मुंबई – महाराष्ट्राच्या विधानसभेत भाजपा हा ‘मोठा भाऊ’ असला, तरी मुंबईत शिवसेनेची संघटनात्मक बांधणी अधिक भक्कम असल्याचं आज पुन्हा समोर आलंय. या ‘नेटवर्क’च्या जोरावरच, विधानपरिषदेतील मुंबई पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत सेनेनं विजयी डरकाळी फोडली आहे आणि नारायण राणेंना इंगा, तर भाजपाला ठेंगा दाखवला आहे. शिवसेनेचे विलास पोतनीस यांनी स्वाभिमान पक्ष पुरस्कृत राजू बंडगर यांचा पराभव करत विधानपरिषदेतील प्रवेश निश्चित केला आहे.
मतमोजणीमध्ये विलास पोतनीस यांना 19354 मते मिळाली. तर त्यांचे प्रतिस्पर्धी असलेले भाजपाचे अमितकुमार मेहता यांना 7792 मते मिळाली. लोकभारतीचे जालिंदर सरोदे तिसऱ्या क्रमांकावर तर राजू बंडगर चौथ्या क्रमांकावर राहिले.
मुंबई पदवीधर मतदारसंघ हा तसं तर शिवसेनेचाच बालेकिल्ला. ‘मातोश्री’शी अत्यंत घनिष्ठ संबंध असलेले डॉ. दीपक सावंत हे दोन टर्म या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करत होते. परंतु, यंदा या मतदारसंघातील लढाई ही शिवसेनेसाठी ‘स्वाभिमाना’ची झाली होती. कारण, कट्टर प्रतिस्पर्धी नारायण राणे त्यांच्यासमोर उभे ठाकले होते आणि सेनेला भाजपाची साथही नव्हती. त्यामुळे ही जागा शिवसेना राखणार का आणि कशी, याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं होतं. पण, प्रत्येक पाऊल जपून टाकत आणि संघटनेचा पुरेपूर वापर करत सेनेनं बाजी मारली.
डॉ. दीपक सावंत यांच्याबद्दल शिवसैनिकांमध्ये काहीशी नाराजी होती. त्यांना तिकीट दिलं, तर मतं फुटू शकतात, हे अचूक हेरून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी विलास पोतनीस यांच्या गळ्यात उमेदवारीची माळ घातली. स्थानीय लोकाधिकार समितीत सक्रिय असल्यानं पोतनीस यांचा जनसंपर्क दांडगा होता. त्यामुळे शिवसेनेची पहिली खेळी अचूक ठरली. त्यानंतर, पदवीधर मतदारांची नोंदणी हे तर शिवसैनिकांचं आवडतं काम. ते त्यांनी चोख पार पाडलं होतं. पण, त्यावर पाऊस पाणी फेरतो की काय, असं चित्र 25 जूनला – मतदानाच्या दिवशी निर्माण झालं होतं. धो-धो पाऊस कोसळत असल्यानं मतदारांना बाहेर काढणं कठीण झालं होतं. मात्र, सैनिक मागे हटले नाहीत. त्याचंच फळ शिवसेनेला आज मिळालं.
मुंबई पदवीधर मतदारसंघात 37 हजार 237 मतदारांनी मतदान केले होते. म्हणजेच, 52.81 टक्के पदवीधर मतदारांनीच आपला हक्क बजावला होता. विलास पोतनीस, राजू बंडगर यांच्यासोबतच शेकापचे राजेंद्र कोरडे (काँग्रेस-राष्ट्रवादीचा पाठिंबा), शिक्षक भारतीचे जालिंदर सरोदे आणि अपक्ष उमेदवार दीपक पवारही निवडणूक रिंगणात होते. त्यामुळे ही मतं कोणामध्ये कशी विभागली जातात, याबद्दल उत्सुकता होती. परंतु, शिवसेनेनं मुंबईतील आपलं वर्चस्व कायम ठेवत सरशी केली आहे.