दीपक देशमुख
नवी मुंबई :घणसोली विभाग कार्यालयाच्या विद्युत विभागातील कर्मचार्याना पावसाळा सुरू झाला तरी सुरक्षात्मक साधने संबंधित ठेकेदाराने दिली नसल्याने त्या कर्मचार्यामध्ये संताप व्यक्त होत आहे.सुरक्षात्मक साहित्य दिली नसल्याने एखादी अघटित घटना घडल्यास त्याला जबाबदार कोण असा सवाल विचारला जात आहे. दरम्यान या विद्युत कर्मचार्याना गेल्या तीन वर्ष्या पासून सुरक्षात्मक साहित्य मिळलेले नसल्याचे उघडकीस आले आहे.यावर आयुक्तांनीच लक्ष घालावे अशी मागणी होत आहे.
पावसाला सुरू होण्या अगोदर ठेकेदारांनी विद्युत कर्मचार्यांना गम बूट,पक्कड,टोपी,रेन कोट व ड्रेस आदी साहित्य पुरवले पाहिजेत असे महानगर पालिकेचे आदेश आहेत.यामागे जीवित हानी तसेच वाईट प्रसंग येऊ नये असा उदात्त हेतू आहे.घणसोली विभाग कार्यालया परिसरातील दिवा बत्ती देखभालीचा ठेका ए.एस.इलेक्ट्रिकल या कंपनी कडे आहे.
पावसाळा सुरू होऊन दहा दिवस होऊन गेले तरी घणसोली विभाग कार्यालयातील कर्मचार्यांना संबंधित ठेकेदारांनी आजतागायत कोणतेही साहित्य पुरविले नसल्याचे कर्मचार्यांचे म्हणणे आहे.घणसोली नोडल विभाग ते रबाले गाव परिसरा पासून रबाले झोपडपट्टी परिसर आदी विभाग घणसोली विभाग कार्यालयात येतो.विशेष म्हणजे झोपडपट्टी परिसरात विद्युत खांब अडगळीच्या ठिकाणी असल्यामुळे मुठीत जीव घेऊनच काम करावे लागत असल्याचे कर्मचार्यांचे म्हणणे आहे.
गेल्या तीन वर्ष्या पासून साहित्य मिळत नसल्यामुळे कर्मचारी स्वतःच आपल्या खिशातून पैसे खर्च करून सुरक्षात्मक साहित्य आणत आहेत. सुरक्षात्मक साहित्य खर्च करण्यासाठी मनपा अनुदान देत असताना ठेकेदार साहित्य खरेदी करत नासल्यामुळे साहित्यासाठी मिळालेला पैसा ठेकेदार व अधिकारी आपल्या खिश्यात घालतात की काय असा संशय व्यक्त केला जात आहे.
याबाबत अभियंता सखाराम खाडे यांना विचारले असता,संबंधित ठेकेदाराला साहित्य खरेदी करण्याचे आदेश देतो असे सांगितले.