दिपक देशमुख
नवी मुंबई : महानगरपालिकेच्या कोपरखैरणे येथील मनपा शाळेचा गेट पडून एक बारा वर्षीय मुलगा मृत्यूमुखी पडल्याची घटना नुकतीच घडली आहे . त्या मुलाच्या नातेवाईकांची आर्थिक स्थिती कमजोर असून त्याच्या कुटुंबियांना मनपाने ठेकेदारांच्या बिला मधून २० लाख रुपये द्यावेत तसेच फोर्टीज रुग्णालयावर कारवाई करावी अशी मागणी भाजप नवी मुंबई जिल्हा अध्यक्ष रामचंद्र घरत यांनी केली आहे. जर त्या कुटुंबाला भरपाई दिली नाहीतर लवकरच उपोषणाला बसणार आसल्याचेही जिल्हा अध्यक्ष रामचंद्र घरतांनी स्पष्ट केले.
मागील आठवड्यात कोपरखैरणे ,सेक्टर ११ येथील मनपाच्या शाळेचा गेट पडून सुनील चौधरी हा मुलगा मृत्युमुखी पडला होता. तर निलेश देवरे हा लहानगा जखमी झाला होता. मृत्युमुखी पडलेल्या सुनिल चौधरीच्या कुटुंबाचे सांत्वन रविवारी भाजपच्या वतीने करण्यात आले .त्यावेळी जिल्हा अध्यक्ष घरत पत्रकारांशी बोलत होते. तसेच जखमी निलेश देवरे याच्या घरीही भाजप पदाधिकार्यांनी भेट देऊन जखमींची विचारपूस केली. घरत यांनी अशीही मागणी केली की,मनपा आयुक्तांनी या प्रकाराची योग्य ती चौकशी करून जबाबदार असणार्या अधिकार्यावर कारवाई करून ठेकेदारावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा नाहीतर आम्ही मुख्यमंत्री व शिक्षण मंत्र्यांना सांगून कारवाई करण्यास भाग पाडू असे सांगितले. तसेच मृत्युमुखी पडलेल्या सुनील चौधरीवर फोर्टीज रुग्णालयात योग्यवेळी उपचार केले असते तर सुनील जगू शकला असता. त्यामुळे त्या रुग्णालयावरही कारवाई करावी अशी मागणी नवी मुंबई जिल्हा युवा मोरच्यांचे सचिव हरीश पांडेय यांनी केली. सांत्वन करणार्या मध्ये जिल्हा उपाध्यक्ष रुपेश कोटकर, विजय मिश्रा,सचिव आप्पा मुळे, युवा पदाधिकारी हरीश पांडेय, निकेतन पाटील,गणेश कांबळे,संदीप पाटील आदींसह मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते उपस्थित होते.