* सायन पनवेल महामार्ग खड्ड्यांचा प्रश्न * मनसेची मुख्यमंत्री व पोलीस आयुक्तांकडे मागणी.
नवी मुंबई : सुमारे १२२० कोटी रुपये खर्चून बांधण्यात आलेला सायन पनवेल महामार्ग हा सध्या सर्वसामान्य करदात्यांसाठी मृत्यूचा सापळा बनला आहे. शुक्रवार दि.१३ जुलैला सायन पनवेल महामार्गावर खड्ड्यांमुळे सनी विश्वकर्मा आणि कमलेश यादव या दोघांचा अंधारात खड्डे न दिसल्यामुळे अपघात झाला. त्यामध्ये सनी विश्वकर्मा याचा जागीच मृत्यू झाला तर कमलेश जबर जखमी झाला. दि.०५ जुलैला उरण फाटा येथे इब्राहीम खुर्शीद यांचा खड्ड्यांमुळे अपघाती मृत्यू झाला. याबाबत नवी मुंबई मनसे शहर अध्यक्ष गजानन काळे यांनी थेट मुख्यमंत्री व नवी मुंबई पोलीस आयुक्तांकडे निवेदनाद्वारे जाहीर मागणी केली आहे की सदर अपघातांबाबत मंत्री एकनाथ शिंदे, प्रवीण पोटे तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी व कार्यकारी अभियंता, उप-अभियंता, कनिष्ठ अभियंता व संबंधित रस्ते कंत्राटदारांना जबाबदार धरून या सर्वांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा.
खड्ड्यांमुळे निष्पाप लोकांचे जीव जाणे हे अत्यंत गंभीर असून मंत्री, रस्ते कंत्राटदार व अधिकारी तसेच अभियंते यांच्या असंवेदनशिलतेमुळे हे अपघात घडत असल्याचा आरोप नवी मुंबई मनसेने केला आहे. सायन पनवेल महामार्गावरील खड्डे नैसर्गिक कारणांमुळे न पडता मंत्री, सार्वजनिक बांधकाम विभाग व संबंधित रस्ते कंत्राटदारांनी अक्षम्यपणे सदर महामार्गाच्या देखभालीकडे दुर्लक्ष केल्यामुळे पडले आहेत असा आरोप मनसे उपशहर अध्यक्ष निलेश बाणखेले यांनी केला आहे. इतके अपघात घडून सुद्धा मंत्री, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी व कंत्राटदार मात्र झोपेचे सोंग घेतल्याप्रमाणे सदर अपघातांकडे दुर्लक्ष करत आहेत व आपली कर्तव्य बजावण्यात दिरंगाई करत असल्याचा आरोप मनसे शहर सचिव संदीप गलुगडे यांनी केला आहे. करोडो रुपयांची कंत्राटे देऊन सुद्धा रस्त्यांची अशी दयनीय अवस्था होते व त्यावर मंत्री, सार्वजनिक बांधकाम विभाग व संबंधित कंत्राटदारांकडून काहीच ठोस कारवाई केली जात नसल्याची तक्रार मनसे उपशहर अध्यक्ष विनोद पार्टे यांनी केली आहे.
कंत्राटदाराचे हीत जपण्यात व आपल्या खुर्च्या गरम करण्यातच मंत्री, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी व अभियंत्यांना जास्त रस असल्याचा जाहीर आरोप मनसे शहर अध्यक्ष गजानन काळे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केला आहे. दोषीमंत्री एकनाथ शिंदे, प्रवीण पोटे व सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी व कार्यकारी अभियंता, उप-अभियंता, कनिष्ठ अभियंता व संबंधित रस्ते कंत्राटदारांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा तात्काळ दाखल करून, अटक करा आणि तुरंगात टाका अशी मागणी मुख्यमंत्री व नवी मुंबई पोलीस आयुक्तांकडे नवी मुंबई मनसेतर्फे करण्यात आली आहे.