नवी मुंबई : नवी मुंबईच्या विकसिकरणासाठी आपली घरे व भातजमिन देणाऱ्या मुळ प्रकल्पग्रस्तांना, ग्रामस्थांना नागरी सुविधा देताना नवी मुंबई महापालिका प्रशासन हात आखडता घेत असल्याचे वारंवार पहावयास मिळत आहे. सारसोळेच्या जेटीवर महापालिका प्रशासनाने पाण्याची सुविधा उपलब्ध करून द्यावी यासाठी सारसोळेच्या ग्रामस्थांकडून पाठपुरावा करण्यात आला असता महापालिका प्रशासन दरबारी जेटीच्या मालमत्तेबाबत कोणतीही नोंद नसल्याचे सांगत सारसोळेच्या मच्छिमारांना पाण्याची सुविधा महापालिका प्रशासनाने नाकारली आहे. यामुळे सारसोळेच्या ग्रामस्थांमध्ये महापालिका प्रशासनाप्रती संतापाची लाट उसळली आहे.
सारसोळेच्या ग्रामस्थांची भातशेती व खाडीतील मासेमारी हीच दोन उपजिविकेची साधने होती. नवी मुंबई विकसिकरणाच्या प्रक्रियेत भातशेतीची जमिन सिडकोकडून भूसंपादित करण्यात आली. सारसोळेच्या आगरी-कोळी समाजापुढे आता खाडीतील मासेमारी हाच एकमेव उपजिविकेचा पर्याय राहीलेला आहे. सारसोळे ग्रामस्थ आणि त्यांच्याकिरता सुविधा हा पालिका, सिडको तसेच राज्य सरकारकडून नेहमीच चेष्टेचा विषय बनला असून आजही सारसोळेकरांच्या नशीबी उपेक्षेशिवाय अजूनही काहीही पदरी पडलेले नाही. सुविधांसाठी अजूनही सारसोळेकरांचा संघर्ष कायम आहे.
सारसोळे गावातील कोलवाणी माता मित्र मंडळाचे अध्यक्ष आणि महापालिका ब प्रभाग समितीचे मनोज यशवंत मेहेर यांनी सारसोळे जेटीवर पाण्याची सुविधा उपलब्ध करून देण्याविषयी सातत्याने पाठपुरावा केला असता, जेटीच्या मालकीहक्काच्या कागदपत्रांवरून पालिकेकडे नोंद नसल्याचे सांगत पाण्याची सुविधा महापालिका प्रशासनाने नाकारली आहे.
सारसोळेच्या ग्रामस्थांना खाडीतून मासेमारी करत आल्यावर जेटीपासून काही अंतरावर आपल्या होड्या उभ्या कराव्या लागतात. मच्छिमारी करून आणलेली मच्छि गुडघाभर तर कधी कमरेपर्यत गाळ, चिखल तुडवित जेटीपर्यत यावे लागते. त्यानंतर तेच चिखलाचे पाय घेवून अधार् तास पायपीट करत सारसोळे गावात यावे लागते. यामुळे ग्रामस्थांच्या पायाला विविध आजारही जडले आहेत. त्यामुळे पालिका प्रशासनाने पाय धुण्यासाठी नळाची सुविधा उपलब्ध करून दिल्यास ग्रामस्थ मासेमारी करून आल्यावर हात-पाय धुवून गावात जातील याकरिता आपण पालिकेकडे पाण्याची मागणी केली असल्याचे मनोज मेहेर यांनी सांगितले.
सारसोळे ग्रामस्थांचे दशक्रिया विधीही सारसोळे जेटीवरच होतात. यावेळी त्यांना दुपारी १२ वाजेपर्यत उन्हातच उभे राहावे लागते. त्यामुळे जेटी परिसरात निवारा शेड उभारल्यास ग्रामस्थांना दशक्रिया विधीसाठी उन्हात ताटकळत उभे राहणार नाही. निवारा शेडकरिता पाठपुरावा करूनही पालिका कोणताही सकारात्मक प्रतिसाद देत नसल्याची नाराजी मनोज मेहेर यांनी यावेळी व्यक्त केली.
एकीकडे पालिका प्रशासन जेटीच्या मालकी हक्काबाबतची कोणतीही कागदपत्रे सांगत नसल्याचे सांगत पाण्याचा हक्क नाकारणाऱ्या महापालिका प्रशासनाने तीन वर्षापूर्वी नारळी पौर्णिमेच्या दिनी सारसोळे जेटीवर हायमस्टचे लोर्कापण केले होते. हायमस्ट बसविण्यासाठी महापालिकेला जेटीच्या मालकी हक्काची कागदपत्रे लागत नाही, मात्र पाण्याची सुविधा देण्याकरिता जेटीच्या मालकी हक्काची कागदपत्रे लागतात. ही महापालिका प्रशासनाची दुटप्पी भूमिका असल्याचा आरोप मनोज मेहेर यांनी यावेळी केला आहे.