नागपूर : विधिमंडळ हे जनमताचा आरसा आहे. संसदीय लोकशाहीत विधान परिषदेला वरिष्ठ सभागृह म्हटलं जातं, विधानपरिषद व विधानसभेत जनहिताच्या चर्चा होत असतात. माध्यमांनी विधीमंडळाचे कामकाज सामान्य जनतेपर्यंत योग्य वार्तांकन करून तटस्थपणे मांडावे, असे प्रतिपादन नागपूर तरूण भारतचे संपादक गजानन निमदेव यांनी केले.
विधानमंडळाच्या राष्ट्रकुल संसदीय मंडळाच्यावतीने राज्यातील राज्यशास्त्र आणि लोकप्रशासन या विषयांचा अभ्यास करणाऱ्या पदव्युत्तर विद्यार्थ्यांच्या संसदीय अभ्यासवर्गाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यात आज ‘विधिमंडळाचे कामकाज आणि प्रसारमाध्यमांची भूमिका व जबाबदारी’ या विषयावर श्री. निमदेव बोलत होते. यावेळी राज्यातील विविध विद्यापीठातील अधिव्याख्याते, विद्यार्थी उपस्थित होते.
श्री. निमदेव म्हणाले, न्यायपालिका, कायदेमंडळ आणि लोकप्रशासन यांच्याबरोबरीने माध्यमे ही लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून काम करीत असतात. माध्यमांची भूमिका ही निष्पक्ष आणि तटस्थपणे हवी. विधिमंडळातील चर्चा, घटना यांचे योग्य अवलोकन करून वार्तांकन करणे गरजेचे आहे. न घडलेल्या घटनांची माहिती प्रसिद्ध करता येत नाही. सभापती अथवा अध्यक्षांनी प्रश्नोत्तराचा तास पुकारल्याशिवाय प्रश्नोत्तरे होत नाहीत. ती प्रसिद्ध करता येत नाहीत, अन्यथा विधिमंडळाचा हक्कभंग होतो,काहीवेळेस संपादकाला शिक्षाही होऊ शकते. काहीवेळा सदस्याने आक्षेपार्ह विधान केलं अन ते कामकाजातून काढून टाकलं असेल तर ते प्रसिद्ध करता येत नाही, याच भान माध्यमांना हवे.
अधिवेशन हे लोकप्रतिनिधी आपल्या भागातील समस्या मांडून त्यावर चर्चा घडवून आणून सोडविण्यासाठी असते, येथे गुणवत्तापूर्ण व अभ्यासू चर्चा होणे अपेक्षित आहे. गोंधळ घालून कामकाज करणे हे सदस्याचा अधिकार आहे, मात्र यावरही अंकुश ठेवायला हवा. माध्यमांनी गदारोळाला महत्व देऊ नये, तरच सभागृहातील कामकाजाची स्थिती सुधारेल. अनेक सदस्य गंभीरपणे वेगळ्या पद्धतीने भागातील समस्या मांडत असतात, यावरही माध्यमांचे लक्ष हवे. एखाद्या सदस्याला न्याय मिळत नसेल तर माध्यमांनी त्यांची भूमिका मांडायला हवी. अभ्यासपूर्ण सदस्यांच्या भूमिकांना माध्यमांनी योग्य स्थान द्यायला हवे, असेही श्री. निमदेव यांनी सांगितले.
दैनिकाला योग्य भाव मिळाला तर माध्यम प्रतिनिधींची भूमिका बदलेल व जबाबदारीही सुधारेल. माध्यमांनी सभागृहातील हलकं-फुलकं वातावरण, सकारात्मक बातम्यांना जास्त प्राधान्य द्यावे. त्यांनी नेहमी न्यायाधीशाच्या भूमिकेत राहू नये. कोणाचा अवमान व अपमान होऊ नये, असे लिखाण टाळावे. घटनेने माध्यमांना स्वातंत्र्य उपभोगण्याची संधी दिली, मात्र याचा दुरूपयोग करू नये. आपल्या लेखणीद्वारे सकारात्मक संदेश जावा. सदस्यावर अंकुश असला पाहिजे, त्यांनी जबाबदारीने बोललं पाहिजे, असे माध्यम प्रतिनिधींचे लेखन असायला हवे, असेही श्री. निमदेव यांनी सांगितले.
श्री. निमदेव यांनी विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना समर्पक उत्तरे दिली. प्रास्ताविक अवर सचिव सुनील झोरे यांनी केले तर आभार संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या विद्यार्थिनी कान्होपात्रा लोणाग्रे यांनी मानले.