागणी आमदार नाईक यांनी केली आहे.