मुंबई:
भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना भेटून निवडणुकांमध्ये युती करण्याचा प्रस्ताव ठेवलेला असतानाच शिवसेनेच्या वर्धापन दिनाच्या मेळाव्यात मात्र स्वबळाचा नारा देण्याता आला. ‘लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीत एकहाती सत्ता आणावी लागेल. त्यासाठी स्वबळावर लढायचं आहे,’ अशी घोषणाच युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी केली आहे. त्यामुळे शिवसेना-भाजपमध्ये युती होण्याच्या चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे.
गोरेगावच्या नेस्को संकुलात आयोजित करण्यात आलेल्या शिवसेनेच्या ५२ व्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात आदित्य ठाकरे यांनी ही घोषणा करून भाजपबरोबर लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत युती होणार नसल्याच्या निर्णयावर शिक्कामोर्तब केलं आहे. त्यामुळे भाजपमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे. ‘निवडणुका कधीही लागू शकतात. त्यासाठी कामाला लागा. दोन्ही निवडणुकांमध्ये एकहाती सत्ता आणावी लागेल. त्यासाठी स्वबळावर लढायचं आणि स्वबळावरच जिंकायचं आहे,’ असं आदित्य ठाकरे म्हणाले. पालघरमध्ये कोणी कागदावर जिंकले असतील पण नैतिक विजय आपलाच झाला असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. केवळ मतं नाही तर जनतेची मनंही जिंकायची आहेत, असं सांगतानाच आपण कोणाच्याही जीवावर मोठे झालेलो नाही. शिवसेनेला महाराष्ट्रापुरते मर्यादित ठेवायचे नाही, तर देशभरात शिवसेना न्यायची असल्याचंही त्यांनी ठणकावून सांगितलं.
यावेळी आदित्य यांनी शिवसैनिकांचं प्रचंड कौतुक केलं. ‘सत्ता असताना आणि नसताना आपण जे काही करतो ते इतर कोणताही पक्ष करत नाही. शेतकरी, विद्यार्थी, रोजगार यासाठी शिवसेना काम करते. हाडामांसाचे शिवसैनिक आपल्या पक्षात आहेत, कार्यकर्त्यांची भूमिका महत्वाची आहे. बॉम्बस्फोट असो वा पूर, जात-धर्म न पाहता शिवसैनिक कठीण करताना रक्तदानाला उभा राहतो,’ अशा शब्दांत आदित्य ठाकरेंनी शिवसैनिकांचं कौतुक केलं.