भ्रष्टाचारी व लाचार प्रवृत्तीचे प्रतिक असलेल्या सेना भाजपच्या पराभवाची सुरुवात पालघरमधून होणार
वारंवार आचारसंहितेचे उल्लंघन करणारे सराईत दोषी मुख्यमंत्र्यांविरोधात काँग्रेसची निवडणूक आयोगाकडे तक्रार
पालघर :- भारतीय जनता पक्षातर्फे पालघर लोकसभा पोटनिवडणुकीत सत्ता, पैसा, धर्मस्थळ आणि सरकारी यंत्रणेचा प्रचंड दुरुपयोग सुरु आहे. तसेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री हे निवडणूक आचारसंहितेचा भंग करणारे सराईत दोषी झाले असून त्यांच्याविरोधात आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत यांनी निवडणूक आयोगाकडे केली आहे.
काँग्रेस शिष्टमंडळाने आज पालघर जिल्हाधिकारी कार्यालयात निवडणूक निर्णय अधिका-यांची भेट घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात आचारसंहिता भंग केल्याचा गुन्हा दाखल करावा अशी तक्रार केली. यासंदर्भात पत्रकारांशी संवाद साधताना सावंत म्हणाले की, गेल्या अनेक निवडणुकांमध्ये मुख्यमंत्री जनतेला खोटी आश्वासने देऊन, आमिषे दाखवून आणि निर्णय घोषीत करून पदाचा दुरुपयोग व आदर्श आचारसंहितेचा भंग करित आहेत. कल्याण डोंबिवली महानगपालिका व पेण नगरपालिका निवडणुकीत त्यांनी आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी काँग्रेस पक्षाने निवडणूक आयोगाकडे तक्रार केली होती. परंतु दुर्देवाने त्या तक्रारीवर कोणतीही कारवाई झाली नाही. दिनांक २० मे रोजी मुख्यमंत्र्यांनी पालघर लोकसभा क्षेत्रात भाजप उमेदवाराच्या प्रचारार्थ घेतलेल्या जाहीर सभांमध्ये खावटी कर्ज माफ करू, पालघरला वैद्यकीय महाविद्यालय उभारू, वसई विरार महापालिका क्षेत्रातून २९ गावे वगळू अशा घोषणा केल्या त्यावर निवडणूक आयोगाने याची स्वतः दखल घेऊन कारवाई करणे अभिप्रेत होते परंतु आयोगाने कारवाई न कल्याने नाईलाजाने काँग्रेस पक्षाला तक्रार करावी लागली असे सांगून निवडणूक आयोग सरकारच्या दबावाखाली आहे का? असा प्रश्न जनमानसाच्या मनात उपस्थित होत आहे असे सावंत म्हणाले.
पालघर लोकसभा पोटनिवडणुकीत भारतीय जनता पक्षातर्फे सत्ता व पैशाचा प्रचंड गैरवापर सरु असून पोलीस व महसूल अधिकारी यांचा वापर प्रचारासाठी केला जात आहे. पालघर लोकसभा क्षेत्रात अतिवरिष्ठ पोलीस व महसूल अधिकारी हॉटेलात मुक्कामी राहून काय करत आहेत? पालघरमधील क्लब वन व इम्पिरीयल या दोन्ही हॉटेलच्या सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करावी अशी मागणी सावंत यांनी केली. भाजपने आपल्या प्रचारासाठी एका मोठ्या बिल्डर नेत्याशी संबंधीत धर्मस्थळाचा बॅक ऑफिससाठी उपयोग केला आहे का?याबाबत भाजपने स्पष्टीकरण द्यावे असे सावंत म्हणाले.
भारतीय जनता पक्षातर्फे आपला मतदारसंघही वाचवता न आलेल्या उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री अजयकुमार बिष्ट यांना केवळ धार्मिक ध्रुवीकरण करण्याकरिता पाचारण केले असून सदर नेता हा योगी नसून ढोंगी आहे. त्यांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा हटवून त्याजागी मनुवादी विचारांच्या दीनदयाळ उपाध्याय यांचा पुतळा का उभारला? याचे उत्तर देशाच्या जनतेला द्यावे असे सावंत म्हणाले.
भाजप व शिवसेना हे दोन्ही पक्ष भ्रष्टाचारी व लाचारी प्रवृत्तीचे प्रतिक असून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी महाराष्ट्राच्या हिताला तिलांजली देऊन गुजरातचे हित साधण्याकरिता नियुक्त केलेले एजंट म्हणून काम करित आहेत. गुजरातच्या विकासाला चालना देणारी बुलेट ट्रेन थांबवण्याची हिम्मत शिवसेनेकडे आहे का? असा सवाल करून पालघरच्या हक्काचे पाणी गुजरातला वळवले, पालघरमध्ये होणारे सागरी पोलीस प्रशिक्षण केंद्र गुजरातने पळवल्यानंतरही शिवसेना सत्तेला चिकटून बसली आहे. या निवडणुकीतून भाजप सेनेच्या भ्रष्टाचारी व लाचारी प्रवृत्तीच्या अंताची सुरुवात होईल असे सावंत म्हणाले.
सदरच्या शिष्टमंडळात काँग्रेस उमेदवार दामोदर शिंगडा यांचे निवडणूक प्रतिनिधी चंद्रकांत दुबे, नगरसेवक अमर वाजपेयी, महेश देसाई यांच्यासह काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी सहभागी होते.