सौरभला न्याय मिळालाच पाहिजे..मनसेची मागणी
नवी मुंबई : शुक्रवार दि.२५ मे २०१८ रोजी कोपरखैरणे बोनकोडे येथे महापालिके तर्फे नुकत्याच बांधण्यात आलेल्या शाळेच्या इमारतीचा प्रवेशद्वार कोसळून कु.सौरभ चौधरी या पाचवीतील विद्यार्थ्याचा दुर्दैवी अंत झाला. सौरभ सोबत असणारा त्याचा मित्र देखील जबर जखमी होऊन त्याच्या पायाचे हाड मोडले आहे. याविरोधात मनसेने आक्रमक भूमिका घेत आज मनपा आयुक्त एन.रामास्वामी यांच्या दालनात शहर अध्यक्ष गजानन काळे यांच्या मार्गदर्शनाखाली ठिय्या आंदोलन करून आयुक्तांना घेराव घेतला. याप्रसंगी संबंधित विद्यार्थ्याच्या मृत्यूबाबत आयुक्त एन.रामास्वामी यांना जाब विचारून संबंधित शाळेच्या कंत्राटदाराला काळ्या यादीत टाकण्यात यावे, मनपा अभियंत्याला तात्काळ निलंबित करण्यात यावे, मृत विद्यार्थ्याला २० लाखांची आर्थिक मदत करण्यात यावी व जखमी विद्यार्थ्याला देखील आर्थिक सहाय्य करण्यात यावे, सदर घटनेबाबत विशेष चौकशी समिती नेमण्यात यावी व सदर मनपा शाळेच्या इमारतीचा बांधकाम लेखा अहवाल जाहीर करण्यात यावा अशा मागण्या यावेळी मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी आयुक्त एन.रामास्वामी यांच्यासमोर केल्या. याप्रसंगी अतिरिक्त आयुक्त मोहन डगावकर देखील उपस्थित होते.
यावेळी मनसैनिकांनी आयुक्त एन.रामास्वामी यांच्या दालनात जोरदार घोषणाबाजी करत “मनपा प्रशासनाचा निषेध असो, निषेध असो”, “कंत्राटदाराला काळ्या यादीत टाका, काळ्या यादीत टाका”, “या मनपा प्रशासनाचे करायचे काय, खाली डोकं वरती पाय” या व अशा विविध घोषणा देऊन मनसैनिकांनी महापालिका परिसर दणाणून सोडला. मनसेच्या मागण्यांना सकारात्मक प्रतिसाद देत आयुक्त एन.रामास्वामी यांनी उप अभियंता संतोष उनवणे व कनिष्ठ अभियंता अभय गावित यांना तात्काळ निलंबित करण्याचे लेखी पत्र दिले.
गेल्या एक वर्षापासून सदर शाळेची इमारत बंद अवस्थेत आहे. चालू शैक्षणिक वर्षात ही शाळा सुरु होणार होती. मात्र शाळा सुरु होण्यापूर्वीच शाळेचा गेट कोसळून पडल्याने सदर कंत्राटदाराने अत्यंत निकृष्ट दर्जाचे काम केल्याचे सिद्ध होत असल्याचे मनसेने प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे. सदर शाळेचे कंत्राट अश्विनी इन्फ्रास्ट्रक्चर या कंत्राटदाराकडे होते. त्यामुळे या कंत्राटदाराला तात्काळ मनपाने काळ्या यादीत टाकण्यात यावे अशी मागणी मनसेने केली. तसेच संबंधित मनपा अभियंत्याने देखील कर्तव्यात कसूर करून सदर शाळेच्या बांधकामाकडे दुर्लक्ष केल्याचे मनसेने प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे. त्यामुळे अभियंत्याला देखील निलंबित करण्याची मागणी मनसेने केली.
सदर घटना नवी मुंबई मनपा प्रशासनासाठी अत्यंत शरमेची बाब असून तितकीच क्लेशदायक असल्याचे मनसे शहर अध्यक्ष गजानन काळे यांनी प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे. या दुर्दैवी घटनेतील विद्यार्थी व त्याच्या कुटुंबियांना न्याय मिळवून दिल्याशिवाय मनसे स्वस्थ बसणार नसल्याचे गजानन काळे यांनी प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.
या आंदोलनात मनसेचे उपशहर अध्यक्ष निलेश बाणखेले, विनोद पार्टे, महिला सेनेच्या डॉ.आरती धुमाळ, अनिथा नायडू, चित्रपट सेनेचे श्रीकांत माने, विद्यार्थी सेनेचे सविनय म्हात्रे, संदेश डोंगरे, सनप्रीत तुरमेकर, रोजगार विभागाचे आप्पासाहेब कोठुळे, रुपेश कदम, शशिकांत कळसकर, विनय कांबळे, श्याम ढमाले, स्वप्निल गाडगे, प्रसाद घोरपडे, सुहास मिंडे, विशाल भिलारे, निखील थोरात, अजय सुपेकर, नितीन नाईक, आकाश पोतेकर, मनोज क्षीरसागर, योगेश कुंभार, उमेश गायकवाड, अर्जुन देवेंद्र, भूषण बारवे व मोठ्या संख्येने मनसैनिक उपस्थित होते.