नागपूर : मुंब्रा बाहयवळण रस्त्यामुळे तसेच महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ(एमएसआरडीसी ) व सार्वजनिक बांधकाम विभाग (पीडब्ल्यूडी )यांच्या अख्यतारितील खडडेमय रस्त्यांमुळे नवी मुंबईत होत असलेल्या प्रचंड वाहतुककोंडीचा विषय मंगळवारी आमदार संदीप नाईक यांनी विधानसभेत औचित्याच्या मुद्यातून मांडला. येथून होणारी जड वाहनांची वाहतुक दुसरीकडे वळविण्यासाठी पर्यायी मार्गाचा विचार करावा आणि पेट्रोल तसेच डिझेलच्या माध्यमातून अगोदरच नवी मुंबईकरांकडून शासन अतिरिक्त अधिभार वसूल करीत आहे त्यामुळे वाशी व ऐरोली येथे नवी मुंबईकरांना टोलमाफी द्यावी, अशी मागणी त्यांनी केली.
मे २०१८ पासून मुंब्रा बाहय वळण रस्ता दुरुस्तीसाठी बंद करण्यात आला आहे. त्यामुळे या रस्त्यावरील सर्व वाहतुक नवी मुंबईतील रबाळे, ऐरोली, पटणी कंपनी मार्गे वळविण्यात आली आहे. दररोज सुमारे १५ हजार जड वाहने आणि हजारो हलकी वाहने नवी मुंबईतून पुढे जातात, परिणामी मोठी वाहतुककोंडी होते, याकडे आमदार नाईक यांनी शासनाचे लक्ष वेधले. दुसरीकडे नवी मुंबईतून जाणारे राज्य रस्ते विकास महामंडळ आणि सार्वजनिक बांधकाम विभागाचे रस्ते अतिशय खराब झाले असून या रस्त्यांवर खडडयांचे साम्राज्य आहे. या खडडयांमुळे काही वाहनचालकांना आपले प्राण अपघातात गमवावे लागले आहेत. एमएसआरडीसी आणि पीडब्ल्यूडी यांनी हे रस्ते तात्काळ दुरुस्त करावेत. अशी मागणी करुन रोजच्या वाहतुककोंडीविषयी आणि त्यामुळे होणार्या वाढत्या अपघातांविषयी नवी मुंबईकरांच्या भावना तीव्र आहेत म्हणून नवी मुंबईत होणार्या जड वाहनांच्या वाहतुकीसाठी पर्यायी मार्गाचा वापर करावा, अशी मागणी देखील आमदार नाईक यांची औचित्याच्या मुद्यातून केली आहे.