* आठवलेंचा मेणाचा पुतळा
* आगामी निवडणुकांच्या तोंडावर भाजपकडून कॅबिनेट मंत्रिपदाचे गाजर
रामदास आठवले म्हणजे एकेकाळचा लढाऊ पँथर नेता. आंबेडकरी चळवळीतील संघर्षशील नेता म्हणूनही त्यांची ओळख आहे. सत्तेत सहभागी झाल्याने ते मेणासारखे मऊ झाले की काय, अशी चर्चा अनेकदा होते. आता मात्र त्यांचा मेणाचा पुतळा तयार करण्यात आला आहे. त्याचे अनावरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकांवर लक्ष ठेवून आठवले यांना पुढे कॅबिनेट मंत्रीपद मिळणार असल्याचे आश्वासन देऊन फडणवीस यांनी रिपब्लिकन कार्यकर्त्यांना खुश करण्याचा प्रयत्न केला.
सह्याद्री अतिथीगृहात केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या मेणाच्या पुतळ्याचे अनावरण मुख्यमंत्र्यांनी केले. आता हा पुतळा लोणावळ्यात सुनील्स वॅक्स म्युझियम मध्ये ठेवण्यात येणार आहे. सुनील कंडलूर या कलाकाराने आठवलेंचा पुतळा इतका हुबेहूब बनविला की पुतळा कोणता आणि खरे आठवले कोणते हे ओळखता येणे अवघड झाले आहे. मात्र कविता बोलतील तेच आठवले , अशी मिश्किल टिप्पणी मुख्यमंत्र्यांनी केली आणि उपस्थितांमध्ये हास्याच्या कारंजा उडाल्या.
रामदास आठवले हे संघर्षांतून पुढे आलेले लोकप्रिय नेतृत्व आहे. त्यांच्या जे पोटात असते तेच ओठात असते. बिनधास्त निर्भीड व्यक्तिमत्व म्हणून त्यांचा देशात मोठा चाहता वर्ग निर्माण झाला आहे. त्यामुळेच पतंप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना केंद्रात स्थान दिले आहे. आगामी काळात केंद्र सरकारमध्ये आता आहे त्या पेक्षा मोठे स्थान मिळणार आहे , म्हणजे राज्य मंत्री असलेले आठवले यांना कॅबिनेट मंत्रीपद मिळणार आहे, असे संकेत मुख्यमंत्र्यांनी या वेळी दिले.