टिळक भवन येथे बुथ कमिट्यांच्या विधानसभा समन्वयकांची बैठक संपन्न
मुंबई :- काँग्रेसचा कार्यकर्ता प्रत्येक बूथवर भाजपच्या पगारी कार्यकर्त्यांचा पराभव करेल असा ठाम विश्वास महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खा. चव्हाण यांनी व्यक्त केला.
खा. अशोक चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली आज टिळक भवन, दादर येथे बुथ कमिट्यांच्या विधानसभा समन्वयकांची बैठक पार पडली. सदर बैठकीला राज्यभरातील 288 विधानसभा मतदारसंघाचे बुथ कमिटी समन्वयक उपस्थित होते. प्रदेशाध्यक्षांनी राज्यातील सर्व विधानसभा मतदारसंघातील बुथ कमिटींच्या कामाचा आढावा घेतला. यावेळी बुथ समन्वयकांना मार्गदर्शन करताना खा. चव्हाण म्हणाले की, देशभर भाजपा सत्ता आणि पैशाच्या जोरावर निवडणूक यंत्रणा उभारून प्रत्येक ठिकाणी साम, दाम, दंड, भेद याचा वापर करत आहे. प्रत्येक बुथवर भाजपने पगारावर लोकांची नियुक्ती केली आहे. प्रशासन आणि यंत्रणांचा प्रचंड मोठ्या प्रमाणात दुरुपयोग करून निवडणुकीच्या निकालांवर प्रभाव टाकण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. काँग्रेस पक्षाच्या प्रत्येक कार्यकर्त्याला ही लढाई निकराने लढावी लागणार आहे. ही लढाई केवळ काँग्रेस पक्षाकरिता नसून देशाची लोकशाही संविधान आणि देश वाचविण्यासाठी आहे. काँग्रेसच्या लोकशाही विचारांचे समर्पित किमान 10 कार्यकर्ते प्रत्येक बुथवर नेमण्याची प्रक्रिया सुरु असून ती लवकरच पूर्णत्वास जाईल असे खा. चव्हाण म्हणाले.
या बैठकीला खा. हुसेन दलवाई ,आ. भाई जगताप, आ. आनंदराव पाटील, महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा चारुलता टोकस, प्रदेश सरचिटणीस अॅड गणेश पाटील, माजी खा. तुकाराम रेंगे पाटील, राजेश शर्मा, पृथ्वीराज साठे, प्रदेश प्रवक्ते अतुल लोंढे, प्रदेश काँग्रेसचे सचिव व राज्य सहसमन्वयक राजाराम देशमुख, सचिव प्रकाश सातपुते, तौफिक मुलाणी यांच्यासह विभागीय समन्वयक आणि विधानसभा समन्वयक उपस्थित होते.