निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर राजकारणात आयाराम-गयाराम हा पायंडा आता समाजव्यवस्थेनेही स्विकारला आहे. एप्रिल २०१९ ला देशात लोकसभेच्या आणि ऑक्टोबर २०१९ला महाराष्ट्रात विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणूका होणार आहेत. सत्ताप्राप्ती हेच एकमेव ध्येय आता राष्ट्रीय आणि राजकीय पक्षांचे असल्यामुळे जिंकून येण्याच्या निकषावर उमेदवारी देण्यात येते. त्यामुळे पक्षाकरिता इमानेइतबारे राबणाऱ्या कार्यकर्त्यांना तसेच पदाधिकाऱ्यांना निवडणूकीत तिकीट मिळेलच याची खात्री नसते. पाच वर्षे पक्षसंघटनेच्या व्यासपिठावरून जनसेवा करत पक्षाला जनाधार व स्वत:ला नावलौकिक मिळवून देणाऱ्या कार्यकर्त्याचे व पदाधिकाऱ्यांचे तिकिट अखेरच्या क्षणी कापले जाते आणि पक्षामध्ये तिकिट वाटपाच्या अंतिम टप्प्यात अन्य पक्षांतून आलेल्यांना तिकिट जाहिर होते. ज्या राजकारण्यांच्या विरोधात सातत्याने पक्षसंघटना वाढविली, जनसामान्यांमध्ये आपले वेगळे अस्तित्व निर्माण केले, त्याच माणसाचा प्रचार करण्याची दुर्देवी वेळ पक्षामुळे कार्यकर्त्यावर आणि पदाधिकाऱ्यांवर येते, त्यावेळी त्यांच्या चेहऱ्यावर निश्चितच सुतकी अवकळा पसरलेली असते. पक्षनिष्ठेमुळे अशा वेळी पक्षात आलेल्या माणसाचा जीव तोडून प्रचार करावाच लागतो. लोकशाहीमध्ये आता राजकारण प्रगल्भ होवु लागल्याने अन्य पक्षातून कोणीतरी येवून आपले तिकीट कापणार याची कुणकूण लागताच अन्य पक्षाशी संपर्क साधून आपल्या तिकिटीची बेगमी त्यांच्या पक्षातून होते का याची चाचपणी त्यांच्याकडून करण्यात येते.
राजकारण हा आता एक बेभरवशाचा प्रकार म्हणून ओळखला जावु लागला आहे. पैशेवाल्यांच्या आहारी पक्षसंघटना जावू लागल्याने खिशात लक्ष्मी घेवून वावरणाऱ्यांच्या आहारी पक्षसंघटना जावू लागल्या आहेत. त्यामुळे आयुष्यभर पक्षासाठी राबणाऱ्या कार्यकर्त्यांची व पदाधिकाऱ्यांची आयुष्यातील उतारवयात झालेली वाताहत सर्वच पक्षामध्ये पहावयास मिळत आहे. त्यातूनच आता पक्षनिष्ठा हा प्रकार कालबाह्य ठरून नेत्याशी निष्ठा हा प्रकार गेल्या दशकभराच्या कालावधीत वाढीस लागला आहे. पक्षाशी इमानदार राहून पदरात काहीही पडणार नाही याची खात्री झाल्याने नेत्याशी इमानदार राहून आपले अर्थकारण गतीमान करण्याचा प्रगल्भ विचार कार्यकर्त्यांकडून केला जात आहे.
लोकसभा आणि विधानसभा निवडणूका या खर्चिक असल्याने व परिस्थितीने नवकोटनारायण असलेले कार्यकर्ते व पदाधिकारी या फदांत बंडखोरी करण्याच्या अथवा त्रास देण्याच्या फंदात पडत नाही. मात्र आपण ज्या नेत्यांशी आपण सतत निष्ठावान राहिलो आहोत, त्या नेत्याने पंचायत समिती, जिल्हा परिषद, नगर पालिका, महानगरपालिका निवडणूकांमध्ये पाठराखण करावी, आपल्याला उमेदवारी मिळवून द्यावी अशी अपेक्षा कार्यकर्त्याची असते.पण या निवडणूकांमध्ये निराशा झाल्यास तसेच आपल्या नेत्याकडून अपेक्षाभंग झाल्यास त्याचा वचपा आपल्या पध्दतीने काढण्याचे षडयंत्र कार्यकर्ता विधानसभा व लोकसभा निवडणूकीच्या वेळी साकारताना रात्रीचा दिवस एक करतो.
