दीपक देशमुख
नवी मुंबई : घणसोली सेक्टर चार मध्ये नव्याने बांधण्यात येणार्या रात्र निवारा केंद्राचे काम करताना मनपाने निर्गमित केलेल्या साहित्याऐवजी कमी दर्जाचे साहित्य ठेकेदार व अभियंता यांच्या अभद्र युतीमुळे वापरले जात असून भविष्यात हे काम दर्जाहीन होईल. त्यामुळे कोट्यावधी रुपये खर्च करून काहीही फायदा होणार नाही. त्यामुळे दर्जेदार साहित्य वापरण्याची मागणी आंतरराष्ट्रीय मानवाधिकार महासंघाचे उपाध्यक्ष व व्यवसायाने अभियंता असणारे प्रवीण चारी यांनी केली आहे.
दरम्यान ज्या ठिकाणी या रात्र निवारा केंद्राची निर्मिती केली जात आहे, ती चुकीच्या ठिकाणी केली जात असून त्याचा आयुक्तांनी विचार करावा अशी मागणी संजय अंकल सामाजिक संस्थेचे अध्यक्ष गणेश सकपाळ यांनी केली आहे.
घणसोली येथे मनपाच्या वतीने सव्वा दोन कोटी रुपये खर्च करून रात्र निवारा केंद्र उभारणीचे काम सुरू आहे. तळमजला अधिकदोन माळेच्या इमारतीचे काम न्यू इंडिया कॉन्स्ट्रशन कंपनीला दिला आहे. सध्या या केंद्राचे काम प्राथमिक स्वरूपात असून पायाभरणीचे काम चालू आहे.परंतु अपेक्षित असे साहित्य वापरले जात नसल्याचे अभियंता प्रवीण चारी यांचे म्हणणे आहे.
पाया भरणी करताना पीसीसी केली जाते.याध्ये सिमेंट बरोबर वाळू महत्वाचे साहित्य वापरले गेले पाहिजे.परंतु संबंधित ठेकेदार बिनधास्तपणे ग्रीट पावडरचा वापर खुले आम करत आहे. ग्रीट पावडर मुळे अपेक्षित असे पक्के बांधकाम होत नसल्यामुळे मनपाचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान होणार आहे. या ग्रीट पावडरचा वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये सिमेंटचा वापर कमी केला तरी समजून येत नसल्याने जास्त फायदा व्हावा म्हणून ठेकेदार मनपाच्या आभियंत्याना हाताशी धरून अशा प्रकारचे काम करत असल्याचे आंतरराष्ट्रीय मानवाधिकार महासंघाचे उपाध्यक्ष चारी यांचे म्हणणे आहे.
याच बांधकामात वापरण्यात येणारी खडी ही काळी व टोकदार आसने गरजेचे आहे. परंतु येथे खडी वापरली जाणारी गोलाकार असून छोटे छोटे दगडासारखी खाडी आहे. तसचे या खडीत लहान लहान छिद्र असल्याने यामुळे ही बांधकाम झाल्यानंतर वाईट परिणाम होण्याची दाट शक्यता असल्याचे प्रवीण चारी यांचे म्हणणे आहे. त्यामुळे खुद्द आयुक्तांनी पाहणी करून संबंधितांवर कारवाई करणे गरजेचे असल्याचे चारी यांनी आपले म्हणणे व्यक्त केले आहे.
सरकारी बांधकाम करताना माहिती दर्शक फलक लावणे नियमानुसार असताना संबंधित ठेकेदारांनी अश्या प्रकारचा फलक दर्शनी भागात लावला नाही.त्यामुळे ही नागरिका मध्ये कमालीची नाराजी व्यक्त होत आहे.
रात्र निवारा केंद्र निर्माण करणे ही काळाची गरज आहे. परंतु बस स्थानक, रेल्वे स्थानक तसेच जिथे गरज आहे त्या ठिकाणी बांधणेे अपेक्षित आहे.पण सध्या घणसोलीत जे रात्र निवार्याचे काम चालू आहे. ते ठिकाण अडगळीच्या ठिकाणी चालू आहे. विशेष म्हणजे याठिकाणी मध्यमवर्गीय नागरिकांची वस्ती आहे.त्यामुळे रात्री अपरात्री येणार्या नागरिकांना याचा काहीही फायदा होणार नसल्याचे संजय अंकल सामाजिक संस्थेचे अध्यक्ष गणेश सकपाळ यांचे म्हणणे आहे.
नव्याने बांधण्यात येणारा रात्र निवारा केंद्र अडचणीच्या ठिकाणी असल्यामुळे येथे मध्यापिचा फायदा होऊन रात्र निवारा केंद्र ऐवजी दारू केंद्र निर्माण होणार असल्याचे भाकीत गणेश सकपाळ यांनी केला आहे.या ठिकाणी जर बहुउद्देशीय इमारत झाली असती तर नक्कीच वाचकांना वाचनालय व गरीबां साठी एखादे सभागृह निर्माण करून नागरिकांना छोटे मोठे कार्यक्रम करता आले असते असेही सकपाळ यांनी सांगितले.
याबाबत घणसोली विभाग कार्यालयाचे अभियंता समीर ठाकरे यांच्याशी संपर्क साधला असता,वाळू ऐवजी ग्रीटचा वापर होत असेल तर वाळूचा वापर करण्यास सांगतो व योग्य प्रकारची खाडी वापरण्यास सांगतो असे सांगितले.