महाराष्ट्राच्या राजकारणात नवी मुंबईचा उल्लेख झाल्यावर ठाणे जिल्ह्याचे माजी पालकमंत्री गणेश नाईक यांचे नाव अनायसे येतेच. राजकीय कार्यक्षेत्राचा विचार झाल्यास गणेश नाईक आणि नवी मुंबई हे १९८० पासूनचे समीकरण आहे. मोदी लाटेमुळे गणेश नाईक हे बेलापुर विधानसभा मतदारसंघात अवघ्या १३०० मतांनी पराभूत झाले असले तरी आजही गणेश नाईकांचा सर्वसामान्य नवी मुंबईकरांवर पगडा कायमच आहे. देशाच्या कानाकोपऱ्यातून लोक नवी मुंबईमध्ये उपजिविकेसाठी स्थायिक झाले असल्याने नवी मुंबईचा उल्लेख ‘मिनी इंडिया’ केला तरी वावगे ठरणार नाही. लोकसभा व विधानसभा निवडणूकांना अजून काही महिन्यांचा अवकाश असला तरी गणेश नाईक पक्षांतर करणार असल्याच्या चर्चा मागील दोन वर्षापासून सुरू आहेत. गणेश नाईकांनी वेळोवेळी या अफवांचे, चर्चांचे खंडन केले असले तरी या अफवा व चर्चा आजही सुरूच आहेत. नवी मुंबईच्या राजकारणात गेल्या काही महिन्यापासून अफवामय वातावरण सुरू असल्यामुळे कोण कोठे जाणार, कोण कोठून येणार, कोण कोठे गेल्यावर कोण तेथून बाहेर पडणार या तर्कविर्तकाच्या चावडी गप्पांना उधान आलेले असते.
राजकारण आणि क्रिकेट हे दोन विषय आपल्या देशातील लोकांचे आवडीचे विषय आहेत. या दोन विषयांमधली फारशी माहिती नसली तरी त्याबाबत तास न् तास लोक या विषयावर बोलत असतात. मुंबई महापालिका, सिडको, कोकण भवन, मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती, एमआयडीसीसह अन्य कोणत्याही परिसरात राजकीय गप्पांना सुरूवात झाल्यावर काही वेळातच गणेश नाईक पक्ष बदलणार अशा चर्चांचा त्यामध्ये समावेश होत असतो. विशेष म्हणजे जाहिर कार्यक्रमातून, विष्णूदास भावे नाट्यगृहातील पक्षीय मेळाव्यातून शरद पवारांवरील प्रेमाचे दाखलेही जगजाहिर करत आपण पवारसाहेबांना सोडणार नसल्याचे गणेश नाईकांनी वेळोवेळी सांगितलेही आहे. तरीही नाईक परिवाराच्या पक्ष बदलीच्या चर्चा थांबण्याचे नाव घेत नाहीत.
एप्रिल २०१४च्या लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणूकीत तत्कालीन खासदार संजीव नाईक हे शिवसेना-भाजपचे उमेदवार राजन विचारे यांच्याकडून २ लाख ८४ हजार इतक्या दणदणीत मतांनी पराभूत झाले. देशभरात मोदी नावाचा उदोउदो होत होता. मोदी लाट असल्यामुळे संजीव नाईक पराभूत झाले. मोदी लाट नसती तर कदाचित निकाल वेगळाच असता. पराभूत झाल्याचे नाईक परिवाराला दु:ख झाले नाही. परंतु नवी मुंबई या त्यांच्या बालेकिल्ल्यातच तब्बल ४७ हजाराची पिछाडी मिळाली, याचेच अधिक दु:ख नाईक परिवाराला झाले. १९९० पासून गणेश नाईक विधानसभेवर गेले आहेत आणि तेही दणदणीत मताधिक्याने. १९९९ साली २७०० मतांनी नाईकांचा सिताराम भोईर यांनी केलेला पराभव हा नाईक समर्थक आजही पराभव मान्य करतच नाहीत. कांदा बटाटा मार्केटमध्ये तत्कालीन परिस्थितीमध्ये उपस्थित असलेल्या राजकीय मातब्बरांनी आपल्या ‘वलया’च्या आधारावर घडवून आणलेला तो पराभव होता. त्यानंतर २००४ साली झालेल्या विधानसभा निवडणूकीत गणेश नाईकांनी पराभवाचे उट्टे काढले. एक लाखापेक्षा अधिक मताधिक्याने गणेश नाईक विजयी झाले. गणेश नाईक बोलत नाही तर करून दाखवितात अशी त्यांची कार्यप्रणाली आहे. २००९ साली विधानसभा मतदारसंघ पुर्नरचनेनुसार एकट्या बेलापुर विधानसभा मतदारसंघाचे तब्बल पाच विधानसभा मतदारसंघात विभाजन झाले. एप्रिल २००९मध्ये झालेल्या लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणूकीत संजीव नाईक राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून लोकसभेवर गेले. ऑक्टोबर २००९ साली झालेल्या