आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांनी जाणून घेतल्या समस्या
नवी मुंबई:- नेरूळ उरण फाटा येथील आदिवासी पाड्यात 12 कुटुंबे गेली 30 वर्षापासून राहत असून सदर नागरिक जीवनावश्यक सुविधांपासून आजही वंचित आहेत. सदर ठिकाणी विज व पाण्याची व्यवस्था नसून जाण्या-येण्यास रस्ताही उपलब्ध नाही. विरोधकांच्या अरेरावीमुळे येथील विकास खुंटला असल्याचे येथील नागरिकांचे म्हणणे आहे. येथील आदिवासी मूळ रहिवासी असून येथील कंपन्याच्या खासगीकरणासाठी येथील आदिवासी बांधवांना त्रास देऊन हाकलून लावण्याचा प्रयत्न सुरु आहे. महाराष्ट्र शासनाची आदीवासी घरकुल योजनाचा लाभ देखील या आदिवासी बांधवाना मिळत नाही येथील आदिवासी बांधव जागा सोडून जावे यासाठी पैश्याची लाच दाखवली जात आहे. या सर्व समस्या सुटाव्यात याकरिता सदर आदिवासी बांधवांनी बेलापूरच्या आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांची भेट घेतली होती. याच अनुषंगाने आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांनी सदर आदिवासी पाड्याचा विकास व्हावा, सदर नागरिकांना जीवनावश्यक सुविधा उपलब्ध व्हाव्या याकरिता शासन दरबारी प्रयत्न केले होते. त्यांना त्यांच्या हक्काचे रेशनकार्ड, आधारकार्ड काढून देण्यात आले होते. तसेच त्यांच्या आदिवासी पाड्याचा पुनर्विकासही करण्याचे आश्वासन दिले होते. आज दि. 30.06.2018 रोजी नवी मुंबई महानगरपालिका मालमत्ता विभाग उपायुक्त श्री. दादासाहेब चाबुकस्वार, अभियंता व संबंधित अधिकारी यांनी सदर आदिवासी पाड्याचा पाहणी दौरा केला. सदर ठिकाणाची पाहणी करून लवकरच आदिवासी पाड्याचे पुनर्विकास करण्यासंदर्भात सूचित केले.
यावेळी आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांनी सांगितले कि, नेरूळ उरण फाटा येथील आदिवासी पाड्यात 12 कुटुंबे गेली 30 वर्षापासून राहत आहेत. सदर नवी मुंबई शहर हे विकसित असून सुनियोजित शहर आहे परंतु आजही आदिवासी पाड्यातील नागरिक हे सुख-सुविधांपासून वंचित आहेत. सदर आदिवासी हे येथील मूळ रहिवासी आहेत. नवी मुंबईसारख्या विकसित शहरात अशा मूळ आदिवासी रहिवाशाना आजही सुखसुविधा मिळत नाहीत, हि अतिशय दुर्दैवी बाब आहे. त्यांनी माझ्या निवासस्थानी माझी भेट घेऊन त्यांच्या समस्या सांगितल्या असता त्यांना सदर आदिवासी पाड्याचा लवकरच पुनर्विकास करून देण्याचे त्यांना आश्वासन दिले होते. त्याच अनुषंगाने येथील सर्व आदिवासींना रेशनकार्ड व आधार कार्ड देऊन एक मूळ रहिवासी पुरावा दिला. तसेच आदिवासी पाड्यातील नागरिकांना ये-जाण्याकरिता चांगले रस्ते व वीज, पाणी या सुविधा लवकरच उपलब्ध होणार आहे असे बेलापूरच्या आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांनी सांगितले.