नवी मुंबई :- उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार व 2012 च्या जनहित याचिका क्रमांक 138 नुसार सिडको किंवा महाराष्ट्र शासनाकडून कोणताही विकास परवाना न घेता बांधकाम करण्यात आलेल्या अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्याचे आणि त्याबाबतचा अहवाल न्यायालयाला सादर करण्याचे निर्देश न्यायालयातर्फे देण्यात आले आहेत. त्यानुसार श्री. शिवराज पाटील, अतिरिक्त जिल्हाधिकारी (निवड श्रेणी- अनधिकृत बांधकाम नियंत्रण विभाग) सिडको यांच्या नेतृत्वाखाली अनधिकृत बांधकाम नियंत्रक (दक्षिण) यांच्या पथकाने दि. 17.05.2018 रोजी खारघर नोड, नवी मुंबई, जि. रायगड येथे अनधिकृत बांधकामविरोधी कारवाईचे आयोजन केले होते. सदर कारवाईचा तपशील पुढीलप्रमाणे :
- खारघर, सेक्टर-10 येथील कोप्रा पुला जवळील अनधिकृत आरसीसी (जी+4) इमारतीचे चालू स्थितीतील बांधकाम अशत: निष्कासित करण्यात आले.
- खारघर येथील सेक्टर-19 येथील भूखंड क्र. 265, 266 आणि 267 वर अनधिकृतरीत्या उभारण्यात आलेले तात्पुरत्या स्वरूपातील 7 व्यावसायिक गाळे, 12 झोपड्या, 1 धाबा निष्कासित करण्यात येऊन 1600 चौ. मी. इतके क्षेत्र मुक्त करण्यात आले.
- सेक्टर-35ई, खारघर येथील भूखंड क्र. 18 वर उभारण्यात आलेले भाजी विक्रीचे गाळे, भूखंड क्र. 67 वर उभारण्यात आलेले तात्पुरत्या स्वरूपातील गाळे आणि सामाजिक केंद्रासाठी राखीव असलेल्या भूखंड क्र. 55 वर उभारण्यात आलेले भाजी विक्रीचे गाळे; ही सर्व अनधिकृत अतिक्रमणे निष्कासित करण्यात येऊन अंदाजे 4000 चौ. मी. इतके क्षेत्र मुक्त करण्यात आले.
- सेक्टर-19 मधील जरीमरी मंदिराच्या मागील बाजूस अनधिकृतरीत्या उभारण्यात आलेले पत्र्याचे तात्पुरत्या स्वरूपातील गोदाम निष्कासित करण्यात येऊन अंदाजे 200 चौ. मी. क्षेत्र मुक्त करण्यात आले.
वर उल्लेख केलेली अतिक्रमणे-अनधिकृत बांधकामे इ. सिडकोच्या मालकीच्या भूखंडांवर कोणत्याही प्रकारचा मालकी हक्क आणि विकासाची परवानगी नसताना उभारण्यात आली होती व सिडको प्रशासनाने योग्य ती कायदेशीर प्रकिया अवलंबून ही अतिक्रमणे निष्कासित केली.
सदर कारवाई खारघर पोलीस स्थानकातील पोलीस उपनिरीक्षक श्री. सोनावणे आणि 25 पोलीस कर्मचारी यांच्या सहकार्याने पार पाडण्यात आली. या कारवाईवेळी सिडकोतील पोलीस पथक, एमएसएफचे कर्मचारी आणि सुरक्षा रक्षक हेही उपस्थित होते.
सदर कारवाईसाठी 01 पोक्लेन, 01 जेसीबी, 01 ट्रक, 04 जीप, एअर ब्रेकर आणि 20 कामगार यांची नियुक्ती करण्यात आली होती.