नवी मुंबई :- नुकताच खासदार राजन विचारे यांच्या पाहणी नंतर केलेल्या ठाणे बेलापूर मार्गावरील उड्डाणपूल व भुयारी मार्ग मा. मुख्यमंत्री यांच्या हस्तेउद्घाटन करून वाहतुकीसाठी खुले करण्यात आलेले आहे. या मार्गावरील वाहनचालकाना हे अंतर आत्ता कमी वेळेत लवकर गाठता येते. परंतु एरोली -मुलुंड मार्गावरील वाहनांमुळे एरोली रेल्वे पुलाखाली रस्ता येथील वाहनांना अपुरा पडत असल्याने येथे वाहतूक कोंडी होऊन कमी वेळेत पेललेला रस्ता येथील वाहतूक कोंडीमुळे तात्कळत राहावे लागते. त्यामुळे या मार्गावर पर्यायी मार्गाची आवश्यकता असल्याने खासदार राजन विचारे यांनी हे लक्षात घेऊन या नव्याने होणाऱ्या घणसोली ते ऐरोली पामबीच मार्गासाठी पुढाकार घेऊन गेल्या 9 वर्षांपासून रखडलेल्या घणसोली – एरोली पामबीच या नवीनरस्त्याच्या कामाची पाहणी आज कांदळवन आयुक्त वासुदेवन व महापालिका अधिकारी यांच्या सोबत करण्यात आली. त्यावेळी नवीमुंबई महापालिकेचे विरोधी पक्षनेते विजय चौगुले, गटनेते द्वारकानाथ भोईर, नगरसेवक चेतन नाईक, राजू कांबळे, ममित चौगुले, जगदीश गवते, सुरेश सकपाळ तसेच आर एफ ओ एम एस बोटे., डी एफ ओ एम एम पंडित राव व इतर अधिकारी वर्ग उपस्थित होते.
या पामबीच रस्त्याचे तीन-तीन लेनचे काम सिडकोने सन २००९ पर्यंत पूर्ण करून घणसोलीपर्यंत करून सोडले कारण, पुढील भागात कांदळवन असल्याने या रस्त्याला परवानगी मिळत नसल्याने उर्वरित १.९५ किमी चा रस्ता रखडला होता. या पलीकडील बाजूस मुलुंड- ऐरोली पुलापर्यंत हा रस्ता तयार झाला होता. यासाठी गेले ९ वर्षे हा रस्ता रखडून ठेवल्याने महापालिकेने यासाठी पुढाकार घेऊन दि.१४/१२/२०१६ रोजी घणसोली नोड सिडकोकडून महापालिकेने हस्तांतरित करून घेतला. या मार्गावर केबल स्टे ब्रिज बांधावा यासाठी महापालिकेने ८०० कोटीचा आराखडा तयार केला. परंतु हा ब्रिज खर्चिक असल्याकारणाने महापालिकेने पुन्हा हा ब्रिज एलीव्हेटेड करावा यासाठी २५० कोटीचा प्रस्ताव तयार केला. परंतु कांदळवन असल्याकारणाने याची परवानगी आवश्यक असल्याकारणाने कांदळवन आयुक्त वासुदेवन यांच्यासोबत पाहणी करून याचे महत्व समजवून दिले. खासदार राजन विचारे यांनी हा ब्रिज बांधल्यास शहराअंतर्गत असलेली वाहतूक या मार्गे वळवू शकतील व ठाणे – बेलापूर मार्गावरील ऐरोली रेल्वे ब्रिज खालील वाहतूक कोंडी त्यामुळे बऱ्याच प्रमाणात कमी होईल. असे कांदळवन आयुक्त वासुदेवन यांना पटवून दिले. त्यांनी या रस्त्याला परवानगी देण्याची अनुकुलता दर्शविली असून तसा प्रस्ताव आम्हास सादर करावा अशी महापालिका अधिकाऱ्यांना सूचना दिली. त्यावेळी या प्रस्तावास महासभेत मंजुरी मिळताच आपणास सादर करू असे महापालिका अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.
चौकट –
किनारी व सागरी जैवविविधता केंद्राचा खासदार निधीतून विकास करणार – खासदार राजन विचारे.
नव्याने विकसित करण्यात आलेल्या किनारी व सागरी जैवविविधता केंद्राला आज खासदार राजन विचारे यांनी भेट देऊन फ्लेमिंगो तसेच इतर विविध पक्षी पाहण्याची संधी घेऊन जैवविविधतेचे सुंदर दर्शन घेतले. त्यामुळे येथील पर्यटकांना या जैवविविधतेचे सुंदर दर्शन घडावे यासाठी याठिकाणी उत्तम गार्डन, जेटी व लाईटची व्यवस्था करण्यासाठी आपला खासदार निधी देण्याचे मान्य केले.