कोकणचा हिरवानिसर्ग सोडुनआज ट्रेन मधून प्रवास करताना दोन प्रवासी आपापसात बोलताना ऐकलं.. कोंकणची मुलं खूप हुशार आहेत,९७% निकालही लागतो. मग पुढे का येत नाहीत?..दहावी बारावी बोर्डामध्ये कोंकणच्या मुलांचं वर्चस्व असत पण मग ही मुलं जातात कुठे…ऐकून बरं वाटलं .पण ते थोडा वेळासाठीच. दुसरा बोलला अरे काही टॅलेंट वैगरे नाही १० वि १२ वी केली कि येतात. मुंबईमध्ये त्यांना वाटत मिळेल चांगल्या पैशाची नोकरी. येतात मग इकडे. ऐकून संतापाची लाट मस्तकात गेली. वाटलं उठाव आणि द्यावी एक ठेवून. कारण मी पण एक कोंकणी माणूस आहे. कोंकणच्या मातीत राहिलेला कड्याकपारींत वाढलेला हाडामासाचा कोंकणी माणूस पण त्या एकाला सांगून काय होणार तो ऐकेल आणि सोडून देईल, मग ठरवलं लिहायचं, कोंकणच्या मुलांचं मन. कारण मी पण त्याच मुलांपैकी एक मुंबईमध्ये आलेला. कोंकणी मुलं मुंबईला येतात मिळेल त्या पैशात नोकरी का करतात या मागच भयानक वास्तव यांना कधी कळणारच नाही. कोंकणी मुलांचं मन याना कधी उमगणारच नाही. कोंकणी मुलं पैशासाठी मुंबईत नाही येत रे… येतात ती जबाबदारी पार पाडण्यासाठी. आमच्या गरजा पार पाडाव्या म्हणून पायाला चाक बांधून फिरणारा आमचा बाप,रखरखाट करणार ऊन आणि भयाण तापलेलं काळ कातळ आणि त्यावरून अनवाणी पायाने डोक्यावर भारी घेऊन चालणारी आमची आई पाहिली आहे आम्ही. पायाला बसणारे चटके जबाबदारीची जाणीव करून देत होते. त्या पायाला उतार वयात चटके बसू नयेत म्हणून स्वतःच्या मनावर दगड ठेवून मुंबईमध्ये येतो कोंकणी माणूस. जबाबदारीच्या ओझ्याखाली माझा बाप वाकला जाऊ नये त्याच्या बनियानला पडलेली भोक बुजवता यावीत म्हणून त्या भोकांना शिवणारा धागा शोधायला मुंबईमध्ये येतो कोंकणी माणूस. बरोबर आहे त्यांचं प्रत्येक बोर्डात कोंकणची मुलं अव्वल येतात पण त्यानंतर शिकण्यासाठी लागणारी भरमसाठ फीस माझ्या बापाला परवडणारी नसते म्हणून १२ वी करून मुंबईला येतो आम्ही कोंकणी लोक . वडिलोपार्जित मिळालेल्या जमिनीचे तुकडे होऊन जेव्हा २,३ मळ्या वाट्याला येतात, ५-६ कलमं आणि ५-६ काजूची झाड वाट्याला येतात त्यात कुटुंब कसं चालणार म्हणून कमरेला आकडी बांधून मजुरीला जाणारा बाप पाहिलाय आम्ही . डोक्यावर घमेलं घेऊन त्याच्या मागे मागे चालणारी आई पाहिलीय आम्ही. त्यांच्या कष्टाला आपला हातभार लागावा म्हणून मुंबईला येतो आम्ही कोंकणी. एकदा मुंबईच्या कोंकणी माणसाला भेटा त्याला बोलत करा मग कळेल तुम्हाला त्याच मन . मुंबईच्या धावपळीत पाठीला जबाबदारी घेऊन धावणारा कोंकणी माणूस बघा मग काळेल त्याच्या जगण्याची व्यथा. अरे अभिमान आहे मला मी कोंकणी असल्याचा. भले पैसे कमी कमावेल पण आई बापाच्या सुखासाठी स्वतःच सुख लाथाडणारा कोंकणी माणूस पाहिलंय मी. अरे स्वतः जुने कपडे घालेल पण मुंबई वारून गावी जाताना घरातील प्रत्येकाला नवे कपडे घेऊन जाणारा कोंकणी माणूस पाहिलंय मी. गच्च भरलेल्या ट्रेन मध्ये स्वतःला नीट उभं राहायला पण जागा नाही पण गावच्या भावंडांसाठी घेतलेला खाऊ कुस्करु नये म्हणून भरलेली बॅग डोक्यावर घेऊन ८-९ तास प्रवास करणारा कोंकणी माणूस पाहिलंय मी. पैशाच्या दुनियेत घरातील आई बाप घराबाहेर काढताना पाहिलेत पण स्वतः उपाशी राहून घरच्यांना पोटभर खाऊ घालणारा कोंकणी माणूस पाहिलंय मी. आमच्या कौलारू घरात ऐषोआराम नसेल पण आई-बापाची सावली सदैव आमच्या सोबत असते. अरे जेव्हा घरात बहिणीचे लग्न असते तेव्हा कर्जाऊ पैसे उसनवार घेऊन दिवस रात्र काम करून मुंबईत धक्के खात थाटमाट लग्न लावून देऊन तिला सोडायला जाताना खांद्यावरील पंचाने डोळे पुसणारा पण हाच कोंकणी माणूस असतो. जबाबदारी पेलता पेलता स्वतःसाठी जगणे विसरून एके काळी मी कोंकण बोर्डचा टॉपर होतो हे पण तो पार विसरून गेलेला असतो. खूप काही आहे लिहिण्यासारखं पण वेळ आणि जागा कमी आहे त्यामुळे आता एवढाच लिहितो. निसर्गाने भरभरून दिलेल्या कोंकणी माणसाच्या मनाचा थांग लागणे कठीणच. सौन्दर्याप्रमाणेच दिलेलं मोठं मन जोपासत कोंकणी माणूस आज मुंबईच्या धावत्या दुनियेत धावतो आहे. पाठीवर जबाबदारीच ओझं घेऊन … मिळेल तस मिळेल तिथे … स्वतःच अस्तित्व विसरून जगत असतो हा कोकणी…
— — —- श्री.गणेश नवगरे.९८६९७१५४१३