विधानसभा सार्वत्रिक निवडणूकीत ऐरोली मतदारसंघातून संदीप नाईक आणि बेलापुर मतदारसंघातून गणेश नाईक निवडून आले. त्यापाठोपाठ एप्रिल २०१०मध्ये झालेल्या नवी मुंबई महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणूकीत गणेश नाईकांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी कॉंग्रेसने स्पष्ट बहूमत मिळाले. तो काळ बोनकोडेच्या नाईक परिवाराच्या सुवर्णयुगाचा काळ म्हटला पाहिजे. संजीव नाईक खासदार, गणेश नाईक मंत्री, संदीप नाईक आमदार, सागर नाईक महापौर अशी राजकीय सुबत्ताच त्या काळात नाईक परिवारात ओंसडून वाहत होती. परंतु देशभरात मोदी पर्व सुरु झाल्यावर मोठ्या प्रमाणावर अविश्वसनीय स्वरूपात राजकीय उलथापालथी झाल्या, त्यास नवी मुंबई शहरदेखील अपवाद राहिले नाही. नंदनवनाला नजर लागावी तसेच काहीसे नाईक परिवाराचे झाले. लोकसभा निवडणूकीत संजीव नाईक पराभूत झाले. त्यावेळी मोदी लाट आणि नवी मुंबईत असलेला परप्रांतिय मतदारांचा भरणा पाहता पक्ष बदली करण्याबाबत कार्यकर्ते, नगरसेवक, समर्थकही दबाव टाकू लागले. वाशीतील विष्णूदास भावे नाट्यगृहातही कार्यकर्त्यांनी मेळावा आयोजित करून पक्ष बदलण्याबाबत टाहो फोडला. परंतु नाईकांनी राष्ट्रवादीतच राहणे पसंत केले. ऑक्टोबर २०१४ साली झालेल्या विधानसभा सार्वत्रिक निवडणूकीत ऐरोलीचा गड संदीप नाईकांनी राखला असला तरी बेलापुरला गणेश नाईकांच्या गडाला हादरा बसला. भाजपच्या मंदा म्हात्रे यांनी नाईकांना पराभूत केले. परंतु त्यानंतर एप्रिल २०१५ साली झालेल्या नवी मुंबई महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणूकीत गणेश नाईकांनी महापालिकेची सत्ता राखली.
विधानसभा निवडणूकीतील पराभवानंतर नाईकांच्या कार्यकर्त्यांनी पक्ष बदलीबाबत उचल खाली आणि आजही नाईकांच्या कार्यकर्त्यात व पदाधिकाऱ्यांमध्ये खासगीमध्येही पक्ष बदलण्याचा सूर आळविला जात आहे. बावखळेश्वर मंदिर प्रकरणाच्या वेळीही नाईक परिवार भाजपमध्ये जाणार असल्याच्या चर्चेने जोर धरला होता. नाईक परिवार भाजपमध्ये जाणार असल्याच्या पैंजाही राजकीय क्षेत्रामध्ये लागल्या आहेत. गणेश नाईक हे पूर्वीचे शिवसैनिक असल्याने ते भाजपत न जाता शिवसेनेतच येणार असल्याचा आशावाद शिवसैनिकांकडून व्यक्त केला जात आहे.
गणेश नाईक भाजपत आल्यावर मंदा म्हात्रेंचे काय होणार, मंदा म्हात्रे यांना बेलापुर कायम ठेवून भाजप गणेश नाईकांना लोकसभा लढविण्यास सांगणार, गणेश नाईक शिवसेनेच्या संपर्कात असून त्यांना लोकसभा व नवी मुंबईतील दोन्ही विधानसभा देण्यात येणार आणि राजन विचारेंना पुन्हा विधानसभा लढविण्यास सांगणार, संदीप नाईकांचा भाजपकडे कल अधिक आहे, अशा दररोज नवनव्या चर्चा नवी मुंबईच्या राजकीय क्षेत्रात होतात आणि त्यातून नवनव्या अफवांना खतपाणी घातले जात आहे. एकीकडे गणेश नाईक हे पक्ष बदलीबाबत नकार देत असताना दुसरीकडे मात्र त्यांच्या पक्षबदलीबाबत चर्चा जोर धरू लागल्या आहेत. कोण कुठे प्रवेश करते आणि कोणाच्या येण्यामुळे कोणाचा फायदा आणि कोणाचे नुकसान होणार याचे गणित आजच कार्यकर्त्यांकडून जुळविले जात आहे. लोकसभा निवडणूकीच्या अगोदर साधारण दोन महिने चित्र स्पष्ट होणार असले तरी नेते कोणता झेंडा हाती घेणार याबाबत कार्यकर्तेच संभ्रमात असल्याने कोणाविरोधात भूमिका घ्यायची, कोणाचे समर्थन करायचे याबाबत सर्वच अस्पष्ट झाले आहे. नवी मुंबईचे राजकारण गेल्या काही महिन्यापासून अफवांच्या हिंदोळ्यांवर असल्याने नवनवीन चर्चा आणि निर्माण होणाऱ्या अफवा यावरच वाटचाल करत आहे.
– सुजित शिंदे