मुंबई : मुंबईतील मोकळ्या जागांवर झोपडपट्ट्या वसवून बिल्डर लॉबीकडून जागा हडपण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्यांना राजकीय वरदहस्त लाभला आहे, असा घणाघाती आरोप मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केला. मुंबईत वांद्रे पूर्व येथील शासकीय वसाहतीत आयोजित कार्यक्रमात राज ठाकरे यांनी फडणवीस सरकारवर हल्लाबोल केला.
बेहरामपाड्यात चार-चार मजल्यांच्या झोपड्या उभ्या राहतात, अगदी राज्यकर्त्यांच्या डोळ्यांदेखत. तिथल्या मोहल्ल्यांमध्ये घुसायची यंत्रणांची आणि सत्ताधाऱ्यांची हिंमत नाही. पण मराठी माणसाला नोटीसा पाठवल्या जातात.
यामुळे वांद्रे पूर्व इथल्या शासकीय वसाहतीत राहणारा प्रत्येक मराठी माणूस इथेच राहील. काळजी करू नका. सरकारने तुम्हाला हात लावायचा प्रयत्न करून दाखवावाच. हिंमत असेल तर तुम्हाला काढून दाखवावं, असं आव्हान राज यांनी दिलं.
वांद्रे-कुर्ला संकुलातून बुलेट ट्रेन जातेय आणि तिथेच आता निवासी इमारती उभ्या राहणार आहेत. म्हणजे तिथे कोण येणार हे वेगळं सांगायला नको. संयुक्त महाराष्ट्र चळवळीत मुंबई महाराष्ट्राला मिळाली. ही झालेली जखम भरून काढण्यासाठी बुलेट ट्रेन आणि मुंबई-बडोदा एक्स्प्रेस-वे केला जातोय, असा आरोप राज यांनी केला. गुजरात सरकारतर्फे एका संकेतस्थळाद्वारे ‘गुजरात कार्ड’ काढले जाते आहे. हे कार्ड राज्याबाहेरील गुजरात्यांसाठी आहे. ही त्यांची सोय का केली जातेय? असा सवाल राज ठाकरेंनी केला आहे. परप्रांतातून आलेल्या माणसांना हक्कांची घरं मिळतात आणि मराठी माणसांना हुसकावलं जातं. महाराष्ट्रात मराठी माणसांनाच आपल्या घरांसाठी धडपडावं लागतं, हे दुदैवी आहे, असं राज ठाकरे म्हणाले.