दिपक देशमुख
नवी मुंबई : महानगरपालिकेने नवी मुंबईकरांना आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्याकरिता तीन रुग्णालयाची निर्मिती केली. परंतु सध्या त्या तीनही रुग्णालयात आरोग्य सेवेचा बोजवारा उडाला असून पालिका आयुक्तांपर्यंत आरोग्य सेवासंबंधी योग्य माहिती पुरविण्यासाठी एका वैद्यकीय समन्वयकाची गरज भासू लागली आहे. त्याचबरोबर रुग्णसेवा ज्ञानी असलेल्या नागरिकांची नगरसेवक वर्णी लावली गेली तर बर्यापैकी प्रश्न सुटतील अशी आशा व्यक्त केली जात आहे. दरम्यान, काही वैद्यकीय अधिकारी वरिष्ठांपर्यंत माहिती पुरवण्याचे प्रयत्न करतात परंतु त्यांनाच वरिष्ठ आरोपीच्या पिंजर्यात उभे करत असल्यामुळे कोणताही वैद्यकीय अधिकारी पुढे येत नसल्याचे आरोग्य सूत्रांनी सांगितले.
महापालिका स्थापन झाल्यानंतर वाशी येथे ३०० खाटाचे प्रथम संदर्भ रुग्णालय सुरू केले गेले. परंतु जशी जशी रुग्णांची संख्या वाढत गेली, तशी या रुग्णालयात अडचणी वाढत गेल्या. त्याचबरोबर ऐरोली व नेरूळ येथील १०० खाटाचे रुग्णालय चार वर्षापूर्वी सुरू करण्यात आले. तिथे अजूनही अपेक्षीत अशी आरोग्य सेवा देण्यास मनपा आरोग्य विभागाला अपयश आले आहे. विशेष म्हणजे महापौर,आमदार, आरोग्य सभापती पाहणी दौरा करुन समस्या जाणून घेतात. परंतु समस्या आजतागायत सुटल्या नसल्याचेही आरोग्य सूत्रांचे म्हणणे आहे.
वाशी येथील पालिका रुग्णालयात आजही सामान्य आजारावर असणारी औषध मिळत नाहीत. हातमौजे, टाके टाकायचे धागे कधी असतात तर कधी नसतात अशी परिस्थिती येथे नेहमीच दिसत आहे. तज्ज्ञ वैद्यकीय अधिकारी फार कमी असल्यामुळे व येण्यास धजावत नसल्यामुळे रुग्णांना भयानक त्रास होत असल्याचे येथील वातावरण आहे. ई सी जी,क्ष किरण, सोनोग्राफी यंत्रणा कधी चालू असते तर कधी बंद असते. शस्रक्रिया केंद्रामध्ये असणारी यंत्रणा जुनाट झाली आहे. त्यामुळे एखाद्या रुग्णाचे शस्त्रक्रिया करताना डॉक्टर देव पाण्यात बुडवून शस्त्रक्रिया करत आहेत. यामुळेच काही वेळा डॉक्टर शस्रक्रिया करण्यास नकार देत आहेत. आयसीयु, एन आय सी यु, ट्रामा केअर विभाग पूर्ण क्षमतेने काम करत नाहीत, अशी परिस्थिती या रुग्णालयात असल्याचे पालिका सूत्रांनी सांगितले. ऐरोली व नेरुळ येथील रुग्णालये सुरू होऊन चार वर्षे उलटून गेली, परंतु दोन्ही रुग्णालय माता बाल रुग्णालयाच्या बाहेर आली नाहीत. ही दोन्हीही रुग्णालये सुरू करण्यामागचा हेतू हा मनपा परिसरात चांगली आरोग्य सुविधा देणे हा उदात्त हेतू होता. परंतु आरोग्य विभाग व नगरसेवकांचा अभ्यास कमी पडल्यामुळे या दोन्ही रुग्णालयांना न्याय देण्यास मनपा अपयशी ठरली असल्याचे आरोग्य सूत्रांनी सांगितले. त्यामुळे गरीब व आर्थिक दुर्बल असणार्या नवी मुंबईकराना मुंबईसारख्या ठिकाणी जाऊन उपचार करण्यास जावे लागत असल्याचे वास्तव आहे.
या तीनही रुग्णालयात वैद्यकीय आधिकार्यांचा फार मोठा तुटवडा आहे. मनपा प्रशासन विभागाने गेल्या तीन वर्षापासून भरतीच्या अनेक जाहिराती काढल्या. परंतु वेतन कमी असणे व कंत्राटी पद्धतीने नियुक्ती होण्याच्या प्रकारामुळे तज्ञ वैद्यकीय अधिकारी रुजू होण्यास तयार नसल्याचेही आरोग्य सूत्रांनी आपले मत व्यक्त केले आहे.
या सर्व समस्या सोडवायच्या असतील तर ज्याचा आरोग्य सेवे विषयी परिपूर्ण अभ्यास आहे, अशा व्यक्तिला स्वीकृत नगरसेवक या पदावर नियुक्त करण्याची गरज भासू लागली आहे. सर्वसामान्य नगरसेवक किंवा नागरिकांना आरोग्य विषयक शब्द सांगता येतीलच असे नाही. त्यामुळे ज्यांनी वैद्यकीय विभागाची पदवी प्राप्त केली असेल अशा तज्ञ नागरिकांना नगरसेवक पदावर बसविण्याची मोठी गरज असल्याचे नगरसेवक मनोज हळदणकर यांनी सांगितले. त्याच बरोबर आयुक्ताबरोबर थेट संबंध प्रस्थापित करता येतील अशा समन्वयकाची गरज आहे. तरच आरोग्य विभागतील समस्या बर्यापैकी कमी होतील असे सांगण्यात येत आहे.
आरोग्य विभागातील काही वैद्यकीय अधिकारी रुग्णालयातील समस्याविषयी वरिष्ठां पर्यंत स्वच्छ भावनेने सांगण्याचा प्रयत्न करत आहेत. परंतु त्यांनाच वरिष्ठ तोंडघशी पाडत असल्याचे वैद्यकीय अधिकारी सांगत आहेत. त्यामुळे कोणताही वैद्यकीय अधिकारी पुढे पुढे करत नसल्याचे एकंदरीत दिसुन येत आहे.