उध्दव ठाकरेंनीही जनतेची मागावी
मुंबई :- नाणार रिफायनरी प्रकल्पासाठी काल केंद्र सरकारने सौदी अराम्को आणि अॅडनॉक या दोन कंपन्यांसोबत ३ लाख कोटींचा आर्थिक सामंजस्य करार केला यावरून राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी नाणार रिफायनरी प्रकल्पासाठीची भूसंपादन अधिसूचना रद्द केल्याची घोषणा खोटी होती हे सिध्द झाले आहे. खोटे बोलून जनतेची दिशाभूल केल्याप्रकरणी उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी तात्काळ आपल्या पदाचा राजीनामा द्यावा आणि उध्दव ठाकरे यांनी जनतेची माफी मागावी अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी केली आहे.
यासंदर्भात बोलताना खा. चव्हाण म्हणाले की नाणार प्रकल्पाबाबत शिवसेना पक्षाची भूमिका दुटप्पी असून शिवसेनेचे नेते वारंवार खोटे बोलून लोकांची दिशाभूल करित आहेत. दि. 24 एप्रिल 2018 रोजी नाणार प्रकल्पाच्या भूसंपादनाची अधिसूचना रद्द करित आहे असे उद्योगमंत्री सुभाष देसाई नाणारमधील जाहीर सभेत म्हणाले होते. मात्र अद्याप अधिसूचना रद्द झाली नाही. एक अधिसूचना रद्द करायला एवढा वेळ लागतो का? उध्दव ठाकरे यांनीही वारंवार नाणार प्रकल्प होऊ देणार नाही. अशा घोषणा केल्या मात्र शिवसेनेच्या बोलण्यात आणि कृतीत फरक असल्याचे वारंवार दिसून आले आहे. शिवसेना कोकणवासियांचे नाही तर स्वतःचे हित पाहात आहे. नाणारला विरोध आहे असे दाखवून शिवसेना भाजपशी सौदेबाजी करित आहे. भाजपाध्यक्ष अमित शाह यांच्या मुंबई दौ-यात यांचा सौदा बहुतेक ठरला आहे असे दिसते कदाचित त्यामुळेच शिवसेनेचा नाणारला असणारा विरोध मावळलेला दिसत आहे, असा टोला काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी शिवसेनेला लगावला.