सारसोळेचे विकासपर्व असणारे महापालिका ‘ब’ प्रभाग समिती सदस्य मनोज मेहेर यांचा सभागृहात पालिकेला इशारा
अमोल इंगळे
नवी मुंबई : महापालिका प्रशासनाने सारसोळे गाव आणि नेरूळ सेक्टर सहा परिसरातील सादर केलेल्या मल:निस्सारण वाहिन्याच्या यादीतील मल:निस्सारणची झाकणे (चेम्बर्स) दिसतच नाहीत, त्यामुळे यादीत लेखी स्वरूपात दाखविलेली मल:निस्सारणची झाकणे महापालिका प्रशासनाने मोजून दाखवावीत अन्यथा महापालिका प्रशासनाची मल:निस्सारणची झाकणे चोरी गेल्याबाबत नेरूळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करणार असल्याचा इशारा सारसोळेचे विकासपर्व असणारे महापालिका ‘ब’ प्रभाग समिती सदस्य मनोज मेहेर यांचा सभागृहात ‘ब’ प्रभाग समितीच्या बैठकीत महापालिका प्रशासनाला दिला आहे.
पहिल्याच पावसात सारसोळे गावात महापालिकेच्या मल:निस्सारण व गटार साफसफाईचे धिंडवडे निघाले. गावामध्ये अनेक ठिकाणी गटारांची व मल:निस्सारण वाहिन्यांची सफाई झालीच नसल्याचे सारसोळेच्या ग्रामस्थांचे म्हणणे आहे. एक दिवस संततधार पाऊस पडला तरी गटारे तुंबायची, मल:निस्सारणच्या टाक्या भरून रस्त्यावर ते घाण पाणी वाहायचे. याबाबत मनोज मेहेर यांनी महापालिका प्रशासनाने ठेकेदाराच्या माध्यमातून गटारांची व मल:निस्सारण वाहिन्यांची काय सफाई केली याचा अहवालच लेखी तक्रारीतून महापालिका प्रशासनाकडे मागितला.
महापालिका प्रशासनाने मनोज मेहेर यांना सफाईच्या कामाची लेखी माहिती दिली, त्यात सारसोळे गाव आणि नेरूळ सेक्टर सहा परिसरात मल:निस्सारणच्या २९७ झाकणांचा स्पष्टपणे उल्लेख करत काही फोटोही जोडले होते. त्यात एका रस्ते सफाई करणार्या कंत्राटी कामगाराचाही फोटो आहे.
मनोज मेहेर आणि त्यांच्या सहकार्यांनी प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार सेक्टर सहा व सारसोळे गावातील मल:निस्सारणच्या झाकणाची तपासणी केली असता, इतक्या मोठ्या संख्येने मल:निस्सारणची झाकणेच नसल्याचा सावळागोंधळ उजेडात आला. मल:निस्सारणच्या झाकणे मोजणीबाबत मनोज मेहेर यांनी पालिका विभाग अधिकारी आणि पालिका आयुक्तांकडे लेखी तक्रारी सादर करत मोजणी अभियान राबविण्याची मागणी केली. सध्या नागपूरला अधिवेशन सुरू असल्यामुळे अधिवेशन संपताच नगरविकास खात्याचे प्रमुख म्हणून मुख्यमंत्री व नगरविकास राज्यमंत्र्यांकडेही लेखी तक्रार करणार असल्याचे मनोज मेहेर यांनी सांगितले.
आज प्रभाग समितीच्या बैठकीत मनोज मेहेर यांनी हा विषय मांडताच तुम्हाला कदाचित चुकीची माहिती दिली असेल तर सांगत विषय सारवासारवीचा प्रयत्न पालिका प्रशासनाकडून करण्यात आला. मनोज मेहेर यांनी विचारलेल्या प्रश्नांनाही त्यांना उत्तरे देता आली नाहीत. देण्यात आलेल्या यादीतील सारसोळे गाव व नेरूळ सेक्टर सहा परिसरातील मल:निस्सारणच्या झाकणांची संख्या २९७ होत असून अजून सेक्टर सहा व सारसोळे गावातील काही भागाचा समावेश नसल्याने मल:निस्सारणची झाकणे वाढण्याची शक्यता मनोज मेहेर यांनी व्यक्त केली आहे.
अस्तित्वात नसलेली मल:निस्सारणची झाकणे कागदावर दाखविली कशी जातात आणि वर्षानुवर्षे या मल:निस्सारणच्या वाहिन्यांची सफाई कशी होते यामागे मोठे गौडबंगाल असून या प्रकाराची मंत्रालयीन व न्यायालयीन पातळीवर चौकशी होण्यासाठी आपण पाठपुरावा करणार असल्याचे मनोज मेहेर यांनी सांगितले.