* ऐरोली-कटई मार्गावर नवी मुंबईत मार्गिका, तुर्भे येथे उडडाणपूल
* प्रकल्पग्रस्तांच्या गरजेपोटीच्या घरांबाबत लवकरच निर्णय
नवी मुंबई :- ऐरोली ते कल्याण येथील कटई नाका या उन्नत मार्गावर नवी मुंबईत चढण्या-उतरण्यासाठी मार्गिका तसेच तुर्भे स्टोर येथे उडडाणपूल बांधण्याची मागणी आमदार संदीप नाईक यांनी केली होती. ती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मान्य केली आहे.
एमएमआरडीएच्या माध्यमातून ठाणे-बेलापूर मार्गावर बाधण्यात आलेले घणसोली-तळवली आणि सविता केमिकल कंपनी येथील दोन उडडाणपूल तसेच महापे येथील भुयारी मार्गाचे सोमवारी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. या उदघाटनाच्या जाहिर कार्यक्रमात मुख्यमंत्री फडणवीस यांनी ही घोषणा केली. त्याचबरोबर नवी मुंबईतील प्रकल्पग्रस्तांच्या गरजेपोटीच्या घरांबाबत लवकरच निर्णय घेवू, असेही त्यांनी जाहिर केले.
मुंबईतून नवी मुंबईमार्र्गे कल्याणकडे मोठया प्रमाणावर वाहतुक होते. त्यामुळे निर्माण होणारी वाहतुककोंडी कमी करण्यासाठी एमएमआरडीए १२.३० किलोमिटर लांबीचा ऐरोली ते कटई नाका असा उन्नत तसेच भुयारी मार्ग बांधणार आहे. या मार्गाचा शुभारंभ देखील मुख्यमंत्री महोदयाच्या हस्ते झाला. मात्र या मार्गावर नवी मुंबईत चढण्या-उतरण्यासाठी मार्गिका ठेवण्यात आलेली नाही. नवी मुंबईत मोठे औद्योगिक आणि व्यावसायिक क्षेत्र आहे. त्यामुळे नोकरी, व्यवसाय तसेच इतर कामांनिमित्त दररोज मुंबईतून नवी मुबईत आणि नवी मुंबईतून मुंबईत प्रवास करणार्यांची संख्या लक्षणीय आहे. त्यामुळे या मार्गावर नवी मुंबईत मार्गिका बांधण्याची मागणी आमदार नाईक यांनी लावून धरली होती. ही मार्गिका बांधण्याची सुचना मुख्यमंत्री महोदयांनी एमएमआरडीएच्या अधिकार्यांना केली आहे.
ठाणे-बेलापूर मार्गावर नव्याने निर्माण झालेले दोन उडडाणपूल आणि एक भुयारी मार्ग यामुळे तुर्भे पर्यतची वाहतुक सुरळीत होणार आहे. मात्र तुर्भे स्टोर येथे पुन्हा वाहतुककोंडीची शक्यता आहे. त्यामुळे येथून पुढे सुरळीत वाहतुक होण्यासाठी या ठिकाणी उडडाणपूल बांधण्याची मागणी आमदार संदीप नाईक यांनी केली होती. ही मागणी देखील मुख्यमत्री फडणवीसांनी मान्य केली असून या उडडाणपूलाची व्यवहार्यता तपासून पुढील कार्यवाही करण्याच्या सुचना एमएमआरडीएच्या अधिकार्यांना आपल्या भाषणात केल्या.
उडडाणपूल आणि भुयारी मार्गाच्या कामाच्या उदघाटनाच्या सोहळयात आमदार संदीप नाईक यांनी नवी मुंबईतील प्रकल्पग्रस्तांची घरे आहे त्या स्थितीत नियमित करण्याविषयीचे निवेदन मुख्यमंत्री महोदयांना दिले. शासनाने जाहीर केलेल्या अगोदरच्या योजनेत अनेक त्रुटी आहेत त्यामुळे प्रकल्पग्रस्तांच्या हिताची आणि प्रकल्पग्रस्त तसेच त्यांच्या संघटनांच्या सुचनांचा समावेश असणारी सर्वसमावेशक योजना नवी मुंबईसाठी लागू करावी, अशी मागणी आमदार संदीप नाईक यांनी सातत्याने शासन दरबारी आणि विधानसभेत लावून धरली आहे. प्रकल्पग्रस्तांची घरे आहे त्या स्थितीत नियमित करण्यात यावीत, त्यांच्या जमिनी आणि घरांना मालकी हक्क द्यावा, अशी मागणी निवेदनात केली आहे. आमदार नाईक यांच्या या मागणीवर उत्तर देताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी प्रकल्पग्रस्तांच्या हिताचा जास्तीत जास्त निर्णय घेवू, असे आश्वासन त्यांना विधीमंडळाच्या अधिवेशनात दिले होते. शासन निर्णयानुसार डिसेंबर २०१५ पर्यतची अनधिकृत बांधकामे नियमित करण्याची कार्यवाही पालिकेच्या वतीने सुरु असताना सिडकोचे तत्कालिन व्यवस्थापकीय-संचालक भुषण गगरानी यांनी नवी मुंबई पालिकेला पाठविलेल्या पत्रात गरजेपोटीची बांधकामे नियमित करता येणार नाही, असे म्हंटल्याने या विरोधात प्रकल्पग्रस्तांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाल्याची बाब आमदार नाईक यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या निदर्शनास आणून दिली आहे.
नवी मुंबईतील गावठाण आणि विस्तारित गावठाणांमध्ये अनेक घरे मोडकळीस आली आहेत. या क्षेत्रात मुलभूत सोयी-सुविधांचा आभाव आहे. त्यामुळे या क्षेत्रात वाढीव चटई क्षेत्रासह पुनर्विकासाची योजना राबविण्याकरीता सिडको व शासनाकडे पाठपुरावा सुरु आहे. नवी मुंबईतील प्रकल्पगस्तांची बांधकामे नियमित करताना त्यांना लावण्यात येणारे शुल्क हे सिडकोच्या ठराव क्रमांक ९९४९च्या अनुशंगाने लावण्यात यावे, अशी मागणी देखील आमदार नाईक यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांना दिलेल्या निवेदनात केली आहे.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी आपल्या भाषणात गरजेपोटीच्या घरांच्या विषयाला हात घालताना या विषयी लवकरच निर्णय घेवू असे आवासन दिले आहे. या विषयात अगोदर निर्णय घेतला आहे मात्र त्यामध्ये काही त्रुटी असल्याचे सांगण्यात आले असून लवकरच योग्य निर्णय घेण्याचे संकेत त्यांनी दिले.