मुंबई : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या टप्पा-१च्या विकासासाठी विकसन यंत्रणेला जमीन हस्तांतरीत करण्याबाबत महत्त्वपुर्ण असा सामंजस्य करार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थित करण्यात आज येथे करण्यात आला. या करारामुळे नवी मुंबई विमानतळाच्या विकास कामाला मोठी गती मिळेल, असा विश्वास मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केला.
मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ येथे सामंजस्य करारावर स्वाक्षरी करण्यात आल्या. नवी मुंबई विमानतळाच्या विकासासाठी कार्यान्वीत एसपीव्ही- स्पेशल पर्पज व्हेईकल अंतर्गत स्थापन नवी मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट प्रा. लि- एनएमआयएल आणि सिडको यांच्या दरम्यान हा करार करण्यात आला. या करारानूसार एनएमआयएल अंतर्गत जीव्हीके इंटरनॅशनल कंपनी नवी मुंबई विमानतळाच्या विकासाची कामे करणार आहे. त्यासाठी विमानतळासाठीची सुमारे नव्वद टक्के जमीन हस्तांतरीत करण्यास मान्यता देण्यात आली. टप्पा- १ मध्ये नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ येथे दरवर्षी दहा लाख प्रवाशी वाहतूक आणि दोन लाख साठ हजार टन माल वाहतुकीसाठीच्या सुविधा विकसित केल्या जाणार आहेत.
या कराराप्रसंगी आमदार आशिष शेलार, सिडकोचे उपाध्यक्ष लोकेश चंद्रा, सहव्यवस्थापकीय संचालक प्राजक्ता लंवगारे, जी.व्ही.के. कंपनीचे अध्यक्ष डॉ. जी.व्ही.के. रेड्डी, संजय रेड्डी, एस बँकेचे प्रतिनिधी श्री. मित्तल आदींसह एनएमआयए अंतर्गत समाविष्ट विविध कंपन्यांचे प्रतिनिधींची उपस्थिती होती.
नवी मुंबई विमातनतळाच्या विकासासाठी मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट प्रा.लि.- एमआयएल स्थापन करण्यात आले असून त्याअंतर्गत नवी मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट प्रा. लि.- एनएमआयएल ही स्पेशल परर्पज व्हेईकल कार्यान्वीत आहे. यामध्ये सिडकोचा सहभागी आहे. एनएमआयएमध्ये आता प्रामुख्याने जीव्हीके मुख्य विकसन यंत्रणा राहील. एनएमआयएलने यापुर्वीच मास्टर प्लॅन सादर केला आहे. ज्यामध्ये टप्प्याटप्प्याने विमानतळाच्या विकासाची कल्पना आहे, पहिल्या टप्प्यात एक कोटी प्रवाशी वाहतूक आणि दोन लाख साठ टन मालवाहू क्षमतेसाठीची सुविधा विकसीत केली जाणार आहे.
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ उभारण्यासाठी जी.व्ही.के. कंपनीने निधी उभारण्याचे उद्दीष्ट पूर्ण केल्यामुळे त्यांच्या आणि एस बँके दरम्यानच्या करारावरही यावेळी स्वाक्षरी करण्यात आली.