नवी मुंबई, – प्रजापिता ब्रम्हाकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालय आणि नवी मुंबई पोलिस आयुक्तालयाच्यावतीने जागतिक तंबाखू मुक्ती दिनाचे औचित्य साधून आज (ता.३०) बुधवारी वाशी येथील आत्मविश्वास केंद्र वाशी सेक्टर-११ येथे तणाव मुक्त जीवन या शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबीरात १०० हून अधिक वरिष्ठ अधिकारी कर्मचारी सहभागी झाले होते. मनावरील नियंत्रण राखून जीवन मान बदलण्यासाठी ध्यान साधने विषयी प्रत्याक्षिके दाखविण्यात आली.
या कार्यक्रमाला राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस डॉ.संजीव गणेश नाईक, परिमंडळ-१ चे पोलिस उपायुक्त डॉ.सुधाकर पाठारे, ब्रम्हाकुमारी सेवा संस्थेच्या नवी मुंबईच्या संचालिका शिलादिदी, ब्रम्हाकुमारी संस्थेच्या महाराष्ट्र आणि आंध्रप्रदेशच्या प्रमुख संतोषीदिदी, प्रितीदिदी, शुभांगीदिदी, पोलिस अधिकारी प्रदीप जाधव त्याच बरोबर इतर वरिष्ठ पोलिस अधिकारी उपस्थित होते.
राष्ट्रवादीचे प्रदेश सरचटिणीस डॉ.संजीव नाईक यांनी नवी मुंबई शहर एकतेचे आणि समानतेची शिकवण देणारे शहर आहे. शहराच्या सुरक्षेचा कणा असणार्या पोलिसांच्या आत्महत्याचे प्रकार वाढत आहेत, हा प्रकार समाजा विषयी चिंतेचा विषय आहे. ब्रम्हाकुमारी संस्थेतर्फे देण्यात आलेले तणाव मुक्तीची ध्यान साधना पोलिसांनी नियमित केल्यास त्यांच्यातील अध्यात्मिक शक्ती वाढून त्यांना तणाव मुक्त जीवन जगता येईल, अशी अपेक्षा व्यक्त केली.
प्रजापिता ब्रम्हाकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालयाच्यावतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही सलग ४ थ्या वर्षी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती नवी मुंबईच्या संचालिका शिलादिदी यांनी दिली. नवी मुंबई पोलिसांचे काम हे संपुर्ण महाराष्ट्रात अत्यंत चांगल्या प्रकारे सुरु आहे. जनतेचे रक्षण करणार्या पोलिसांना चांगले आणि निरोगी आयुष्य मिळावे यासाठी त्यांचे मनोबल वाढविण्याच्या अनुषंगाने तणाव मुक्ती विषयी गुरुकिल्ली देण्यात आल्याचे शिलादिदी म्हणाल्या.
नवी मुंबई परिमंडळ-१ चे पोलिस उपायुक्त डॉ.सुधाकर पाठारे यांनी पोलिस आणि नागरिक यांच्या एक समन्वयाचे नाते निर्माण होण्याची गरज आहे. पोलिस हे देखील एक नागरिक असून त्यांना समाजाने आधार देऊन त्यांचे मनोबल वाढविण्याची गरज असल्याचे सांगत ब्रम्हाकुमारी संस्थेचे ध्यान साधना शिबीर मोलाचे ठरेल, असा विश्वास व्यक्त केला.