* कांतीलाल कडू यांच्या आजानुबाहू कवितासंग्रहाचे शानदार प्रकाशन
* सभागृहात लोटलेल्या अलोट दर्दींमुळे वक्त्यांनांही चढली धार
* रसिकांनी अनभुवले प्रा. अशोक बागवे यांच्या जिव्हेवरील सरस्वतीचे शाब्दिक नृत्य
पनवेल : शब्दांचे शस्त्र हातात असणार्यांनी त्याचे शास्त्रही जाणून घेतले पाहिजे. कवी कविता लिहितो तेव्हा तो आतून उजळून निघतो आणि सूर्यासारखा हा स्वयंप्रकाशित कवी इतरांनाही उजेड दाखवतो, असे उद्गार कविवर्य प्रा. अशोक बागवे यांनी शनिवारी (दि. ११) पनवेलमधील आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात काढले. कांतीलाल कडू यांच्या ‘आजानुबाहू’ कवितासंग्राहाचे प्रकाशन प्रा. बागवे यांच्या हस्ते झाले, त्यावेळी ते बोलत होते.
व्यासपीठावर ज्येष्ठ साहित्यिक, पत्रकार मंगेश विश्वासराव, कवी सतीश सोळांकुरकर, वरिष्ठ पोलिस निरीक्षक विनोद चव्हाण व कांतीलाल कडू उपस्थित होते.
प्रा. बागवे म्हणाले की, कवितेने आपले अख्खे जीवनच व्यापून टाकले आहे. लहानपणी आई आपल्याला ‘मम्मम्’ भरवते. ‘भूभू’ दाखवते ही मऊसूत झालेली भाषा, हे लहानपणी कानावर पडलेले शब्द म्हणजे काव्याशी झालेली पहिली ओळख असते. मंगलाष्टके म्हणजे काव्यच आहे, अशा उत्कट शब्दांचे गारूड प्रा. बागवे यांनी रसिकांवर घालून तब्बल तीन तास खिळवून ठेवले.
आपण त्या पोडियमसमोर उभे राहून मुद्दामहून बोलत नाही, अशी मिश्किल टिप्पणी करीत स्वतःच्या शारीरिक उंचीवर विनोद करून सभागृहाला त्यांनी खळखळून हसायला लावले. त्यातच कांतीलाल कडू, सतीश सोळांकुरकर आणि मी, आम्हा तिघांची शारीरिक आणि कवितेची उंची सारखीच असून जगात बुटक्या उंचीच्या माणसांनी इतिहास रचल्याचा दाखला देताना नेपोलियन, शिवाजी महाराज, सचिन तेंडुलकर आणि प्रा. बागवे यांची उंची पाच फुट तीन इंच असल्याचे सांगताच, सभागृह हास्याच्या लाटांनी फेसाळून निघाला होता.
** शस्त्राचे शास्त्र करण्याची किमया**
कांतीलाल कडू यांचा लोकसंग्रह अफाट आहे. त्यांच्याकडे शस्त्रांचे शास्त्र करण्याची किमया आहे. त्यांचा कवितासंग्रह संधीकाळात प्रकाशित होत आहे. त्यातच भारतातील पहिला क्रांतिकारी लढा उभारणारे क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात, त्यांच्या कवितासंग्रहाचे प्रकाशन होणे, यामागे वेगळे संचित आहे, असा दावा त्यांनी केला, तेव्हा टाळ्यांचा ‘धोधो’ पाऊस सभागृहात बरसला.
** पार्यासारखा माणूस **
कांतीलाल कडू हे पटकन चिमटीमध्ये पकडता येणारे व्यक्तिमत्व नाही. याच्या डोक्यात काय सुरू आहे आणि हातात काय काम सुरू आहे ते कधीच कुणाला कळत नाही. सगळेच म्हणतात त्याच्या कवितेला आणि पत्रकारितेलाही शस्त्राची धार आहे. मला असे वाटते की, त्याची पत्रकारिता पाहिल्यानंतर, त्याचे शब्दाचे श्वास पाहिल्यानंतर, त्याची कविता पाहिल्यानंतर की, शस्त्राचे शास्त्र बनविण्याची किमया त्याच्यात आहे. तो कोकणातील फणसासारखा गोड आहे. पार्यासारखा पारदर्शक आहे. तो निर्भीड आहे. त्याचे शब्द जहाल आहेत. शस्त्रधारी माणूस निःशस्त्रधारी माणसाला घाबरतो. शस्त्रे सामोरासमोर आली तर ती भिडतात, युध्द होतात. पण निःशस्त्रधारी माणसाला शस्त्र घाबरतात, हे शास्त्र ज्याला कळते तो पत्रकार असे मर्म प्रा. बागवे यांनी स्पष्ट केले. प्रा. बागवे यांचे शब्द साठवण्यासाठी रसिकांनी आतुड्यांचे कान केले होते.
