अमोल इंगळे
नवी मुंबई : सारसोळे गाव नेरूळ नोडमधील आजही अविकसित गाव. या गावातील महापालिका शाळेच्या सभोवताली फेरफटका मारल्यास ही शाळाच बकालपणाच्या विळख्यात अडकलेली दिसून येते. शाळेच्या बाजूच्या पावसाळी गटारांमध्ये मातीचे ढिगारे असून पाणी रस्त्यावरून वाहत आहे. सारसोळे गावात कामे करणारे ठेकेदार व त्यांनी काम केले आहे अथवा नाही हे न पाहता त्यांची बिले त्यांना वेळोवेळी देणारे नवी मुंबई महापालिका प्रशासनच सारसोळे गावाच्या बकालपणाला जबाबदार असल्याचा आरोप पत्रकार व सामाजिक कार्यकर्ते संदीप खांडगेपाटील यांनी केला आहे.
सारसोळेतील समस्यांबाबत बोलताना पत्रकार संदीप खांडगेपाटील पुढे म्हणाले की, दरवर्षी पावसाळीपूर्व कामाचा महापालिका प्रशासनाकडून गाजावाजा होत असतो. पण सारसोळेच्या महापालिका शाळेजवळील पावसाळी पाणी वाहून नेणारी गटारे आजही मातीच्या रॅबिटने भरलेली आहेत.पावसाळा जुन व जुलै असे दोन महिने झाले आहेत. पावसाळीपूर्व कामातून सारसोळेच्या शाळेजवळील गटारांना वगळले आहे काय? सारसोळेचे ग्रामस्थांना महापालिका प्रशासनाला नागरी सुविधा द्यायच्याच नाहीत काय असा संतप्त सवाल पत्रकार संदीप खांडगेपाटील यांनी विचारला आहे.
महापालिका नेरूळ विभाग कार्यालयाचे घनकचरा अधिकारी ‘खूपच’ कार्यक्षम आहे. महापालिकेचे सिडकोेच्या जागेवरील अनधिकृत मार्केट महापालिकेने पाडल्यावर ते डेब्रिज व पत्रे उचलून न्यायला महापालिकेच्या नेरूळ विभाग कार्यालयाला सव्वा ते दीड महिना लागला. मी स्वत: आठ लेखी तक्रारपत्र सादर केली. भाजपचे प्रदीप बुरकुल व शिवसेनेेचे दिलीप आमले यांनीही पाठपुरावा केला. महापालिका शाळेजवळील एक इमारत महापालिका व सिडकोने पाडली. ते डेबिेजही अर्धवटच नेण्यात आले असून महापालिका शाळेजवळ त्या बांधकामांचे अजूनही डेब्रिज मोठ्या प्रमाणावर पडले आहे. यामुळे पालिका शाळेच्या मुलांना साथीच्या आजाराची लागण होण्याची दाट शक्यता आहे. महापालिका शाळेतील मुलांना व सारसोळेच्या ग्रामस्थांना आजही त्याच डेब्रिज परिसरातून ये-जा करावी लागत असल्याचे पत्रकार संदीप खांडगेपाटील यांनी सांगितले.
नेरूळ सेक्टर सहामध्ये शाळेसाठी आरक्षित असलेल्या भुखंडावर उद्यान व क्रिडांगण आहे. त्या क्रिडांगणाला तानाजी मालुसरे क्रिडांगण असे नाव असले तरी या क्रिडांगणावर नामफलक लावण्याची तसदी महापालिका प्रशासनाने घेतली नाही. उद्यान व क्रिडांगणात विकासकामे होतात, पण क्रिडांगणाचा नामफलक अजून लागला नाही. स्थानिकांना अजून क्रिडांगणाचे नाव माहिती नाही. नेरूळ सिव्ह्यू व सिव्ह्यू या सिडकोच्या सोसायट्यांच्या मध्यभागी असलेले उद्यान गेल्या अनेक वर्षापासून अविकसित स्वरूपात आहे. रात्री या उद्यानात गर्दुले असतात. लघुशंकेसाठी या उद्यानाचा वापर होत असल्याचा संताप पत्रकार संदीप खांडगेपाटील यांनी व्यक्त केला आहे.
सारसोळे शाळेजवळील गटारांची झाकणे तुटली आहे. गटारांवर २०००,२००२ ची झाकणे आहेत. आज २०१८ चालू आहेत. इतकी वर्षे महापालिका प्रशासनाने सारसोळे गावातील गटारांची झाकणेही बदलली नाहीत. सारसोळेच्या ग्रामस्थांना सुविधांपासून वंचित ठेवण्यात आले. गटारांची झाकणे तुटली असल्याने रात्रीच्या वेळी अनेक ग्रामस्थांना पायाच्या जखमा झाल्या आहेत. दुर्गंधीचा सामना व डासांचा उद्रेक ग्रामस्थांना सहन करावा लागत असल्याचे पत्रकार संदीप खांडगेपाटील यांनी सांगितले.
सारसोळे गाव आणि नेरूळ सेक्टर सहामधील समस्यांबाबत मी, दिलीप आमले, प्रदीप बुरकुल यांच्यासह अनेक जण प्रशासनदरबारी पाठपुरावा करत असतात. प्रशासनाकडे सुविधा मागणे व समस्या सोडविण्यासाठी पाठपुरावा करणे हे स्थानिक रहीवाशी म्हणून ही सर्व मंडळी काम करत असतात.परंतु सोशल मिडीयावर फेसबुक, व्हॉट्सअपवर काही राजकारण्यांच्या जवळची मंडळी नको ते उद्योग करत असतात. यामुळे उलट काम करण्याचा उत्साह वाढतो आणि सारसोळेच्या ग्रामस्थांना, नेरूळ सेक्टर सहाच्या रहीवाशांना खरा प्रकार निदर्शनास येतो. यापुढे सोशल मिडीयावर असले उद्योग करणार्या लोकांनी लक्षात ठेवावे की असले उद्योग केल्याने दुखावलेली मंडळी नव्याने जोमाने व वेगाने काम करतात. मात्र यामुळे आपण आपल्या राजकीय नेत्याचीच जनसामान्यांत प्रतिमा मलीन करत असतो. हा प्रकार दुसराच राजकारणी करवून घेत असल्याची चर्चा जनसामान्यात सुरू होते. त्यामुळे हे उद्योग यापुढे करताना ही बाब संबंधितांनी लक्षात ठेवावी, असा सल्ला पत्रकार संदीप खांडगेपाटील यांनी दिला आहे.