मुंबई : गोवंडी येथे संजयनगर परिसरातील उर्दू शाळा क्रमांक २मध्ये शिकणारी चांदणी शेख या मुलीचा मृत्यू झाल्यामुळे शुक्रवारी खळबळ उडाली. शाळेत देण्यात येणाऱ्या फॉलिक अॅसिडच्या गोळ्यांमुळेच तिचा मृत्यू झाल्याचा संशय व्यक्त होऊ लागला. त्यानंतर पालकांनी मुलांना तपासणीसाठी राजावाडी आणि शताब्दी रुग्णालयात दाखल केले. उपचाराअंती ४७१ पैकी ३८९ विद्यार्थ्यांना डिस्चार्ज देण्यात आला असून ८२ विद्यार्थी अद्यापही डॉक्टरांच्या देखरेखीखाली आहेत. दरम्यान, चांदणीच्या मृत्यूचे कोडे कायम आहे.
गोवंडीच्या संजयनगर महापालिकेच्या उर्दू शाळेत शिकणाºया १२ वर्षीय चांदणी शेख या मुलीचा मृत्यू शाळेत देण्यात आलेल्या लोह आणि फॉलिक अॅसिडच्या औषधाने झाल्याचे वृत्त कळताच तिचा मृतदेह शवविच्छेदनासाठी जे. जे. रुग्णालयात पाठविण्यात आला होता. शनिवारी त्याच्या शवविच्छेदनाविषयीची माहिती जे. जे. रुग्णालयाकडून देण्यात आली. चांदणीच्या फुप्फुसात झालेला रक्तस्राव हे तिच्या मृत्यूचे कारण असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. मात्र अद्याप यासंदर्भातील हिस्टो- पॅथॉलॉजिकल तपासणी बाकी आहे. शुक्रवारच्या घटनेनंतर पालकांमध्ये एकच गोंधळ उडाला आणि घाबरून त्यांनी मुलांना राजावाडी, शताब्दी रुग्णालयामध्ये दाखल केले. राजावाडी आणि शताब्दी दोन्ही रुग्णालयांतील बालरोग विभागासह आपत्कालीन विभागामध्येही मुलांना वैद्यकीय तपासणीसाठी ठेवण्यात आले होते.
यातील काही मुलांमध्ये मळमळणे, डोके दुखणे, चक्कर, उलटी अशी लक्षणे दिसून आली. त्यांना रुग्णालयात दाखल करून घेण्यात आले होते. एकूण ४७१ विद्यार्थ्यांपैकी शनिवारी ३८९ विद्यार्थ्यांना डिस्चार्ज देण्यात आला तर ८२ विद्यार्थ्यांवर अद्याप उपचार सुरू असल्याची माहिती मिळाली आहे. डिस्चार्ज दिलेल्या मुलांना कोणताही संसर्ग वा त्रास झाला नाही हे समजल्यानंतर अनेक पालकांनी सुटकेचा नि:श्वास टाकला. तोपर्यंत औषधाचे वितरण बंद पालकांच्या आरोपानंतर शाळेत देण्यात येणाºया फॉलिक अॅसिडच्या गोळ्यांचे वितरण बंद करण्यात आले
आहे. यासंदर्भात पालिकेच्या प्रमुख रुग्णालयाचे संचालक व केईएम रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. अविनाश सुपे यांनी याबाबत परिपत्रक काढले आहे. खबरदारीचा उपाय म्हणून आयर्न आणि फॉलिक अॅसिडच्या गोळ्या मुलांना देण्यावर बंदी घालण्यात आली आहे. ज्या बॅचची औषधे शाळेत मुलांना देण्यात आली होती, ती अन्न व औषध प्रशासन विभागाने तपासणीसाठी जप्त केली आहेत. त्याचा अहवाल आल्यानंतर पुढील निर्णय घेतला जाईल. तोपर्र्यंत या बॅचची औषधे पालिकेच्या शाळेतील एकाही मुलाला देण्यात येणार नाहीत, असे त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान, शनिवारी दिवसभरात घाबरून १० ते १२ मुलांना घेऊन पालक राजावाडी रुग्णालयात तपासणीसाठी आले असल्याची वैद्यकीय अधीक्षक डॉ. विद्या ठाकूर यांनी दिली.
औषधांच्या तपासणीसाठी विशेष समिती अन्न व औषध प्रशासनामार्फत त्या गोळ्यांची तपासणी सुरू असताना महापालिकेनेही आपल्या स्तरावर वैद्यकीय तज्ज्ञांची समिती स्थापन केली आहे. केईएम रुग्णालयाच्या डॉ. नित्या गोगटे यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती विद्यार्थ्यांना नेमकी कशामुळे विषबाधा झाली, याचा तपास करणार आहे. या समितीमध्ये केईएमचे डॉ. मिलिंद नाडकर (औषध विभागाचे प्रमुख), डॉ. सुजाता बावेजा (प्राध्यापक व मायक्रो बायोलॉजी विभागाचे प्रमुख) आणि सायन रुग्णालयांच्या बालरोग तज्ज्ञ डॉ. अलका जाधव यांचा समावेश आहे. ही समिती सात दिवसांमध्ये आपला अहवाल सादर करणार आहे.