मुंबई – महाराष्ट्राच्या विधीमंडळ कामकाजाच्या इतिहासात तिसऱ्यांदा पावसाळी अधिवेशन नागपुरात होत आहे. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी हजारो कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या सादर होणार आहेत. तसेच विदर्भ राज्य कृती समितीच्या वतीने स्वतंत्र विदर्भाच्या मागणीसाठी विधान भवनावर मोर्चा आयोजित करण्यात आला आहे. विदर्भवादी नेते वामनराव चटप, राम नेवले आणि दिगंबर डोंगरे यांच्या नेतृत्वात हा मोर्चा काढला जाणार असून, त्यांनी नागपूर बंदची हाक दिली आहे.
यंदा विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन नागपूर येथे घेतले असून, प्रत्यक्ष कामकाज केवळ १७ दिवसाच्या कालावधीत असले तरी केवळ १३ दिवस कामकाज होणार आहे. या अधिवेशनात नवीन ९ आणि प्रलंबित १० विधेयके मांडली जाणार आहेत.
अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी काही अध्यादेश सभागृहाच्या पटलावर ठेवण्यात येणार आहेत. त्याचबरोबर यावर्षीच्या आर्थिक वर्षासाठी हजारो कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या सादर केल्या जाणार आहेत. तसेच पहिल्या दिवशी दिवंगत सदस्यांचा शोकप्रस्ताव सादर केला जाईल. शोक प्रस्तावाच्या आधी २०१३-१४ च्या अतिरिक्त खर्चाच्या मागण्या ही सादर होणार आहेत.
अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी शासकीय कामकजासोबतच विरोधीपक्ष राज्यातील समस्यांबाबत चर्चेचा प्रस्ताव सादर करतील. ७ आणि ८ जुलैला नियमीत बैठक होणार नाही. तर १० जुलैला २०१८-१९ च्या पुरवणी मागण्यांवर चर्चेचा शेवटचा दिवस आहे. तसेच ११ जुलैला पुरवणी नियोजन विधेयक मांडले जाईल. अधिवेशनाच्या तिसऱ्या आठवड्यात १९ तारखेला अंतिम आठवडा प्रस्ताव असून यावर मुख्यमंत्री उत्तर देतील. एकूणच पावसाळी अधिवेशनाची ही रूपरेषा असली तरी राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था, शेतकऱ्यांची कर्जमाफी तसेच बियाणे आणि खतांच्या तुटवड्या विषयी विरोधक सरकारला घेरण्याच्या तयारीत आहेत. त्याचबरोबर पावसाळी अधिवेशन नागपुरात घेण्यास सत्ताधारी शिवसेनेने विरोध दर्शवला आहे. त्यामुळे शिवसेनेची सभागृहातील भूमिका ही विरोधकांच्या पथ्यावर पडणार, अशी चिन्हे आहेत.
नानार रिफायनरीचा मुद्दा ही शिवसेनेच्या हिटलिस्टवर असल्याने सरकारला अधिकच संयमाने सभागृहातील कामकाज चालवावे लागणार, असे चित्र निर्माण झाले आहे.