मुंबई :- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने गेल्या चार वर्षाच्या सत्ताकाळात जनतेचा विश्वासघात केला आहे. गेल्या चार वर्षात या सरकारने निर्माण केलेली परिस्थिती उत्सव साजरे करण्यासारखी नाही तर शोक व्यक्त करण्यासारखी आहे अशी घणाघाती टीका अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे प्रवक्ते डॉ. अभिषेक मनु सिंगवी यांनी केली आहे.
मुंबई येथे पत्रकारपरिषद परिषदेला संबोधित करताना डॉ. सिंघवी यांनी आकडेवारी देऊन मोदी सरकारच्या खोट्या जाहिरातबाजीचा पंचनामा केला. मोदी सरकारने गेल्या चार वर्षात देशातल्या नागरिकांचा विश्वासघात करून भ्रष्टाचाराला खतपाणी घालण्याशिवाय कोणतेही काम केले नसून चार वर्षपूर्तीचा उत्सव नाही शोक केला पाहिजे अशी परिस्थिती आहे युपीए सरकारच्या काळात कृषी विकास दर 4.2 होता तो मोदी सरकार्च्या काळात 1.9 टक्क्यांवर आला आहे, मोदींनी उत्पादन खर्चावर आधारित 50 टक्के अधिक हमीभाव देण्याचे आश्वासन दिले होते मात्र निवडणुकीनंतर तीनच महिन्यात सर्वोच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र दाखल करून तो देणे शक्य नाही असे सांगून देशातील शेतक-यांचा विश्वासघात केला. देशात साखरेचे विक्रमी उत्पादन झाले असताना सरकारने पाकिस्तानातून 15 हजार मेट्रीक टन साखर आयात केली. मोदींनी दरवर्षी दोन कोटी लोकांना नोक-या देण्याचे आश्वासन दिले होते मात्र नोटाबंदीमुळे 15 लाख नोक-या गेल्या. अनेक बड्या कंपन्यांनी नोकरकपात केली आहे. देशातील विद्यापीठात विद्यार्थ्यांचा आवाज दाबण्याचे काम सुरु आहे.
परदेशातला काळा पैसा परत आणून प्रत्येक नागरिकाच्या खात्यात 15 लाख रूपये देण्याची घोषणा पंतप्रधानांनी केली होती त्यांच्या सरकारच्या चार वर्षाच्या काळात काळा पैसा तर आला नाही उलट नीरव मोदी, विजय माल्या मेहुल चोकसी सारखे लोक घोटाळे करून देशातील बँकांचे 61 हजार कोटी रूपये घेऊन देशाबाहेर पळाले त्यांच्यावर हे सरकार काहीच कारवाई करीत नाही. राफेल विमान खरेदीत मोठा घोटाळा झाला असून देशाचे 41 हजार कोटींचे नुकसान झाल्याचा आरोप त्यांनी केला. सरकारी आकडे पाहिल्यावर मोदी सरकार गेल्या चार वर्षात सर्वच आघाड्यांवर अपयशी ठरल्याचे स्पष्ट झाले असून ही उत्सव साजरा करण्याची नाही तर दुःख व्यक्त करण्याची वेळ आहे असे डॉ. सिंघवी म्हणाले.
या पत्रकारपरिषदेला महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खा. अशोक चव्हाण, प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत, सरचिटणीस पृथ्वीराज साठे, सचिव जिशान अहमद उपस्थित होते.