नवी मुंबई :- आगामी पावसाळी कालावधीच्या अनुषंगाने महापालिका आयुक्त डॉ. रामास्वामी एन. यांनी आज अतिरिक्त आयुक्त मोहन डगांवकर व रमेश चव्हाण यांच्या समवेत संबंधित अधिका-यांसह नालेसफाई कामांची प्रत्यक्ष पाहणी केली व अंतिम टप्प्यात असलेले नालेसफाईचे काम जलदगतीने पूर्ण करण्याचे निर्देश दिले.
या पाहणी दौ-यात त्यांनी सेक्टर 17 वाशी येथील शहरातील मुख्य नाला, अरेंजा कॉर्नर ते कोपरी पेट्रोल पंप येथील मोठा नाला तसेच सेक्टर 28 व 29 वाशी येथील नालेसफाईची प्रत्यक्ष पाहणी केली. त्याचप्रमाणे नेरुळ येथे हर्डीलिया कंपनीजवळील नैसर्गिक नाल्याच्या, बँक ऑफ इंडिया कॉलनीजवळ टाटा प्रेस नजीकच्या नाल्याच्या आणि सी.बी.डी. बेलापूर सेक्टर 2 ते सेक्टर 9 येथे असलेल्या मोठ्या नाल्याच्या साफसफाई कामांची सद्यस्थिती प्रत्यक्ष पाहणीव्दारे अवलोकन केली.
मान्सुन केरळमध्ये दाखल झाला असून केव्हाही मुंबईत दाखल होईल याची दखल घेऊन नालेसफाईची अंतिम टप्प्यात असलेली कामे त्वरीत पूर्ण करण्याचे आयुक्तांनी आदेश दिले. नाल्यातून काढण्यात येणारा गाळ लगेच नवी मुंबई महानगरपालिकेच्या तुर्भे येथील घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पस्थळी घेऊन जाण्याची कटाक्षाने दक्षता घ्यावी असे त्यांनी या पाहणी दौ-यादरम्यान निर्देशित केले.
पावसाळी कालावधीत नागरिकांना कोणत्याही प्रकारची अडचण भासू नये याकरीता महापालिका आयुक्त डॉ. रामास्वामी एन. यांच्या मार्गदर्शनाखाली नवी मुंबई महानगरपालिकेने सर्वोतोपरी कार्यवाही केली असून पावसाळी कालावधीत उद्भवणा-या आकस्मिक अडचणींवर मात करण्यासाठी महापालिका मुख्यालयातील 365 दिवस 24 X 7 सुरु असणा-या मध्यवर्ती आपत्ती नियंत्रण कक्षाप्रमाणेच 30 सप्टेंबर पर्यंत वाशी, ऐरोली, सी.बी.डी, बेलापूर व नेरुळ येथील अग्निशमन केंद्रांस्थळी अहोरात्र कार्यरत राहणारे आपत्कालीन नियंत्रण कक्ष स्थापन केले आहेत. त्याठिकाणी नागरिक पावसाळी कालावधीत आपल्याला भासणा-या अ़डचणींविषयी तक्रार करू शकतात तसेच त्याठिकाणी उपलब्ध असणा-या यंत्रणेमार्फत तक्रारींचे तात्काळ निवारण करण्यात येईल. अशाच प्रकारचे मदतकार्य करणारे कक्ष आठही विभाग कार्यालयात सुरु करण्यात आले आहेत.
तरी नागरिकांनी पावसाळी कालावधीत कोणतीही अडचण उद्भवल्यास महानगरपालिकेच्या नियंत्रण कक्षाशी 1800222309 / 1800222310 या टोल फ्री क्रमांकावर विनामूल्य संपर्क साधावा व कोणत्याही प्रकारच्या अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन महापालिका आयुक्त डॉ. रामास्वामी एन. यांच्या वतीने करण्यात येत आहे.