** कवितेची ताकद सौभाग्यावतीच्या कुंकूवासारखी! **
कवितेची ताकद दाखवून देताना ‘हरिण आणि पारधी’ यांच्यातील बाण घेऊन धावणारा मृत्यु अधोरेखित करताना शब्दांची ताकद स्पष्ट केली. मराठीतील शब्दांची फोड करून त्यांनी रसिकांसमोर नवा ‘शब्दकोश’ ठेवला. ते म्हणाले की, कविता छोटी असते पण स्फोटक असते. ती फार लांबलचक नसते. ललितलेख, कादंबरीत फार मोठे आणि भाराभर शब्द असतात. पण कविता ताकदवान असते. कारण ती सौभाग्यवातीच्या कुंकूवासारखी असते, असे सांगत प्रा. बागवे यांनी कवीला तुच्छ लेखणार्यांना चांगलेच फटकारले. तेव्हा हास्याची सरिता सभागृहात प्रवाहित झाली होती.
** आई भूगोल तर वडील इतिहास! **
मराठी मनाचे दैवत पु. ल. देशपांडे यांच्याशी पुतळ्यावरून एक माणूस वाद घालत होता. म्हणाला ते पुतळे कशाला हवेत? पक्षी उर्त्सजन करण्यासाठी त्या पुतळ्यांचा वापर होत आहे, असे तो तावातावाने म्हणाला. त्यावर ‘पुलं’ म्हणाले की, तुझ्या नावात वडीलांचे नाव कशाला लावतोस? त्याचा काय उपयोग आहे? या प्रश्नावर तो माणूस निरूत्तर झाला. ही गोष्ट सांगतानाच प्रा. बागवे यांनी, आई हा भूगोल तर वडील हा इतिहास आहे. ज्याला इतिहास आणि भूगोल असतो तोच ‘माणूस’ असतो, असे तत्वज्ञान त्यांनी उपस्थितांना पटवून दिले.
** संस्कृत भाषा फसवी आहे **
संस्कृत भाषा असत्य बोलायला शिकवते. ती भाषा कधीच सत्य मांडत नाही. ती वेडीवाकडी वळणं घेऊन बोलते. ती फसवी आहे असे सांगत भाबडा माणूस चोर असू शकतो, पण निरागस माणूस लबाड नसतो. त्यांनी अनेक शब्द आणि त्याचे अर्थ सांगून प्रा. बागवे यांनी उपस्थितांच्या ज्ञानात भर टाकली.
** गीता हे जीवन रहस्य आहे.**
‘आजानुबाहू’ हा अभिमन्यु आहे. कविता लिहिण्याच्या अगोदरची रात्र फार महत्वाची आहे. श्रीकृष्णाने आदल्या रात्रीच अर्जुनाला गीता सांगितली. श्रीकृष्णाचा खेळ असते. तो विधीलिखित असतो. त्याला संचित म्हणतात. परिस्थितीचा गुलाम असणे हे भगवदगीतेला मान्य नाही. सर्वांनी मिळून ती परिस्थिती उलथवून टाकणे ही खरी गीता आहे.
परमेश्वरी तत्व आणि अवकाशात सगळे ठरलेले असते. ती वेळ येताच स्वतःच परिस्थिती श्रीकृष्ण बदलवून टाकतो अशा अनेक गोष्टींतून अध्यात्मिक सारही त्यांनी समाजापुढे मांडला.
** कांतीलाल कडूंच्या चाहत्यांची नोंद **
सभागृहातील उपस्थितीवरून कांतीलाल कडू यांच्या लोकसंग्रहाचे दर्शन घडले.सर्वच वक्त्यांनी त्याची दखल घेत उपस्थितीला मोठी दाद दिली. श्रावणसरी बाहेर बरसत असताना, आजानुबाहूतील काव्य सरींचे घन बरसत होते. गटारी अमावस्या, दीप पूजा, पनवेल-पुणे, नवी मुंबईत झालेली वाहतुकीची कोंडी, पावसाने आळस झटकत सुरू केलेला दंगा अशा अनेक अडचणींची शर्यत पार पाडत प्रेषक, रसिकांनी नाट्यगृहाचा ताबा घेतला होता. एखाद्या पुस्तक प्रकाशन सोहळ्याला क्कचितच इतकी रसिक दर्दींची गर्दी उसळली असेल, असे मत अनेकांनी नोंदविले.
