नवी मुंबई : नवी मुंबईतील अपुरा, असुरळीत वीजपुरवठा आणि वीज समस्यांविरोधात आमदार संदीप नाईक यांनी आवाज उठवलेला होता. वीजेच्या या अडचणी सोडविण्यासाठी वीज अधिकार्यांच्या भेटी घेणे प्रसंगी आंदोलनाचा दणका देणे असा पाठपुरावा केला आहे. आमदार नाईक यांच्या या प्रयत्नांना यश आले असून महावितरण कंपनीने वाशी, नेरुळ, कोपरखैरणे इत्यादी भागात वीज प्रणाली सुधारण्याची कामे मोठया प्रमाणावर हाती घेतली आहेत.
राज्याचे उर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी या संबधीची लेखी माहिती दिली आहे. आमदार नाईक यांनी या संबधीचा प्रश्न विधीमंडळाच्या सुरु असलेल्या अधिवेशनात विचारला होता. नवी मुंबईतील वीज समस्यांचा प्रत्यक्ष पाहणीदौरा करुन उद्यडयावरच्या विद्युततारा, उघडे डी.पी.बॉक्स, नादुरुस्त ट्रान्सफार्मर इत्यादी समस्यांचा सचित्र अहवाल आमदार नाईक यांनी वाशी मंडळाच्या अधिक्षक अभियंत्यांकडे जुन २०१७मध्ये दिला होता.
त्यावर काय कार्यवाही करण्यात आली? अशी विचारणा आमदार नाईक यांनी शासनाकडे केली होती. या निवेदनाच्या अनुशंगाने नवी मुंबईत एकात्मिक उर्जा विकास कार्यक्रम आणि सक्षमीकरण व आधुनिकीकरण यू ऍण्ड एम योजनेअंतर्गत विविध देखभाल आणि दुरुस्तीची कामे हाती घेण्यात आली आहेत. सुरळीत वीज पुरवठयासाठी विद्युत प्रणाली सुधारण्यावर भर देण्यात येत आहे.
वाशी, नेरुळ आदी भागातील विद्युत प्रणाली सुमारे १५ ते २० वर्षेजुनी आहे. त्यातील अनेक उपकरणे जुने, गंजलेले, नादुरुस्त आणि कालबाहय झालेले आहेत. काही ठिकाणी फिडर पिलरचे दरवाजे आणि फिडर पिलरमधील फयुज चोरीस गेले आहेत. अनेक ठिकाणी फिडर पिलर उघडया स्थितीत आहेत, उर्जामंत्री बावनकुळे यांनी या बाबी उत्तरात मान्य केल्या आहेत.
********
हाती घेण्यात आलेली कामे..
नविन भुमीगत लघुदाब वाहिन्या टाकण्यात येत आहेत. उच्च वाहिन्यांचे नविन युनिट बसविण्यात येत आहेत. लघुदाब क्षमतेचे नविन फिडर पिलर बसविण्यात येत आहेत. एका विभागाचा विद्युत पुरवठा खंडीत झाला तर दुसर्या विभागातून विद्युत पुरवठा करण्याच्या यंत्रणेत सुधार करण्यात येत आहे, अशी माहिती महावितरणचे वरिष्ठ अधिकारी अन्नछत्रे यांनी दिली.