* महापालिका प्रशासनाने स्वत:चे बांधलेले अनधिकृत मार्केट राजकीय दबावामुळे तोडण्याची घाई केली. पण आता ते डेब्रिज व अन्य कचरा उचलण्यासाठी महापालिका प्रशासन कोणा ज्योतिषाकडून मुहूर्त शोधत आहे काय? -संदीप खांडगेपाटील यांचा सवाल
दिपक देशमुख
नवी मुंबई :- महापालिका प्रभाग ८६ मधील नेरूळ सेक्टर सहा परिसरात महापालिका प्रशासनाने अनधिकृतपणे बांधलेले मार्केट स्वत:च पाडले. या घटनेला १३ दिवसाचा कालावधी लोटला तरी डेब्रिज अजून उचलले गेले नाही. यामुळे परिसराला बकालपणा आला असून साथीच्या आजाराला खतपाणीही घालण्याची भीती आहे. महापालिका प्रशासनाने अनधिकृत भाजी मार्केट पाडण्यात जी तत्परता दाखविली,तीच तत्परता मार्केटचे डेब्रिज उचलण्यास दाखविण्याची लेखी मागणी पत्रकार व सामाजिक कार्यकर्ते संदीप खांडगेपाटील यांनी महापालिकेच्या नेरूळ विभाग अधिकार्यांकडे केली आहे.
प्रभाग ८६ मध्ये नेरूळ सेक्टर सहा परिसरात सिडको वसाहतीमधील दत्तगुरू व वरूणा सोसायटीच्या मध्यभागी मैदानात सिडकोने मार्केट व सर्व्हिस स्टेशनसाठी आरक्षित असलेल्या भुखंडापैकी मार्केटच्या जागेवर महापालिका प्रशासनाने जवळपास २५ लाख रूपये खर्च करून मार्केट बांधले होते. तथापि आरक्षित भुखंड हस्तांतरीत होण्यापूर्वीच मार्केट उभारले गेल्याने ते अनधिकृत ठरले. ते मार्केट शुक्रवार ८ जुन रोजी महापालिका प्रशासनाने पाडले. आज या घटनेला १३ दिवस उलटले तरी मार्केटचे डेब्रिज व लोखंडी सळ्या, पत्रे उचलण्यासाठी महापालिका प्रशासनाकडून कोणतीही कार्यवाही झालेली नाही. लोखंडी सळ्या या वरूण सोसायटीलगतच्या पदपथासमीप असल्याने मुले पळताना अथवा रात्रीच्या अंधारात दुर्घटना होण्याची दाट शक्यता आहे. महापालिका प्रशासनाने स्वत:चे बांधलेले अनधिकृत मार्केट राजकीय दबावामुळे तोडण्याची घाई केली. पण आता ते डेब्रिज व अन्य कचरा उचलण्यासाठी महापालिका प्रशासनाला कोणा ज्योतिषाकडून मुहूर्त शोधत आहे काय? असा प्रश्न संदीप खांडगेपाटील यांनी निवेदनातून पालिका प्रशासनाला विचारला आहे.
सध्या पावसाळ्याचे दिवस सुरू आहे. या डेब्रिजमुळे पाणी साचून साथीच्या आजाराची स्थानिक रहीवाशांना लागण होण्याची दाट शक्यता आहे. जे मार्केट तोडले, त्याचे डेब्रिज तात्काळ उचला. अन्यथा यातून साथीच्या आजाराला खतपाणी मिळून आजाराचा उद्रेक झाल्यास अथवा बाहेर आलेल्या लोखंडी सळ्यामुळे दुर्घटना झाल्यास त्यास सर्वस्वी महापालिका प्रशासन आणि मार्केट पाडण्यासाठी आग्रही असणारे राजकारणीच जबाबदार असतील, याची आपण दखल घ्यावी. मार्केट पाडण्यासाठी महापालिका प्रशासनावर दबाव आणणार्या राजकारण्यांना इतके दिवस झाले तरी डेब्रिज दिसत नाही, हे स्थानिक रहीवाशांचे दुर्देवंच म्हणावे लागेल. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेवून आपण शक्य तितक्या लवकर डेब्रिज उचलण्याचे, लोखंडी सळ्या हटविण्याचे आणि मैदानात पडलेले लोखंडी पत्रे उचलण्याचे संबंधितांना निर्देश द्यावेत, अशी मागणी संदीप खांडगेपाटील यांनी केली आहे.