मंत्री, अधिकाऱ्यांचा निषेध करत PWD कार्यालय फोडले
सायन पनवेल हायवे खड्डेमुक्त करा….मनसे मागणी
नवी मुंबई : १२०० कोटी खर्चून बांधण्यात आलेला सायन पनवेल महामार्गावरील खड्ड्यांबाबत तीव्र आंदोलन करत नवी मुंबई मनसेच्या कार्यकर्त्यांनी आज तुर्भे येथील सार्वजनिक बांधकाम विभागाचे (PWD) कार्यालय फोडले. सायन पनवेल महामार्गावर पडलेल्या खड्ड्यांमुळे आतापर्यंत गेल्या दीड-दोन वर्षात १०३ निष्पाप लोकांचे जीव गेले असताना सरकार व सार्वजनिक बांधकाम विभाग त्यावर कोणतीही कार्यवाही करत नसल्यामुळे हे आंदोलन केल्याचे मनसेने प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे. नुकतेच भाजप मंत्री चंद्रकांत पाटील यांनी “पाच मृत्यू झाले म्हणून रस्ता दोषी कसा?” असे बेताल वक्तव्य केले होते. या वक्तव्याचा तीव्र निषेध करत, या आंदोलनातून थेट मंत्री एकनाथ शिंदे, चंद्रकांत पाटील, प्रवीण पोटे व भाजप सेना सरकारला इशारा दिल्याचा मनसेने प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे. आंदोलनाच्यावेळी “खड्डे मुक्त सायन पनवेल हायवे… झालाच पाहिजे… झालाच पाहिजे !!”, “चंद्रकांत पाटील हाय हाय…हाय हाय !!”, “एकनाथ शिंदे हाय हाय…हाय हाय!!”, “प्रवीण पोटे हाय हाय….हाय हाय!!” या घोषणा देऊन मनसैनिकांनी PWD कार्यालयाचा परिसर दणाणून सोडला.
असंवेदनशील भाजप-सेना सरकारला कंत्राटदारांचे हित जपायचे असल्यामुळेच या खड्ड्यांबाबत अजून कोणत्याच कंत्राटदाराला अटक किंवा अभियंत्यांवर कारवाई झाली नसल्याचे मनसेने म्हटले आहे. शुक्रवार दि.१३ जुलैला सायन पनवेल महामार्गावर खड्ड्यांमुळे सनी विश्वकर्मा आणि कमलेश यादव या दोघांचा अंधारात खड्डे न दिसल्यामुळे अपघात झाला. त्यामध्ये सनी विश्वकर्मा याचा जागीच मृत्यू झाला तर कमलेश जबर जखमी झाला. दि.०५ जुलैला उरण फाटा येथे इब्राहीम खुर्शीद यांचा खड्ड्यांमुळे अपघाती मृत्यू झाला. सायन पनवेल महामार्ग हा सामान्यांसाठी सध्या मृत्यूचा सापळा झाला आहे. खड्ड्यांमुळे निष्पाप लोकांचे जीव जात आहेत, हे अत्यंत क्लेशदायक व सरकारसाठी शरमेचे असल्याचे मनसेने प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे. याबाबत थेट मुख्यमंत्री व नवी मुंबई पोलीस आयुक्तांकडे निवेदनाद्वारे सदर अपघातांबाबत मंत्री एकनाथ शिंदे, प्रवीण पोटे तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी व कार्यकारी अभियंता, उप-अभियंता, कनिष्ठ अभियंता व संबंधित रस्ते कंत्राटदारांना जबाबदार धरून या सर्वांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केल्याचे मनसेने प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.
कोकण, गोवा, पश्चिम महाराष्ट्रामधून मुंबईला प्रवास करणाऱ्यांना हा २० ते २४ किलोमीटर लांबीचा सायन पनवेल महामार्ग सोयीचा आहे. मात्र आता या महामार्गाची चाळण झाली आहे. पनवेल ते वाशी हा प्रवास करण्यास तब्बल दोन तासांचा अवधी या खड्ड्यांमुळे लागत असल्याचे मनसेने म्हटले आहे. ठाणे जिल्हा पालकमंत्री एकनाथ शिंदे महामार्ग पाहणी दौऱ्याची निव्वळ नौटंकी करत असल्याचा आरोप मनसेने केला आहे.
निवेदन देऊन, खड्ड्यांमध्ये आंदोलन करून देखील खड्डे बुजवले जात नसल्यामुळे आज हा खळखट्ट्याकचा मार्ग अवलंबल्याचे मनसेने प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे. नवी मुंबई मनपाने बेलापूर ते वाशी हा १४ किलोमीटरचा रस्ता मनपाला हस्तांतरित करण्यात यावा म्हणून पत्र देऊन ही, सार्वजनिक बांधकाम विभागाने याला प्रतिसाद दिला नाही. सार्वजनिक बांधकाम विभागाला या रस्त्याची डागडुजी व देखभाल जमत नसेल तर मनपाकडे हा रस्ता डागडुजीसाठी देण्याची मागणी मनसेने प्रसिद्धीपत्रकात केली आहे. यासाठी मनपाला सार्वजनिक बांधकाम विभागाने पैसे वर्ग करावेत, पण आर्थिक मलिदा खायला मिळणार नाही म्हणून सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंते हे साध्य होऊन देत नसल्याचा आरोप मनसेने केला आहे.
या खड्ड्यांवर कायमस्वरूपी उपाय केला नाही तर आज सारखेच उग्र आंदोलन मंत्रालयात करण्याचा जाहीर इशारा मनसेने प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिला आहे.