** रसिकश्रोत्यांमध्ये ‘बाप माणसं’ **
रसिकांमध्ये आंतरराष्ट्रीय कीर्तीचे चित्रकार विजय बोधणकर, सुलेखनकार विनोद महाबळे, जिल्हा शिवसेना सल्लागार बबनदादा पाटील, राष्ट्रवादीचे जिल्हा सरचिटणीस प्रशांत पाटील, कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते ऍड. गजानन पाटील, रमणिकशेठ माखेजा, डॉ. भक्तीकुमार दवे, शशिकांत बांदोडकर, समाजभूषण उत्तमराव गायकवाड, शिवसेनेचे सल्लागार रमेश गुडेकर, पनवेल शहरचे माजी अध्यक्ष ऍड. के. एस. पाटील, शहराध्यक्ष सुदामशेठ पाटील, मराठा समाजाचे नेते रामदास शेवाळे, शिवसेनेचे माजी शहराध्यक्ष सुनीत ठक्कर, माजी नगरसेवक तथा शिवसेना शहराध्यक्ष प्रथमेश सोमण, संघटक अच्युत मनोरे, माजी नगरसेविका प्रमिला कुरघोडे, श्रीमती सावंत, अर्बन बँकेंच्या संचालिका माधुरी गोसावी, निवृत्त सहाय्यक पोलिस आयुक्त रमेश घडवले, कफचे अध्यक्ष अरूण भिसे, खारघर संघर्ष समितीचे अध्यक्ष संजय जाधव, रमेश मेनन, डॉ. चंदन ठाकूर, राजेश ठाकूर, प्रशांत ठाकूर, गजलकार ए. के. शेख, गणेश म्हात्रे, सुरेश रामधरणे, ऍड. माधुरी थळकर, ज्योत्सना राजपुत, ऍड. छाया गोवारी, कोन ग्राम पंचायतीचे उपसरपंच जितेश शिसवे, शिवसेनेेचे विभागीय अध्यक्ष रोशन पाटील, नाना खुटले, मनोहर भोईर, स्वातंत्र्यसैनिक मुकूंद इनामदार, श्री टकळे, वाय. के. ठाकरे, सुतोडीकर, बाळारामशेठ पाटील, मंदार दोंदे, लक्ष्मण भगत, बावधनकर, आघारकर, डॉ. अर्चना, अजित म्हात्रे, शशि म्हात्रे, टी. एम. म्हात्रे, नगरसेवक ज्ञानेश्वर म्हात्रे, बबन जगनाडे, आयटीआयचे प्राचार्य फडतरे, अरूण ठाकूर, महेंद्र विचारे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
** स्वागतोछुकांचाही सन्मान**
मान्यवरांचे स्वागत सुएसो कळंबोलीचे प्राचार्य इक्बाल इनामदार, नवीन पनवेलचे प्राचार्य माळी सर, आनंद पाटील, चंद्रकांत शिर्के, मंगल भारवड आदींनी केले.
** योगदान ज्यांचे… सत्कार त्यांचे **
आजानुपाहूचे मुखपृष्ठ सजविणारे सुलेखनकार विनोद महाबळे, मांडणीकर्ते सुरज म्हात्रे आणि घोट नदीतील वाहून जाणार्या कारसह त्यातील चौघांना जीवदान देणारे नगरसेवक ज्ञानेश्वर पाटील यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
** वक्ते जेव्हा व्यक्त होत होते…**
यावेळी ज्येष्ठ पत्रकार तथा कांदबरीकार मंगेश विश्वासराव, कविवर्य सतिश सोळांकुरकर, वरिष्ठ पोलिस निरीक्षक विनोद चव्हाण आदींची उत्कृष्ट आणि तितकीच नर्मविनोदी भाषणे झाली. प्रेषकांन त्यांच्या वक्तृत्वाला टाळ्यांचा गजरात प्रतिसाद दिला.
** सुत्रसंचालनामुळे चार चॉंद **
कार्यक्रमाचे प्रास्ताविक कांतीलाल कडू यांनी केले. तर उत्कृष्ट शैलीत सुत्रसंचालन नवी मुंबई महापालिकेचे जनसंपर्क अधिकारी तथा कविवर्य महेंद्र कोंडे यांनी केले. त्यांच्या सुत्रसंचलानामुळे कार्यक्रमाला चार चॉंद लागले.