सारसोळे व नेरूळ सेक्टर सहामधील फेरीवाल्यांचे अतिक्रमण व वाढते अनधिकृत होर्डिग याला प्रशासकीय आश्रय देणार्यांवर कारवाई कधी होणार ? – संदीप खांडगेपाटील यांचा सवाल
दीपक देशमुख
नवी मुंबई :- नेरूळ सेक्टर सहा व सारसोळे गाव परिसरात फेरीवाल्यांचे अतिक्रमण वाढीस लागले आहे. त्यातच राजकारण्यांचे अनधिकृत होर्डीगही वाढीस लागले आहे. या फेरीवाल्यांवर, होर्डीग व होर्डीग लावणार्यांवर महापालिका प्रशासनाचा अतिक्रमण विभाग विशेष प्रेम दाखवित आहे. हा परिसर बकाल करण्यात महत्वाची भूमिका बजावणार्या पालिकेच्या अतिक्रमण अधिकारी व कर्मचार्यांवर कारवाई करण्याची लेखी मागणी पत्रकार संदीप खांडगेपाटील यांनी नेरूळ विभाग अधिकार्यांकडे केली आहे.
नवी मुंबई महापालिका कार्यक्षेत्रातील प्रभाग ८५ व ८६ मधील सारसोळे गाव आणि नेरूळ सेक्टर सहा हा परिसर गेल्या काही वर्षापासून बकालपणामुळे प्रसिध्द आहे. महापालिका अतिक्रमण विभागाच्या अकार्यक्षमतेमुळे व उदासिनतेमुळे या परिसराला हे स्वरूप प्राप्त झाले. २०१५ साली झालेल्या महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणूकीनंतर या परिसरात फेरीवाल्यांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. सारसोळे मच्छि मार्केट लगतच्या परिसराला फेरीवाल्यांचा पडलेला विळखा पाहून स्थानिक रहीवाशी आता त्याला ‘सारसोळे मॉल’ असे उपहासाने बोलू लागले आहे. विक्रम बार ते पालिका समाजमंदिरापर्यतच्या रस्त्यावरही फेरीवाले आपणास पहावयास मिळतात. समाजमंदिरापासून ते शिवालिक सोसायटीच्या रस्त्यावर आता नव्याने फळविक्रेत्यांच्या गाड्या दिसू लागल्या आहेत. पूर्वी पदपथावर फेरीवाल्यांचे अतिक्रमण असायचे आणि आता तेच फेरीवाले रस्त्यावर हातगाड्या लावून व्यवसाय करू लागले आहेत. फेरीवाल्यांच्या अतिक्रमणामुळे परिसराला बकालपणा येवून वाहतुक कोंडीच्या घटना घडू लागल्या आहेत. फेरीवाल्यांवर कारवाई करून ही समस्या हटविण्याकरिता स्थानिक भागातील राजकारणी आणि मनपा अतिक्रमण विभाग अकार्यक्षम ठरू लागल्याने या परिसराला पालिकेत कोणी वालीच राहीला नसल्याचा आरोप स्थानिक रहीवाशी उघडपणे आता करू लागले असल्याचे खांडगेपाटील यांनी निवेदनात म्हटले आहे.
नेरूळ सेक्टर सहा परिसरात गेल्या काही वर्षात सातत्याने अनधिकृत बॅनर व होर्डीगचे प्रकार वाढू लागले आहेत. या अनधिकृत होर्डीगवर व होर्डीग लावणार्यांवरही पालिका प्रशासनाचा अतिक्रमण विभाग कारवाई करत नसल्याने आपल्या अतिक्रमण विभागाच्या अधिकार्यांना व कर्मचार्यांना प्रभाग ८५ व ८६ मधील नेरूळ सेक्टर सहा व सारसोळे गावाविषयी काहीही देणेघेणे राहीले नसल्याचा अर्थ स्थानिक रहीवाशांनी काढायचा का? असा प्रश्न खांडगेपाटील यांनी निवेदनातून पालिका प्रशासनाला विचारला आहे.
या ठिकाणी फेरीवाल्यांना आश्रय देणार्या व अनधिकृत बॅनरवर, होर्डीगवर तसेच बॅनर व होर्डीग लावणार्यांविरोधात कारवाई न करणार्या पालिकेच्या अतिक्रमण विभागातील कर्मचारी व अधिकार्यांवर लवकरात लवकर कारवाई करावी की जेणेकरून या परिसरातील बकालपणा व फेरीवाल्यांविरोधात त्यांच्या भूमिकेची त्यांना जाणिव होईल असे खांडगेपाटील यांनी म्हटले आहे.