मुंबई: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपल्या फेसबूक पेजवर नवे व्यंगचित्र पोस्ट केले आहे. या व्यंगचित्राच्या माध्यमातून राज ठाकरेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या फिटनेस चँलेंजची खिल्ली उडविली आहे. भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीने दिलेले फिटनेस चँलेज पूर्ण करतानाचा व्हीडिओ मोदींनी नुकताच ट्विटरवरून पोस्ट केला होता. यावरून सोशल मीडियावर अनेक मिम्स व्हायरल झाली होती. त्यानंतर आज राज ठाकरे यांनीही आपल्या व्यंगचित्राच्या माध्यमातून यावर टिप्पणी केली.
राज यांच्या व्यंगचित्राच्या दुसर्या भागात देवेंद्र फडणवीस दिसत आहेत. यामध्ये महाराष्ट्राचे प्रतिक म्हणून एक झाड दाखवण्यात आले आहे. हे झाड जातीपातीच्या विषवल्लींनी वेढलेले आहे. या झाडाकडे बघून मराठी माणूस देवेंद्र फडणवीसांना जातीपातीच्या विषवल्ली छाटण्याचे आवाहन करताना दिसत आहेत. राज ठाकरेंच्या यापूर्वीच्या व्यंगचित्रांना भाजपाकडून तोडीस तोड प्रत्युत्तर देण्यात आले होते. त्यामुळे आता या व्यंगचित्रावर भाजपा काय पवित्रा घेणार, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
सोशल मीडियावर प्रवेश केलेल्या मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपल्या व्यंगचित्रांच्या माध्यमातून, महाराष्ट्र व देशातील राजकारणाच्या विविध घटनांवर भाष्य करायला सुरुवात केली. त्यांच्या या फटकार्यांना सोशल मीडियावर तरुणांकडून चांगला प्रतिसाद मिळाला. नरेंद्र मोदी, अमित शहा, उद्धव ठाकरे, देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीकेचे आसुड ओढणार्या राज ठाकरेंनी आपल्या यंदाच्या व्यंगचित्रात नरेंद्र मोदींच्या फिटनेस चॅलेंजची खिल्ली उडवली आहे.
क्रीडामंत्री राज्यवर्धनसिंह राठोड यांनी सोशल मीडियावर फिटनेस चॅलेंजची नवीन संकल्पना आणली. यानिमीत्ताने भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीने आपल्या व्हिडीओत पंतप्रधानांना टॅग केलं. मोदींनी विराटचं चॅलेंज स्विकारुन आपला व्यायाम व योग करतानाचा व्हिडीओ पोस्ट केला. राज यांनी मोदींची हीच ‘कसरत’ आपल्या व्यंगचित्रात रेखाटली आहे. मोदींचा दगडावर झोपलेल्या चित्रासमोर एक माणूस रडताना दाखवला असून त्याची बायको, मोदी फक्त व्यायाम करत आहेत; त्यांना काही झालेलं नाही असं सांगताना दाखवली आहे.
याच व्यंगचित्रात मोदींनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही चिमटे काढले आहेत. गेल्या काही दिवसांत महाराष्ट्रात सुरु असलेल्या जातीपातीच्या राजकारणावर मुख्यमंत्र्यांनी घेतलेल्या मौनावरुन राज ठाकरेंनी आपल्या व्यंगचित्रातून खडे बोल सुनावले आहेत. आपल्या चित्रात महाराष्ट्राच्या प्रतिकात्मक डेरेदार वृक्षाला जातीपातीच्या विषारी वेलींनी वेढा घातल्याचं दाखवत, एक सामान्य माणूस मुख्यमंत्र्यांना या विषारी वेलींवर घाव घालण्यासाठी आर्जव करताना दाखवला आहे. गेल्या काही दिवसांत राज ठाकरेंच्या व्यंगचित्राला भाजपच्या आयटी सेलकडून जशास तसं उत्तर देण्यात येत आहे. त्यामुळे राज यांच्या नवीन व्यंगचित्रांचे नेमके काय पडसाद उमटतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.