अमोल इंगळे
नवी मुंबई : नेरूळ सेक्टर सहा परिसरातील सार्वजनिक शौचालय हे दुर्गंधीमुळे आधीच परिचित असताना आता त्याच शौचालयात पुरूष विभागात वीजही नाही. त्यामुळे रात्रीच्या वेळी शौचालयात अंधारामुळे कोणताही गैरप्रकार घडू नये अथवा भयावह घटना घडू नये यासाठी महापालिका प्रशासनाने लवकरात लवकर सार्वजनिक शौचालयातील पुरूष विभागातील नादुरूस्त वीजपुरवठा दुरूस्त करण्याची लेखी मागणी पत्रकार व सामाजिक कार्यकर्ते संदीप खांडगेपाटील यांनी नेरूळ पालिका विभाग अधिकार्यांकडे एका तक्रारपत्रातून केली आहे.
प्रभाग ८६ मध्ये नेरूळ सेक्टर सहा परिसरात सिडको वसाहतीमधील शाळेसाठी आरक्षित जागेवर महापालिका प्रशासनाने उद्यान व क्रिडांगणाची निर्मिती केलेली आहे. या उद्यान व क्रिडांगणालगतच महापालिकेने सार्वजनिक शौचालयाचीही निर्मिती केली आहे. या शौचालयाच्या दुर्गंधीबाबत, बकालपणाबाबत मी यापूर्वीच आपणास एक तक्रारपत्र सादर करूनही पालिका प्रशासनाकडून कोणतीही कार्यवाही झालेली नाही, त्याबाबत पत्रकार खांडगेपाटील यांनी पालिका प्रशासनाचे आभार मानले आहेत.
काल रात्रीपासून पालिकेच्या सार्वजनिक शौचालयातील पुरूष विभागात वीज नसल्याने अंधारच असतो. या परिसरात रात्री-अपरात्री मद्यपि व गर्दुले फिरतात. शौचालयातील अंधाराचा फायदा घेत वाटमारी अथवा अन्य स्वरूपातील भयावह विचित्र घटना घडण्याची भीती आहे. समस्येचे गांभीर्य पाहता आपण तात्काळ संबंधिताना सार्वजनिक शौचालयातील नादुरूस्त झालेला वीजपुरवठा दुरूस्त करण्याचे संबंधितांना निर्देश द्यावेत, ही आपणास नम्र विनंती. या समस्येवर मी काल रात्री पावणे बारा वाजण्याच्या सुमारास आपल्या व्हॉट्स अप क्रमाकांवरही तक्रार केली आहे, याची आपण दखल घ्यावी असे खांडगेपाटील यांनी तक्रारपत्रात नमूद केले आहे.