आता मतदारसंघाची पुर्नरचना होत असते. पूर्वीच्या काळात अवाढव्य असणारे मतदारसंघ वाढत्या लोकसंख्येमुळे आकारमानाने कमी होवू लागले आहे. विधानसभा मतदारसंघाचे कमी होणारे कार्यक्षेत्र ही आता प्रस्थापित व मातब्बर राजकारण्यांसाठी धोक्याची घंटा ठरू लागले आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकीत तिकिट न मिळाल्याने पक्षावर तसेच स्थानिक नेतेमंडळींवर नाराज असलेली मंडळी विधानसभा निवडणूकीत पक्षाच्या तसेच स्थानिक नेतेमंडळींच्या विरोधात काम करून आपला राजकीय हिशोब चुकता करत असतात. दुसऱ्या पक्षातील नेतेमंडळी ही अन्य पक्षात नाराज व असंतुष्ठ कोणकोण आहेत याचा नेहमीच शोध घेत असतात. विधानसभा मतदारसंघ आकाराने कमी होवू लागल्याने तीन-चार हजार मतांची बेगमी जुळवू शकणारे कार्यकर्ते ऐन निवडणूकीच्या धामधुमीत फुटल्यास स्थानिक नेतेमंडळींना घाम फुटतो. मागील निवडणूक काळात जिंकण्यासाठी नेतेमंडळींनी कार्यकर्त्यांना विविध आश्वासने दिलेली असतात. निवडणूक झाल्यावर त्या आश्वासनांचा नेतेमंडळींना विसर पडतो. मात्र कार्यकर्ता ती आश्वासने कधीही विसरत नाही. कारण नेत्यांनी दिलेल्या आश्वासनांवरच कार्यकर्त्यांनी सुखद स्वप्नांची जुळवणी केलेली असते. आपल्या सभोवतालच्या लोकांना त्यांनी आपल्याला नेत्यांनी दिलेली आश्वासने सांगितलेली असतात. अशावेळी नेत्यांकडून आश्वासनांची पूर्तता न झाल्यास अथवा नेत्यांना आश्वासनांचा विसर पडल्यास कार्यकर्त्यांचे जवळच्या जनसामान्यांमध्ये हसे होते, उपहासाचे टोमणे सहन करावे लागतात. अपमानास्पद, हेटाळणीचे सूर ऐकावयास मिळतात. तो अपमान कार्यकर्ता कधीही विसरत नाही. कार्यकर्ता नेतेमंडळींसमोर वावरताना सर्व काही विसरल्याचे आविर्भाव आणत असला तरी तो प्रत्यक्षात तो काही विसरलेला नसते. त्याचे दु:ख हे अश्वत्थाम्याचे दु:ख असते. झालेला अपमान तो कधी विसरत नाही आणि तो वावरत असलेला जवळचा समाज त्याला सतत टोमणे मारून त्याला अपमानाची सतत आठवण करून देत असतात. लोकसभा मतदारसंघ मोठा असल्याने त्या पातळीवरील प्रस्थापित नेतेमंडळींना स्थानिक कार्यकर्त्याची नाराजी फारशी उपद्रवी ठरत नाही. मात्र आमदारांना, नगरसेवकांना, जिल्हा परिषद सदस्यांना निवडणूक काळात नाराज कार्यकर्त्याची उफाळून आलेली नाराजी कितपत त्रासदायक ठरते याची कल्पनाही करणे अवघड आहे. आयुष्यभर स्वाभिमान बाळगून ताठपणे वावरणाऱ्या नेतेमंडळींना अशावेळी कणाहीन होवून कार्यकर्त्याची मनधरणी करताना उघडपणे सर्वाना पहावयास मिळतो.
कार्यकर्त्यामध्ये वाढत चाललेली स्वार्थीपणाची भावना त्या त्या भागातील राजकारण्यांसाठी धोक्याची घंटा आहे. प्रशासन दरबारी सतत पाठपुरावा करून, अधिकाऱ्यांच्या दालनात चपला झिजवून लोकप्रतिनिधी इतक्या कोटीची विकासकामे आपण प्रभागासाठी मंजूर करून आणली असे ज्या वेळी अभिमानाने सांगतो, त्याचवेळी त्याच्या कार्यकर्त्यांच्या मनामध्ये विकासकामांच्या निधीमध्ये दहा टक्के कमिशन आपला लोकप्रतिनिधी कमवित असेल तर आपल्यालाही त्यांने पैशाची मदत केलीच पाहिजे, आपला तो अधिकारच आहे अशी भावना कार्यकर्त्यामध्ये आपसात उघडपणे बोलली जाते.
आताच्या काळात नि:स्वार्थी कार्यकर्ते लाभणे दुरापास्त झाले आहे. ज्या नेत्यामध्ये नि:स्वार्थी कार्यकर्ते असतील तो नेता लोकशाहीतील खऱ्या अर्थाने धनवान मानावा लागेल. नेत्यावर निष्ठा नाही तर श्रध्दा ठेवणाऱ्या कार्यकर्त्याची संख्या आजही लक्षणीय आहे. परंतु नेतेमंडळींकडून दखल घेतली न गेल्यास अथवा बाहेरून आलेल्या स्वार्थी कार्यकर्त्याचीच नेत्याकडून उठबस होवून आपली उपेक्षा झाल्यास हे नि:स्वार्थी व प्रामाणिक कार्यकर्ते नेत्याच्या छावणीतून काढता पाय घेतात, नेत्याने आपल्याला अडगळीत टाकले असल्याची भावना त्यांच्या मनामध्ये निर्माण होते. नेतेमंडळींना वेळीच ही बाब लक्षात आल्यास तो नेता खरोखरीच नशिबवान म्हणावा लागेल. परंतु अनेक स्वार्थी व चमकेश कार्यकर्त्याचा गोतावळा पाहून नेत्याला आपल्या नि:स्वार्थी व प्रामाणिक कार्यकर्त्याचा विसर पडल्यास त्या नेत्याची नजीकच्या काळात राजकीय अधोगती निश्चित समजावी. राजकारणात स्वार्थी व चमकेश कार्यकर्त्यांचा वाढता वावर नेतेमंडळींसाठी घातक बाब ठरू लागली आहे. नेत्याशी प्रामाणिक राहूनही चमकेश मंडळींना घरात व आपल्याला दारात स्थान मिळाल्याचे शल्य प्रामाणिक कार्यकर्ता कधीही विसरत नाही. त्याच्या हताशपणाचा फायदा विरोधी पक्षाने उचलल्यास राजकीय नेत्याची तळी भरण्यास फारसा वेळ लागत नाही.
-सुवर्णा खांडगेपाटील