पनवेलः- दुसर्यांसाठी जगण्यात आनंद आहे. दुसर्यांच्या व्यथांना समजून घेण्यात खरे जीवन जगण्याचे कौशल्य अंगी असायला हवे. आयुष्यभर दुसर्यांचे कौतुक करून त्यांना पुढे नेण्याची संधी निर्माण करण्यांचे आयुष्य उज्वल असते. ती एक चळवळ सातत्याने राबिवली गेली पाहिजे. यश मिळविण्यासाठी आधी लक्ष्य निश्चित केले पाहिजे, असा मौलिक सल्ला मुंबई विद्यापीठाचे माजी कुलगुरू, माजी खा. डॉ. भालचंद्र मुणगेकर यांनी उपस्थितांना दिला.
सामाजिक कार्यकर्ते कांतीलाल कडू यांच्या 46 व्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेल्या दहावी-बारावी विद्यार्थी गुणगौरव समांरभ आणि करिअर मार्गदर्शनासाठी ते प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यावेळी ते बोलत होते.
ते पुढे म्हणाले की, देशात 5 कोटी बेरोजगार आहेत. पंतप्रधानांनी 2 कोटी नोकर्या उपलब्ध करून दिल्याचे सांगितले आहे. त्या वादात पडण्याचे काही कारण नाही. परंतु, वस्तूस्थिती वेगळी असून डॉक्टर, इंजिनिअरिंग याशिवाय विविध क्षेत्रात मोठ्या प्रमाणात बेरोजगार निर्माण झाल्याने सर्वांसमोरील आव्हाने वाढली आहेत. स्पर्धा सुरू झाली आहे. त्या आव्हानांना सामोरे जाण्याचे सामर्थ्य आपण निर्माण केले पाहिजे, असे परखड मत त्यांनी व्यक्त केले.
बंधूभाव निर्माण करा!
माणसांनी सगळीकडे बंधूभावाने वागून, आपुलकी निर्माण केली पाहिजे असे सांगत त्यांनी कविता सादर करून त्यातून उपस्थितांवर गारूड घातले. अपयशाने खचून कधी जायचे नसते. मात्र, यश मिळविण्यासाठी लक्ष्य निश्चित करून तशी जिद्द बाळगायला हवी. मला सातवीपर्यंत चप्पल वापरता आली नाही. दहावीपर्यंत झोपडपट्टीत राहून दिवस काढले. बारावीला द्वितीय क्षेणीत पास झालो. पण शेवटी विद्वत्ता सिद्ध करत मुंबई विद्यापीठाचा कुलगुरू झालो. पुढे एक दिवशी पंतप्रधान मनमोहनसिंग यांचा फोन आला. विचारणा केल्यावर ते म्हणाले की, राष्ट्रपती नियुक्त राज्यसभा सदस्य तुम्हाला करायचे आहे, हा माझा प्रस्ताव आपल्याला मान्य आहे का? त्यावर आपण ताबडतोब होकार दिला. राज्यसभा सदस्य आणि नंतर निती आयोगाचे सदस्य असा सन्मानाचा प्रवास केला, अशी वाटचाल त्यांनी उपस्थितांसोबत शेअर केली तेव्हा उर्त्तंुग यशाच्या शिखराला सार्यांनी तितक्याच सन्मानाने दाद देत टाळ्यांचा कडकडाट केला.
साने गुरूजींच्या विचार मालेतील रत्न!
कांतीलाल कडू हे त्यांच्या निर्भीड लेखमधून अन्यायाविरूद्ध सातत्याने लढत असतात. टाईम्स ऑफ इंडिया असो की, इंडियन एक्स्प्रेस जेवढ्या सामान्यांच्या व्यथांना त्यांच्या दैनिकांतून स्थान देत नसतील त्यापेक्षा काकणभर जास्त निर्भीड लेखमधून ते सामान्यांच्या जीवनातील व्यथा स्वतः अनुभवल्यागत मांडत असतात. साने गुरूंजींच्या विचारमालेतील एक रत्न आहेत, अशा शब्दात कडू यांचे मुणगेकर यांनी कौतुक केले.
मैत्रीमुळे येथे आलो!
कांतीलाल कडू हे समाजासाठी झटत असताना जातीपातीच्या पलिकडे जावून समाजासाठी कार्यरत आहेत, हे त्यांनी त्यांच्या संघर्षमय जीवनातून दाखवून दिले आहे. त्यांच्या उपक्रमाची मला सातत्याने ते माहिती देत असतात. सोशल मिडीयावर त्यांच्या कामाला मिळत असलेला उत्स्फूर्त प्रतिसाद आपण पाहत आहोत. त्यांच्या मैत्रीपोटी आपण दिल्ली दौरा अर्धवट सोडून पनवेलमध्ये आलो, असेही त्यांनी सांगितले.
मक्तेदारी मोडीत निघतेच!
दिलीपकुमार, देवानंद आणि राजकपूर यांचा सिनेसृष्टीत बोलबाला होता. रसिकांची ती दैवतं होती. परंतु, त्यानंतर आलेल्या राजेश खन्नाने त्यांची अनेक दशकांची सद्दी संपुष्टात आणली. पुढे राजेश खन्ना याच्यावर अमिताभ बच्चनने कढी केली. अमिताभ बच्चन, राजेश खन्नाला मागे टाकत पुढे आले आणि अमिताभलाही दिल्लीहून आलेल्या शाहरूख खानने मागे टाकले, अशी कथा सांगून कुणाचेही कुठल्या क्षेत्रात शाश्वत स्थान नसल्याचे त्यांनी अधोरेखित केले.
