मुंबई : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे चिरंजीव तेजस ठाकरे यांनी रविवारी वर्सोवा, सगरकुटीर येथील सात बंगला बीचला भेट दिली. यावेळी बीच क्लिनिगचे जनक अॅड.अफरोझ शाह आणि त्यांचे काही कार्यकर्ते यांच्या सोबत होते. अफरोझ शाह यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी या भेटीच्या या वृत्ताला दुजोरा दिला आहे.
युवासेनाप्रमुख व शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांचे तेजस हे धाकटे बंधू असून निसर्ग व प्राणी प्रेमी म्हणून त्यांची ओळख आहे. आदित्य ठाकरे हे स्वतः अॅड.अफरोझ शाह यांच्या बीच क्लिनिगवर खूश असून त्याच्या या मोहिमेला त्यांनी पाठिंबा दिला आहे. अनेकवेळा सोशल मीडियावर ते अफरोझच्या पोस्टला लाईक करून कमेंट करतात.
अॅड.अफरोझ शाह यांनी 15 ऑक्टोबर 2015 साली वर्सोवा बीच क्लिनिगला सुरुवात केली होती. दर शनिवारी व रविवारी ते आणि त्यांचे वर्सोवा रेसिडन्ट असोसिएशनचे सुमारे 200 कार्यकर्ते बीच क्लिनिग करतात.सध्या त्यांच्या या मोहिमेचा 145 वा आठवडा सुरू आहे.