नवी मुंबई:- बेलापूरच्या आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांच्या प्रयत्नाने नवी मुंबईतील गावठाणांचे ठाणे जिल्हाधिकारी मार्फत सर्वेक्षण पूर्ण होऊन नवी मुंबईतील ग्रामस्थांना त्यांच्या मालमत्ता पत्रकाचे वाटप करण्यास सुरुवात झाली होती. “शासन आपल्या दारी” कार्यक्रमांतर्गत सिटी सर्वेक्षण झालेल्या गावातील ग्रामस्थांना प्रत्येक गाव निहाय प्रॉपर्टी कार्ड वितरणास सुरुवात झाली होती. याच अनुषंगाने “शासन आपल्या दारी” या कार्यक्रमांतर्गत तुर्भे येथील ग्रामस्थांना बेलापूरच्या आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांच्या हस्ते आज प्रॉपर्टी कार्ड वाटप करण्यात आले. शासकीय अधिकारी यांनी स्वतः आपल्या दारात येऊन मालमत्ता पत्रके वाटप केली असून सदर मालमत्ता पत्रके वाटप शिबिरे प्रत्येक गावात घेण्यात येणार आहेत.
नवी मुंबई हे विकसित शहर असून शहराच्या विकासासाठी नवी मुंबईतील ग्रामस्थांनी त्यांच्या 100% जमिनी दिलेल्या आहेत. गावठाणातील ग्रामस्थांची बांधलेली घरे नियमित करावीत, नवी मुंबई महानगरपालिका अंतर्गत येणाऱ्या गावठाणांचा सिटी सर्व्हे करून प्रत्येक घराला प्रॉपर्टी कार्ड देण्यात यावे, या संदर्भात बेलापूरच्या आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांनी अनेकवेळा शासनदरबारी पाठपुरावा केला होता.नगरविकास प्रधान सचिव नितीन करीर, सिडको व्यवस्थापकीय संचालक भूषण गगराणी तसेच ठाणे जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांजबरोबरही सदर संदर्भात अनेक बैठकी झाल्या होत्या तसेच नवी मुंबईतील प्रकल्पग्रस्तांना मालमत्ता पत्रके (प्रॉपर्टी कार्ड) मिळावे हा अनेक वर्षापासुनचा प्रलंबित प्रश्न मार्गी लागावा, याकरिता आमदार मंदाताई म्हात्रे यांनी गावागावात जाऊन प्रकल्पग्रस्तांसह गावबैठकी घेतल्या होत्या. बेलापूरच्या आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांच्या प्रयत्नांना यश येऊन नवी मुंबई गावठाणक्षेत्रातील प्रकल्पग्रस्तांच्या घरांना “शासन आपल्या दारी” कार्यक्रमांतर्गत ग्रामस्थांना प्रॉपर्टी कार्ड वाटपास सुरुवात करण्यात आली आहे. आता स्वतः शासकीय अधिकारी शासन आपल्या दारी अंतर्गत प्रॉपर्टी कार्ड वितरण करणार असल्याने सर्व प्रकल्पग्रस्त ग्रामस्थांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.नवी मुंबईतील प्रकल्पग्रस्तांसाठी हा मोठा निर्णय असून गावठाणातील प्रत्येक घरांस आपल्या हक्काचे प्रॉपर्टी कार्ड मिळणार असल्याने आपल्या मालकी हक्काचा कायदेशीर पुरावा प्रकल्पग्रस्तांना मिळाला आहे. त्यामुळे स्थानिक प्रकल्पग्रस्तांना त्यांच्या मालमत्ताबाबत कायदेशीर प्रक्रिया व घरे विकसित करण्याकरिता येणाऱ्या अडचणी दूर होणार आहेत. अनेक वर्षापासुनचा सदर प्रश्न मार्गी लागल्यामुळे प्रकल्पग्रस्तांमध्ये उत्साहाचे वातावरण असून सर्व स्तरातून बेलापूरच्या आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांचे कौतुक केले जात आहे.
यावेळी आमदार सौ.मंदाताई म्हात्रे यांनी सांगितले कि, नवी मुंबईतील ग्रामस्थांनी त्यांच्या 100% जमिनी दिलेल्या असताना नवी मुंबई महानगरपालिका अंतर्गत येणाऱ्या गावठाणांचा सिटी सर्व्हे करून प्रत्येक घराला मालमत्ता पत्रके (प्रॉपर्टी कार्ड) देण्यात यावे, हा माझा अत्यंत जिव्हाळ्याचा प्रश्न होता. याकरिता राज्याचे मुख्यमंत्री देवेन्द्रजी फडणवीस तसेच शासनदरबारी अनेक वेळा पाठपुरावा केला होता.जिल्हाधिकारी यांजसमवेतही अनेक बैठकी पार पडल्या. सदर प्रश्नाबाबत गावागावात ग्रामस्थांच्या बैठकीही घेतल्या गेल्या.आज अनेक वर्षापासूनचा प्रलंबित प्रश्न मार्गी लागल्यामुळे नवी मुंबई ग्रामस्थांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे.त्यांना आपल्या मालकी हक्काचा कायदेशीर पुरावा मिळाला असल्यामुळे अनियमित घरे नियमित होण्याचा मार्ग आता मोकळा झाला असल्याचे त्या म्हणाल्या. आज काही विरोधक प्रकल्पग्रस्तांची घरे नियमित होणार नसल्याच्या बातम्या पसरवीत आहेत. राज्याचे आदरणीय मुख्यमंत्री देवेन्द्रजी फडणवीस साहेब यांनी प्रकल्पग्रस्तांची घरे नियमित करणार असल्याचे सांगितले आहे. आपण सर्व ग्रामस्थांनी माझ्यावर विश्वास ठेवा, आपल्या ग्रामस्थांची प्रत्येक घरे हि सुरक्षितच आहेत. विरोधक पसरवित असलेल्या अफवांवर विश्वास ठेवू नका, आपल्या कोणत्याही कामासाठी तसेच नवी मुंबईतील ग्रामस्थांसाठी मी सदैव तयार असल्याचे सांगत तुर्भे गावातील ग्रामस्थांनी एकूण 1044 प्रॉपर्टी कार्ड घेतले असल्याचेहि त्या म्हणाल्या.
यावेळी भा.ज.पा.जिल्हाध्यक्ष व स्थानिक नगरसेवक रामचंद्र घरत, संपत शेवाळे, शत्रुघ्न पाटील, रामनाथ म्हात्रे, परीक्षण भूमापक श्री. सुनील ढोमणे,श्री.भहाडकर, हेमंत कोळी, वैशाली म्हात्रे, सुरेंद्र मोरे, रुजान चीलवान तसेच असंख्य प्रमाणात ग्रामस्थ उपस्थित होते.