शिशिर शिंदे ’शिवबंधनात’, मनसेला धक्का
मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते शिशिर शिंदे यांनी पुन्हा एकदा शिवसेनेचा भगवा खांद्यावर घेतला आहे. पक्षाच्या वर्धापनदिनी आयोजित कार्यक्रमात त्यांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी शिवबंधनाचा धागा बांधून व हातात भगवा झेंडा देत शिंदे यांचे पक्षात स्वागत केले.
मात्र, प्रवेश करताना त्यांनी शिवसेनेची जाहीर माफी मागितली. मनसेत असताना मी जे काही बोललो त्याची आज माफी मागतो. सर्वांनी मला उदारपणाने माफ करावे. तुम्ही मला मोठ्या मनाने माफ कराल, असे सांगत हातात हात घालून आतापासून कामाला लागणार असल्याचे जाहीर केले. त्याचवेळी वयाच्या १७ वर्षी एका हातात झेंडा घेतला आणि दुसर्या हातात धोंडा घेतला. तो कित्ता आता मी गिरवणार आहे, असे सांगत शिवसेनेचा झेंडा विधानसभेत फडकविणार असल्याचे स्पष्ट केले. शिशिर शिंदे एकेकाळी बाळासाहेब ठाकरे यांचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जायचे. १९९१ मध्ये बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशानंतर शिशिर शिंदे यांनी मुंबईतील वानखेडे स्टेडियमची खेळपट्टी खणली होती. शिवसेनेत असताना शिशिर शिंदे यांनी केलेली आंदोलने ही नेहमीच गाजली होती.
शिवसेनेच्या वर्धापन दिनी उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीमध्ये शिशिर शिंदे यांनी शिवसेनेत घरवापसी केली. शिशिर शिंदे यांनी मुंबई महानगरपालिका निवडणुकीनंतर मनसेच्या नेतेपदाचा राजीनामा दिला होता. मनसेने सोमवारीच जाहीर केलेल्या कार्यकारिणीतूनही शिशिर शिंदेना डच्चू देण्यात आला होता.
मातोश्रीवर आमचा संवाद झाला. अतिशय भावपूर्ण संवाद झाला. निघताना, निरोप घेताना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी हातात हात दिला. त्यांचा हात घेतला. त्यावेळी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा स्पर्श जाणवला. म्हणून मी तो निर्णय पक्का केला. शिवसेनेत असताना ज्याप्रमाणे काम केले. त्याप्रमाणे उद्धवसाहेबांना अपेक्षित असेच उद्यापासून कामाला लागणार आहे. विधानसभेत पुन्हा भगवा फडकविल्याशिवाय राहणार नाही, असे शिशिर शिंदे यांनी यावेळी जाहीर केले.
राज ठाकरे यांचे निकटवर्तीय म्हणून शिशिर शिंदे यांना ओळखले जायचे. राज ठाकरे यांनी शिवसेना सोडून नवीन पक्ष स्थापन करण्याचा निर्णय घेतला त्यावेळी त्यांच्यासोबत शिवसेनेतून बाहेर पडणार्या नेत्यांमध्ये शिशिर शिंदे यांचा समावेश होता. ते २००९ मध्ये मनसेचे आमदार म्हणून निवडूनही आले होते. २०१४ मधील विधानसभा निवडणुकीत त्यांचा पराभव झाला. गेल्या वर्षी मुंबई महापालिका निवडणुकीत त्यांना डावलण्यात आले. तेव्हापासून शिशिर शिंदे हे मनसेत अस्वस्थ होते. शिशिर शिंदे यांनी गेल्या वर्षी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना पत्र पाठवून पक्षातील सर्व जबाबदार्यांमधून मुक्त करावे, असे म्हटले होते. मनसेच्या अनेक आंदोलनात शिंदे सहभागी झाले होते. मात्र, गेल्या काही दिवसांपासून राज ठाकरे यांच्याशी असलेले संबंध दुरावले गेले होते. मनसेने जाहीर केलेल्या नवीन कार्यकारणीत शिशिर शिंदे यांना वगळण्यात आले होते. त्यामुळे शिंदे मनसेला रामराम ठोकणार असल्याच्या चर्चांना बळ आले होते.