मुंबईः देशाच्या राजकारणात जेव्हा-जेव्हा तिसऱ्या आघाडीची चर्चा झालीय किंवा होते, तेव्हा पंतप्रधानपदासाठी एकच नाव पुढे येतं आणि ते म्हणजे, राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार… २०१९च्या निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात विरोधकांची महाआघाडी करण्याच्या हालचालींना वेग आलेला असतानाही, ‘पवारसाहेब’ पंतप्रधान होऊ शकतात बरं, असं त्यांचे समर्थक हळूच सांगतात. परंतु, आपण पंतप्रधानपदाच्या शर्यतीत नसल्याचं आज पवारांनी स्वतःच स्पष्ट केलं आहे.
२०१९च्या लोकसभा निवडणुकीच्या निकालांनंतर पंतप्रधानपदाचा उमेदवार जाहीर केला जाईल, अशी सावध खेळी काँग्रेसनं केली आहे. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या गळ्यात पंतप्रधानपदाच्या उमेदवारीची माळ त्यांनी घातलेली नाही. त्यामुळे या पदाबाबत चर्चा सुरू झाली आहे. स्वाभाविकच, त्यात शरद पवार यांचं नावही आहे. राष्ट्रीय राजकारणाचा दांडगा अनुभव आणि सर्वच पक्षांशी सलोख्याचे संबंध असल्यानं पवार हे पंतप्रधानपदाचे ‘पॉवरफुल्ल’ दावेदार मानले जातात. मात्र, मला, यूपीए अध्यक्ष सोनिया गांधींना आणि माजी पंतप्रधान एच डी देवेगौडा यांना पंतप्रधानपदाची इच्छा नसल्याने आम्ही भाजपविरोधी महाआघाडीसाठी पुढाकार घ्यायला हवा, असं सूचक मत पवारांनी एका मुलाखतीत मांडलं आहे.
आगामी २०१९च्या लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधानपदाची महत्वकांक्षा न बाळगणाऱ्या संयुक्त पुरोगामी आघाडीच्या (युपीए) प्रमुख सोनिया गांधी, माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा आणि मी एकत्र येण्यास तयार आहोत, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी म्हटले आहे. देश पिंजून काढून भारतीय जनता पार्टीला शह देण्यासाठी विरोधकांना एकत्र आणून जनतेला आत्मविश्वास देण्याचा आमचा प्रयत्न असेल असेही त्यांनी म्हटले आहे.
दरम्यान, शरद पवार यांनी राज्यात प्रथमच राष्ट्रवादी-काँग्रेस युतीचे दरवाजे मायावतींच्या बहुजन समाज पार्टीसाठीही खुले केले आहेत. अद्याप बसपा प्रमुख मायावतींशी याबाबत चर्चा झालेली नसली तरी त्या यासाठी नक्कीच खुश होतील असेही शरद पवार यांनी हिंदुस्तान टाईम्सला दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे.
या मुलाखतीत पवार यांनी २०१९च्या निवडुकांच्या पार्श्वभूमीवर सविस्तर भाष्य केले. त्यांनी सध्याच्या राजकीय स्थितीला १९७५-७७ सारखी स्थिती असल्याचे संबोधले आहे. त्यावेळी इंदिरा गांधींना पर्याय नसल्याचा भ्रम निर्माण झाला होता, तशीच स्थिती आता नरेंद्र मोदींबाबत झाली आहे. त्यावेळी इंदिराजींनी माध्यमांसह सरकार आणि सरकारी संस्थांवर नियंत्रण मिळवले होते. तशीच मोदींची स्थिती आहे.
त्याचबरोबर विरोधकांनी राष्ट्रीय युतीपेक्षा राज्यांतील युती निर्माण करण्यावर भर द्यायला हवा असेही त्यांनी म्हटले आहे. त्याचबरोबर काँग्रेसने राज्यांमधील युतींसाठी तर्कसंगत दृष्टीकोन ठेवायला हवा. यासंदर्भात काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्याशी चर्चा झाली असून काँग्रेसच्या विचारांमध्ये निश्चित सुधारणा होईल अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली आहे.