वाचक व्हा!
आयुष्यात काही करायचे असेल तर दर दिवशी एक तास तरी विविध विषयांची पुस्तके वाचत राहिले पाहिजे. मग ते कोणत्याही क्षेत्राशी निगडीत पुस्तके असावीत. पुस्तके वाचताना आपल्याला वाडःमय कळते. तेच आपल्याला समृद्ध करते. जेवढी पुस्तके वाचाल तेवढे तुमचे भावविश्व समृद्ध होईल, असे त्यांनी सांगितले.
शिक्षणातील आव्हाने आणि संधी
रायगड जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष अदिती तटकरे यांनी शिक्षणक्षेत्रातील आव्हाने आणि संधीवर परखड मतं व्यक्त करत गुणवंतांच्या जीवनात स्फुलिंग चेतावले. त्यांनी त्यांच्या आयुष्यातील शिक्षणाविषयीचे काही कडूगोड किस्से सांगितले. त्यांच्या मातोश्रींचे शिक्षणाविषयी असलेले प्रेम आणि प्रेरणा याबद्दल माहिती दिली.
पदवी परीक्षेत त्यांना मिळालेल्या प्राविण्याविषयी त्यांनी अनुभव सांगून आईवडीलांशी मनमोकळे पणाने बोलून निर्णय घेतला पाहिजे. कधी कधी मित्रांच्या सल्ल्यावरून मार्ग निवडतो. तो मार्ग चोखळताना आधी विचार केला पाहिजे. तसेच केवळ पुस्तकी शिक्षण आणि त्यातील माहितीवर आधारित निर्णयापेक्षा इतरांचे अनुभव महत्वाचे ठरतात का, याबद्दल चर्चेतून निर्णय घ्यावा, असे अदिती तटकरे यांनी सांगितले.
प्रारंभी कांतीलाल कडू यांनी प्रास्ताविक केले. त्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. शिवसेनेचे सल्लागार बबनदादा पाटील, भाजपाचे ज्येष्ठ नेते जी. आर. पाटील, कॅप्टन, कलावत आदींची यथोचित भाषणे झाली.
महाराष्ट्राचे हास्य कलाकार जॉनी रावत यांनी निळू फुले, दादा कोंडके यांची मिमिक्री करून विद्यार्थी व पालकांना पोट धरून हसायला लावले. त्यांनी आपल्या खास शैलीतून विनोद सांगताच नाट्यगृहात हास्याच्या सरी बरसू लागल्या.
व्यासपीठावर ज्येष्ठ आयुर्वेदाचार्य डॉ. भक्तीकुमार दवे, शेकापचे विधानसभा मतदार संघाचे अध्यक्ष काशिनाथ पाटील, कर्नाळा स्पोटर्सचे रवींद्रशेठ पाटील, आदिवासी आश्रम शाळेचे चेअरमन विजय लोखंडे, खारघर संघर्ष समितीचे संजय जाधव, खारघर हौसिंग फेडरेशनचे अध्यक्ष कॅ. एस. एच. कलावत, कफचे अध्यक्ष अरूण भिसे, कॉंग्रेसचे शहराध्यक्ष सुदामशेठ पाटील, मराठा सेवा संघाचे प्रा. बी. ए. पाटील, इश फाऊंडेशनच्या कीर्ती मेहरा, खारघर सोशल वेल्फेअरच्या अध्यक्षा ऍड. संध्या शिरब्रिंदे, अभिव्यक्ती सामाजिक संघटनेच्या ज्योती नाडकर्णी, फ्लट्स सामाजित संस्थेच्या सलिता नाईक, कामोठे कफच्या रंजना सडोलीकर, नवीन पनवेल सिव्हीक फोरमच्या शोभा लावंड, उत्तर भारतीय समाज संघाच्या अमिता चव्हाण, कळंबोली ज्येष्ठ संघाचे अध्यक्ष माणिक पवार, रॉबिन हुड आर्मीचे दीपक सिंग, एकता संघ कामोठेचे बापू साळुंखे, निर्मल प्रयासचे शैलेंद्र त्रिवेद्वी, एकता संघाचे संतोष चिखलकर, कळंबोली राजा गणेशोत्सव मंडळाचे आत्माराम कदम, खारघर संघर्षचे रमेश मेनन, सिव्हीक फोरमचे कॅ. तलवार, एकता संघाचे अमोल शितोळे, सचिन गायकवाड, मराठा सेवा संघ, रायगडचे प्रकाश चांदिवडेकर, नवीन पनवेल ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष बन्सीधर गेहरोला, माजी सैनिक मुकूंद इनामदार आदी मान्यवरांसह विविध क्षेत्रातील नामवंत उपस्थित राहणार आहेत.
डॉ. चंदन ठ्ाकूर, आनंद पाटील, प्रशांत गाला, मोहन डाकी, बाबा पठाण, सुरज म्हात्रे, गौरव भगत, बाळाराम पाटील, विवेक पाटील आदींनी उपस्थितांचे स्वागत केले.